(‘फॉल्स सिलिंग’ म्हणजे वेगवेगळ्या सामग्रीपासून मूळ छपराखाली लावलेले आच्छादन)
वास्को, ६ मार्च (वार्ता.) : येथील सरकारी व्यायामशाळेतील ‘फॉल्स सिलिंग’चा काही भाग ५ मार्च या दिवशी सायंकाळी कोसळला; मात्र सुदैवाने कुणालाही दुखापत झाली नाही. या घटनेनंतर या व्यायामशाळेत येणार्यांमध्ये भीती पसरली आहे.
(सौजन्य : Herald Goa)
टिळक मैदान संकुलात शहरातील एकमेव सरकारी व्यायामशाळा आहे. खासगी व्यायामशाळांचे शुल्क अधिक असल्याने अनेक युवायुवती सरकारी व्यायामशाळेचा लाभ घेत आहेत. या व्यायामशाळेच्या ‘फॉल्स सिलिंग’चा भाग खाली लोंबकळत होता आणि तो कधी कोसळणार याचा नेम नव्हता. ५ मार्च या दिवशी सायंकाळी हा भाग कोसळला; मात्र या वेळी तेथे व्यायाम करणार्या युवतींची धावपळ उडाली. या व्यायामशाळेत नवीन उपकरणांचा अभाव आहे. पावसाळ्यात या व्यायामशाळेला गळती लागते. त्यामुळे ढोपरभर पाण्यात उभे राहून व्यायाम करण्याची पाळी संबंधित व्यायामपटूंवर येते. (ही आहे शासकीय सुविधांची स्थिती ! – संपादक) येथील व्यायामशाळेत नवीन उपकरणे आणि इतर सुविधा द्याव्यात, तसेच इमारतीची गळती थांबवावी, या मागण्या प्रलंबित आहेत. क्रीडामंत्री गोविंद गावडे यांनी पूर्वी या व्यायामशाळेला भेट देऊन ‘येथे लवकरच सुधारणा करणार’, असे आश्वासन दिले होते; मात्र आश्वासनाची पूर्तता झाली नाही.