Indian Navy : संरक्षणमंत्र्यांच्या हस्ते गोव्यातील नौदल युद्ध महाविद्यालयाच्या ‘चोल’ इमारतीचे उद्घाटन

छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या आधुनिक नौदलाचे प्रेरणास्रोत ! – संरक्षणमंत्री

‘चोल’ इमारतीचे उद्घाटन करतांना संरक्षणमंत्री राजनाथ सिंह, मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत आणि इतर

पणजी : वेरे येथील आय.एन्.एस्. मांडवी नौदल युद्ध महाविद्यालयाच्या ‘चोल’ या इमारतीचे ५ मार्च या दिवशी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी उद्घाटन केले. या वेळी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत, केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, नौदल प्रमुख ॲडमिरल आर्. हरि कुमार आणि वेस्टर्न अन् सदर्न नेव्हल कमांड्सचे ‘फ्लॅग ऑफिसर्स कमांडिंग इन चीफ’ आणि गोव्याचे मुख्य सचिव आय.ए.एस्. पुनीतकुमार गोयल आदी उपस्थित होते.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह म्हणाले,

‘‘प्राचीन सागरी साम्राज्य चोल राजवंशाच्या नावावरून नौदल युद्ध महाविद्यालयाच्या नव्या इमारतीला नाव दिले आहे. ही इमारत भारतीय नौदलाच्या आकांक्षा आणि सागरी उत्कृष्टता यांचा वारसा दर्शवते. नवीन नौदल युद्ध महाविद्यालय नौदलाला सुरक्षेतील नवीन उद्दिष्टे साध्य करण्यासाठी प्रोत्साहन देईल. भारतीय नौदलाने नवीन पायाभूत सुविधा, उपकरणे आणि युद्धविषयक पायाभूत सुविधा उभारण्यात उल्लेखनीय यश मिळवले आहे आणि त्याद्वारे देशाचे नौदल सामर्थ्य बळकट केले आहे. छत्रपती शिवाजी महाराज हे भारताच्या आधुनिक नौदलाचे प्रेरणास्रोत आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली भारतीय नौदलाने हिंद महासागर क्षेत्रात भारताच्या भूमिकेची पुनर्कल्पना आणि बळकटीकरण केले आहे. याआधी सागरी धोक्यांना तितकेसे महत्त्व दिले जात नव्हते. हिंद महासागराच्या प्रदेशामध्ये भारताच्या शत्रूंच्या वाढलेल्या हालचाली आणि या प्रदेशाचे व्यावसायिक महत्त्व लक्षात घेता, धोक्याच्या आकलनाचे पुनर्मूल्यांकन करणे आणि त्यानुसार देशाचे लष्करी संसाधन अन् धोरणात्मक लक्ष पुन्हा संतुलित करणे आवश्यक झाले आहे.’’

याप्रसंगी संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी कारवार येथील नौदल तळ येथे ‘सी बर्ड’ प्रकल्पांतर्गत २ मोठ्या घाटांचेही ‘ऑनलाईन’ उद्घाटन केले.