Kerala Stray Dogs : भटक्या कुत्र्यांपेक्षा माणसांना प्राधान्य द्या; मात्र या कुत्र्यांवर अत्याचार करू नका !

  • केरळ उच्च न्यायालयाचे मत !

  • भटके कुत्रे पाळण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना परवाने देण्याचे केरळ सरकारला निर्देश

थिरूवनंतपूरम् (केरळ) – भटक्या कुत्र्यांपेक्षा माणसांना अधिक प्राधान्य दिले पाहिजे, असे आमचे मत आहे. त्यातही भटक्या कुत्र्यांपासून धोका निर्माण होत असल्याने खर्‍या श्‍वानप्रेमींनी कुत्रे पाळण्यासाठी परवाना घ्यावा, असे केरळ उच्च न्यायालयाने म्हटले आहे. तसेच या प्राण्यांचे संरक्षण करण्यासाठी भटके कुत्रे पाळण्यास इच्छुक असलेल्या व्यक्तींना परवाने देण्यासाठी नियम बनवावेत, असे निर्देश उच्च न्यायालयाने राज्य सरकारला दिले. देशभरातून भटक्या कुत्र्यांकडून आक्रमणे होत असल्याच्या बातम्या येत असल्याने लहान मुले, तरुण आणि वृद्ध यांना भटक्या कुत्र्यांपासून धोका असल्याचे न्यायालयाने मान्य केले.

उच्च न्यायालयाने मांडलेली सूत्रे

१. भटक्या कुत्र्यांचे आक्रमण होण्याची भीती असल्याने शाळकरी मुले एकटेच शाळेत जाण्यास घाबरतात. भटक्या कुत्र्यांचे संरक्षण केले पाहिजे; परंतु मानवी जीव गमावू नये.

२. भटकी कुत्री समाजात एक धोका निर्माण करत आहेत; मात्र भटक्या कुत्र्यांवर कारवाई केल्यास श्‍वानप्रेमी त्यांच्यासाठी लढा देतील. भटक्या कुत्र्यांवर माणसांची रानटी आक्रमणेेही होऊ दिले जाऊ नयेत, यात शंका नाही.