श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या वतीने रक्तदान शिबिराला चांगला प्रतिसाद

धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज बलीदान मास

जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढीच्या वतीने प्रमाणपत्र देऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या कार्याचा गौरव

रत्नागिरी – प्रतिवर्षी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरी या संघटनेच्या वतीने धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज यांच्या बलीदानाप्रित्यर्थ रत्नागिरी शहरात मारुति मंदिर  येथे ‘धर्मवीर बलीदान मास’ या उपक्रमाचे आयोजन केले जाते. यामध्ये सायंकाळी ७.५० वाजता मारुति मंदिर सर्कल येथे एकत्र येऊन संभाजी महाराजांच्या प्रतिमेस ३० दिवस नियमित पुष्पहार अर्पण करून सामूहिक श्रद्धांजली वाहिली जाते आणि संभाजी महाराजांच्या जीवनचरित्राचे वाचन केले जाते. हे उपक्रम करत असतांना सामाजिक कार्याचे भान ठेवून, आपण समाजाचे काही देणे लागतो, या भावनेने रक्तदान शिबिर हाही उपक्रम घेतला जातो.

रक्तदात्यांना ‘डोनर कार्ड’, सन्मानपत्र आणि ‘शंभूराजे’ पुस्तक भेट देतांना श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थानचे धारकरी

यावर्षीही धर्मवीर संभाजी महाराजांच्या बलीदान प्रित्यर्थ शनिवार, १६.३.२०२४ या दिवशी येथील अंबर हॉल टी.आर्.पी. येथे जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी, रत्नागिरी यांच्या सहकार्याने भव्य रक्तदान शिबिर आयोजित करण्यात आले होते. या उपक्रमाच्या प्रारंभी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे ज्येष्ठ स्वयंसेवक श्री. विश्वनाथ बापट यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. या प्रसंगी रक्तदात्यांचा उदंड प्रतिसाद लाभला. या वेळी ८० जणांनी रक्तदान केले आणि सामाजिक सेवेचा आदर्श समाजापुढे उभा केला.

याप्रसंगी श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या वतीने रक्तदात्यांना ‘डोनर कार्ड’, सन्मानपत्र आणि संभाजीराजांचा सत्य इतिहास घराघरात पोचावा; म्हणून सु.ग. शेवडे लिखित ‘शंभूराजे’ हे पुस्तक भेट देण्यात आले.

जिल्हा शासकीय रुग्णालय रक्तपेढी, रत्नागिरी यांच्या वतीने प्रमाणपत्र देऊन श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान रत्नागिरीच्या या कार्याचा गौरव करण्यात आला.

या उपक्रमास अंबर हॉलचे सर्वेसर्वा श्री. कौस्तुभ सावंत आणि सुहास ठाकुरदेसाई यांचे मोलाचे सहकार्य लाभले. संघटनेतील सर्वांच्या सहकार्याने आणि रक्तदात्यांच्या उदंड प्रतिसादाने हा उपक्रम यशस्वीपणे पार पडला.