छत्रपती उदयनराजे समर्थकांचा शिवतीर्थावर निर्धार
सातारा, १६ मार्च (वार्ता.) – भाजपने लोकसभा निवडणुकीसाठी उमेदवारांची दुसरी, तर महाराष्ट्रातील पहिली सूची घोषित केली; मात्र घोषित झालेल्या २० उमेदवारांच्या सूचीत सातारा येथील भाजपचे खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांचे नाव नसल्यामुळे राजेंचे समर्थक आक्रमक झाले आहेत. जिल्ह्यातील अनेक भाजप पदाधिकार्यांनी राजीनामे देण्यास प्रारंभ केला आहे. भाजपचे लोकसभा संयोजक सुनील काटकर यांनी एक दिवस वाट पाहू नंतर सर्वानुमते निर्णय घेऊ, अशी भूमिका घोषित केली होती. दुसर्या दिवशी राजे समर्थक पुन्हा आक्रमक झाले असून त्यांनी शिवतीर्थावर जमत आता भाजपकडून लोकसभा निवडणुकीचे तिकीट मिळण्याची वाट पहाणार नाही, अशी भूमिका घोषित केली आहे.
सातारा लोकसभा मतदारसंघासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि भाजप यांच्यामध्ये चुरस आहे. मतदारसंघ कुणाच्या वाट्याला जाणार हे अजून निश्चित व्हायचे आहे. भाजपने आतापर्यंत २ सूची घोषित केल्या आहेत.