अपघातांना आळा घालण्यासाठी पोलीस खात्याकडून उपाययोजना
पणजी, १३ मार्च (वार्ता.) : गोव्यात येणारे काही पर्यटक गोव्यात फिरण्यासाठी भाडेतत्त्वावर दुचाकी किंवा चारचाकी वाहने घेतात. काही पर्यटक अशी वाहने निष्काळजीपणे चालवून स्वतःचा किंवा दुसर्याचा जीव धोक्यात घालतात. अलीकडे भाडेतत्त्वावर घेतल्या जाणार्या वाहनांमुळे गोव्यातील रस्त्यांवर अपघात वाढल्याचे दिसून आले आहे, त्याचप्रमाणे अपघातांमुळे मृत्यूंच्या संख्येतही वाढ झाली आहे. याला आळा घालणे आणि पर्यटकांची सुरक्षा राखणे या दृष्टीने वाहतूक पोलिसांनी गंभीर पावले उचलली आहे. उपाययोजना म्हणून भाडेतत्त्वावर वाहने घेणार्या पर्यटकांकडून आता हमीपत्र लिहून घेतले जाणार आहे, अशी माहिती वाहतूक पोलीस अधीक्षक राहुल गुप्ता यांनी दिली.
ते म्हणाले, ‘‘गोव्यात होणारे अपघात रोखण्यासाठी वाहतूक पोलीस विविध पातळीवर प्रयत्न करत आहेत. या अपघातांची नेमकी कारणे काय, याचाही अभ्यास केला जात आहे. पर्यटकांकडून घ्यायच्या हमीपत्राची छापील पत्र सिद्ध करण्यात आली असून त्यावर पर्यटक आणि भाडेतत्वावर वाहन देणारे व्यावसायिक यांची स्वाक्षरी असेल. त्याची एक प्रत पर्यटकाकडे आणि दुसरी प्रत व्यावसायिकाकडे असेल. हे हमीपत्र भरून घेण्याचे उत्तरदायित्व व्यावसायिकाकडे असेल.’’