Rajasthan High Court : लग्नाव्यतिरिक्त वयात आलेल्या दोन व्यक्ती परस्पर सहमतीने संबंध ठेवत असतील, तर तो गुन्हा ठरत नाही ! – राजस्थान उच्च न्यायालय

जयपूर (राजस्थान) – आपल्या समाजात असे मानले जाते की, शारीरिक संबंध केवळ वैवाहिक जोडप्यांमध्ये असतात; पण लग्नाव्यतिरिक्त वयात आलेल्या दोन व्यक्ती परस्पर सहमतीने संबंध ठेवत असतील, तर तो गुन्हा ठरत नाही. भारतीय दंड विधानाचे  कलम ४९४ येथे लागू होत नाही; कारण नवरा आणि बायको दोघांपैकी एकाने दुसरा विवाह केलेला नाही. विवाह झाल्याचे सिद्ध होत नाही, तोपर्यंत ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’सारख्या  (लिव्ह इन रिलेशनशिप म्हणजे विवाह न करता पुरुष आणि स्त्री यांनी एकत्र रहाणे) नात्याला कलम ४९४ लागू होत नाही, असा निर्णय राजस्थान उच्च न्यायालयाने एका प्रकरणात दिला. या प्रकरणात पतीने पत्नीचे अपहरण झाल्यावरून याचिका प्रविष्ट (दाखल) केली होती. त्यावर पत्नीने तिचे अपहरण झाले नसून ती तिच्या इच्छेने ‘लिव्ह-इन-रिलेशनशिप’मध्ये रहात असल्याचे सांगितले. त्यावरून न्यायालयाने वरील निर्णय दिला.

सुनावणी दरम्यान याचिकाकर्त्याच्या अधिवक्त्याने दावा केला की, महिलेने मान्य केले आहे की, संजीव नावाच्या व्यक्तीसमवेत तिचे विवाहबाह्य संबंध आहेत. त्यामुळे भारतीय दंड विधानाच्या कलम ४९४ आणि ४९७ अंतर्गत हा गुन्हा आहे. सामाजिक नैतिकतेच्या रक्षणासाठी न्यायालयाला त्याच्या अधिकाराचा वापर केला पाहिजे.

यावर न्यायालयाने म्हटले की, एक वयात आलेली महिला तिला वाटेल त्या व्यक्तीशी लग्न करू शकते. तिच्या पसंतीच्या व्यक्तीसमवेत राहू शकते. या प्रकरणात महिलेने स्वच्छेने घर सोडले असून ती संजीव समवेत रहात आहे.

संपादकीय भूमिका

  • कायद्याच्या भाषेत हा गुन्हा ठरत नसला, तरी सामाजिकदृष्ट्या त्याकडे चांगले आचरण म्हटले जात नाही, ही वस्तूस्थिती आहे !
  • इंग्रजांच्या नव्हे, तर भारतीय संस्कृतीनुसार कायदे बनवण्याची किती आवश्यकता आहे ?, हेच या घटनेतून लक्षात येते !