अनेक वर्षे रखडलेल्या सागरी महामार्गाला गती मिळणार
रत्नागिरी – गेली अनेक वर्षे रखडलेल्या मुंबई-गोवा सागरी महामार्गाला आता गती मिळणार आहे; कारण या महामार्गांवरील ६ मोठ्या पुलांच्या बांधकामाची एकत्रित निविदा काढण्यात आली आहे. या सागरी महामार्गामुळे कोकणातील पर्यटनाला चालना मिळणार असून या सर्व कामांसाठी ३ वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.
या मार्गावरील रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांतील ६ पुलांसाठी ‘महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळा’ने निविदा काढली आहे. एकूण ६ पुलांच्या बांधकामाचा अंदाजित खर्च ३ सहस्र १०९ कोटी २७ लाख रुपये इतका आहे.
या मार्गावर रेवदंडा ते साळव या पुलासाठी १ सहस्र २०८ कोटी, रेवस रेडी सागरी महामार्ग क्र. ४ वरील कोलमांडला ते वेस्वी-बाणकोट खाडीवरील मोठ्या पुलाच्या बांधकामासाठी २७२.८८ कोटी रुपये खर्च करण्यात येणार आहेत. या पुलामुळे रायगड आणि रत्नागिरी हे दोन्ही जिल्हे जोडले जाणार आहेत.
दापोली तालुक्यातील दाभोळ खाडीवर मोठ्या खाडीपुलाच्या कामासाठी ५५१.६६ कोटी रुपये खर्च येणार आहे. या पुलामुळे दापोली आणि गुहागर हे दोन्ही तालुके जोडले जाणार आहेत. दाभोळी पुलासाठी मा. सभापती आणि जिल्हा नियोजन समिती सदस्या सौ. स्मिता उदय जावकर यांनी विशेष प्रयत्न केले होते. त्यांनी भाजप जिल्हाध्यक्ष केदार साठे आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्याकडे सातत्याने पाठपुरावा केला होता. सौ. स्मिता जावकर यांच्या या यशस्वी प्रयत्नांमुळे त्यांचे सर्व स्तरांतून अभिनंदन केले जात आहे.
जयगड खाडीवरील तवसाळ ते जयगड या खाडीपुलासाठी ६२५.८७ कोटी रुपये, तर रत्नागिरी काळबादेवी सागरी पुलासाठी २९१.६४ कोटी रुपये खर्च येणार आहे.
सिंधुदुर्ग जिल्ह्यातील कुणकेश्वर येथील पुलाचे बांधकाम करण्यासाठी १५८.६९ कोटी रुपये इतका खर्च अपेक्षित आहे.