पनवेलमध्ये भटक्या श्वानांच्या गळ्यात लसीकरणानंतर पट्टा बांधणार !

४८ लाख रुपये खर्च

पनवेल – भटक्या श्वानांच्या गळ्यात महापालिकेचा ‘क्युआर् कोड’ (त्वरित-प्रतिक्रिया कोड किंवा द्वि-आयामी मॅट्रिक्स बारकोड) ‘कॉलर बेल्ट’ (प्राण्याच्या गळ्यात लावायचा पट्टा) लावण्यात येणार आहे. लसीकरण पथकाच्या सोयीसाठी प्रत्येक श्वानाच्या गळ्यात हा पट्टा बांधण्यात येणार आहे. त्यामुळे पनवेलमधील सुमारे १७ सहस्र ५०० श्वानांना रेबीज लसीकरणानंतर हे पट्टे बांधण्यात येतील. मुंबई आणि पुणे महापालिकेने हा प्रयोग याआधी केला आहे. यासाठी एक कोटी ४८ लाख रुपयांचा खर्च येणार आहे. पनवेल महापालिका लसीकरणासाठी खासगी एजन्सीची नियुक्ती करणार आहे. प्रत्येक पट्टा ८४९ रुपये किमतीचा आहे. या पट्ट्यामुळे श्वानाने कोणत्या भागात भटकंती केली, ही माहितीही मिळेल. श्वानाचा मृत्यू झाल्यावरही महापालिकेला त्याची माहिती ठिकाणासह उपलब्ध होणार आहे.

केंद्र सरकारचा प्रकल्प

भारत देश रेबीजमुक्त करण्यासाठी केंद्र सरकारने संकल्प केला आहे. वर्ष २०३० पर्यंत भारत रेबीजमुक्त करण्यासाठी प्रयत्न केले जात आहेत. ‘एन्.ए.पी.आर्.ई. २०३०’ अंतर्गत सर्व श्वान आणि मांजर यांना लस देऊन लोकांमध्ये जनजागृती करण्यासाठी प्रयत्न केले जाणार आहेत.