Loksabha Elections 2024 : ५० सहस्र रुपये किंवा त्यापेक्षा अधिक रोख रक्कम बाळगतांना कागदपत्रे आवश्यक !

  • लोकसभा निवडणूक

  • दक्षिण गोवा जिल्हाधिकार्‍यांनी पत्रकार परिषदेत दिली माहिती

पणजी, १८ मार्च (वार्ता.) : लोकसभा निवडणुकीच्या अनुषंगाने आचारसंहिता लागू झाली आहे. त्यामुळे या काळात जे नागरिक ५० सहस्र रुपये किंवा त्याहून अधिक रोख रक्कम बाळगतील, त्यांनी त्यासंबंधी पुरावा असलेली कागदपत्रे जवळ बाळगणे आवश्यक आहे. अन्यथा हे पैसे जप्त केले जातील, अशी चेतावणी दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू यांनी पत्रकार परिषदेत दिली आहे.

दक्षिण गोव्याचे जिल्हाधिकारी अश्विन चंद्रू

ते म्हणाले, ‘‘दक्षिण गोव्यातील अधिकोषांना त्यांच्या ग्राहकांच्या खात्यात संशयास्पद व्यवहार आढळल्यास त्यांनी जिल्हाधिकार्‍यांना कळवावे. या पत्रकार पत्रकार परिषदेला दक्षिण गोव्याच्या पोलीस अधीक्षक सुनिता सावंत याही उपस्थित होत्या.

(सौजन्य : RDXGOA GOA NEWS)

‘मिडिया सर्टिफिकेशन’ पथके स्थापन करणार

आचासंहितेचा भंग होत आहे का ? हे पहाण्यासाठी ‘मिडिया  सर्टिफिकेशन’ पथके स्थापन करण्यात येणार आहेत. ही पथके डिजिटल माध्यमातून प्रसारित केल्या जाणार्‍या राजकीय जाहिरातींना प्रशस्तीपत्रक देण्यासाठी उत्तरदायी असतील. हे प्रशस्तीपत्रक मिळवण्यासाठी राजकीय पक्षांनी ‘मिडिया सर्टिफिकेशन  ’ पथकांकडे अर्ज करावे लागणार आहेत.


(चित्रावर क्लिक करा)

निवडणूक काळातील गैरप्रकार दूरभाषवरून कळवा ! – उत्तर गोवा जिल्हाधिकारी

उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते

निवडणूक काळातील गैरप्रकार रोखण्यासाठी राज्यातील सर्व ४० विधानसभा मतदारसंघांत भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. कुणीही तक्रार केल्यास भरारी पथक १०० मिनिटांत घटनास्थळी पोचून कारवाई करेल. कोणताही गैरप्रकार दिसून आल्यास नागरिकांनी ०८३२-२२२५३८३ किंवा ९६९९७९३४६४ या क्रमांकावर त्वरित दूरभाष करून किंवा संदेश पाठवून कळवावे, असे आवाहन उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयाकडून करण्यात आले आहे. नागरिकांना टोल फ्री १९५० या क्रमांकावर याविषयी माहिती कळवता येईल.

निवडणुकीतील गैरप्रकार रोखण्यासाठी उत्तर गोवा जिल्हाधिकारी कार्यालयात नियंत्रण कक्षाची स्थापना करण्यात आली आहे, अशी माहिती उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते यांनी पत्रकार परिषदेत दिली. या पत्रकार परिषदेला उत्तर गोव्याचे पोलीस अधीक्षक अक्षत कौशल हेही उपस्थित होते.

उत्तर गोवा जिल्हाधिकारी डॉ. स्नेहा गीते पुढे म्हणाल्या, ‘‘मतदार संख्या अधिक असलेल्या मतदारसंघात अधिक प्रमाणात भरारी पथके नियुक्त केली आहेत. या भरारी पथकांमध्ये ३ ते ६ अधिकार्‍यांचा समावेश असेल, तसेच दोन्ही जिल्ह्यांत विधानसभा मतदारसंघनिहाय विभागीय अधिकारी आणि पडताळणी पथकांचीही नियुक्ती करण्यात आली आहे. दक्षिण गोव्यात ११२, तर उत्तर गोव्यात ११५ विभागीय अधिकार्‍यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्याचप्रमाणे दक्षिण गोव्यात ३७ आणि उत्तर गोव्यात १६ भरारी पथकांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही पथके राज्यातील महत्त्वाचे रस्ते, जंक्शन या ठिकाणी काम करणार आहेत.’’

पोलीस अधीक्षक अक्षय कौशल यांनी सांगितले की, उत्तर गोवा भागात येणार्‍या ६ सीमांवरील तपासनाक्यांवर २४ घंटे पोलीस तैनात करण्यात आले आहेत. मद्य तस्करी किंवा अन्य गैरप्रकार रोखण्यासाठी सीसीटीव्ही कॅमेरे बसवण्यात आले आहेत.