डॉ. दाभोलकरांची हत्या होण्यापूर्वी ते आदल्या रात्री आणि सकाळी कुठे होते ? हे सरकारी पक्ष सिद्ध करू शकलेला नाही ! – अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणातील अंतिम युक्तीवाद

पुणे – अंनिसच्या डॉ. नरेंद्र दाभोलकर यांच्या मृत्यूची नेमकी वेळ कोणती ? डॉ. दाभोलकर हे आदल्या रात्री ज्या इमारतीत थांबले होते, असा सरकारचा दावा आहे, त्या इमारतीत मोठ्या राजकीय पक्षांचे लोकप्रतिनिधी असतांना एकाही प्रत्यक्षदर्शीचा जबाब नोंदवण्यात आलेला नाही, तसेच डॉ. दाभोलकर हे घटनेच्या आदल्या रात्री तिथे आले किंवा सकाळी नेमके ते कुठे होते ? हे सांगणारी एकही साक्ष सरकार पक्षाच्या वतीने सादर करण्यात आलेली नाही. त्यामुळे डॉ. दाभोलकरांची हत्या होण्यापूर्वी ते आदल्या रात्री आणि सकाळी कुठे होते ? हे सरकारी पक्ष सिद्धच करू शकलेला नाही, असा युक्तीवाद अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी १ मार्च या दिवशी केला.

डॉ. दाभोलकर हत्या प्रकरणाची सुनावणी जिल्हा आणि सत्र न्यायाधीश पी.पी. जाधव यांच्या न्यायालयात चालू असून केंद्रीय अन्वेषण विभागाकडून (‘सीबीआय’कडून) विशेष सरकारी अधिवक्ता प्रकाश सूर्यवंशी हे या वेळी उपस्थित होते. या प्रकरणी अन्य संशयितांच्या वतीने मुंबई उच्च न्यायालयाचे अधिवक्ता वीरेंद्र इचलकरंजीकर हे २ मार्चला युक्तीवाद करणार आहेत.

अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांचा विशेष परिचय !

अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर

अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर हे ‘अधिवक्ता परिषदे’चे कोकण प्रांत उपाध्यक्ष, ‘दर्द से हम दर्द तक’, या सामाजिक संघटनेचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष आहेत. याचसमवेत ते ‘बेस्ट बेकरी’, ‘मालेगाव स्फोट प्रकरण’ यांसह अन्य काही प्रकरणांमध्ये हिंदुत्वनिष्ठांच्या बाजूने खटला लढवत आहेत.

अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी डॉ. हमीद दाभोलकर यांच्या जबाबातील न्यायालयासमोर मांडली विसंगती !

डॉ. हमीद दाभोलकर

१. डॉ. हमीद दाभोलकर यांनी त्यांच्या साक्षीत ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी आतंकवादविरोधी पथकाकडे सनातन संस्थेच्या विरोधात तक्रार केली होती’, असे सांगितले. प्रत्यक्षात त्यांनी केंद्रीय अन्वेषण यंत्रणा, पुणे पोलीस, राष्ट्रीय अन्वेषण यंत्रणा (एन्.आय.ए.), आतंकवादविरोधी पथक यांच्याकडे सादर केलेल्या तक्रारीची एकही प्रत सादर करू शकले नाहीत. याचसमवेत अशी कोणतीही तक्रार कोणत्याही अन्वेषण यंत्रणा सादर करू शकलेल्या नाहीत, तसेच कोणत्याच अन्वेषण यंत्रणांना पाठवलेले एकही ‘इ-मेल’ डॉ. हमीद हे न्यायालयात सादर करू शकलेले नाहीत.

२. अंधश्रद्धा निर्मूलन समितीत घेण्यात येणारे निर्णय हे ‘सर्वानुमते घेतले जात होते कि नाही ?’, हे मी सांगू शकत नाही’, असे डॉ. हमीद यांनी सांगितले. त्यामुळेच समितीत जो कोट्यवधी रुपयांचा व्यवहार चालत होता, त्यातून ही हत्या झाली का ? यादृष्टीने आजपर्यंत अन्वेषण झालेच नाही !

शवविच्छेदन करणारे डॉ. अजय तावरे यांच्या साक्षीतील फोलपणा उघड करणारी अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी मांडलेली सूत्रे !

१. शवविच्छेदन करतांना डॉ. अजय तावरे यांनी हातमोजे घातलेले नव्हते, तोंडावर मुखपट्टी (मास्क) लावलेली नव्हती, तसेच त्यांच्या पथकातील कोणताही डॉक्टर काहीही लिहून घेत नव्हता. शवविच्छेदन करतांना कोणत्याच यंत्राचा वापर करण्यात आला नाही.

२. शवविच्छेदन करतांना ‘रुग्णालय मॅन्युअल’ (माहिती पुस्तिका), ‘मेडिकल मॅन्युअल’ (वैद्यकीय माहिती पुस्तिका), तसेच मोदी-रेडी-पारिख समिती यांनी घालून दिलेल्या नियमावलीचे कोणतेही पालन करण्यात आलेले नाही.

३. शवविच्छेदन करतांना ते मध्ये मध्ये थांबवण्यात येत होते. त्यामुळे अन्वेषण यंत्रणांना जे हवे ते घालण्यासाठीच थांबवण्यात येत होते का ? असा दाट संशय येतो.

४. शवविच्छेदनप्रसंगी त्यांनी बंदुकाच्या गोळ्यांचा आकार मोजलेला नाही.

५. शवविच्छेदन करणारे डॉक्टर ‘मी डॉ. दाभोलकरांच्या मृतदेहाला स्पर्श केला कि नाही ? ते आठवत नाही’, असे सांगतात, तसेच ‘मी गोळ्या शरिरातून काढल्या का ?’, हेही आठवत नाही’, असे म्हणतात. या प्रसंगी ‘व्हिसेरा’ही (आतडी) घेण्यात आला नाही. त्यामुळे शवविच्छेदन करणार्‍या डॉक्टरांच्या अहवालावर विश्वास ठेवायचा का ? हा मोठा प्रश्न आहे.


अधिवक्ता प्रकाश साळसिंगीकर यांनी मांडलेली विशेष सूत्रे

१. अन्वेषण अधिकार्‍यांनी कोणताही ‘बॅलिस्टिक’ अहवाल अथवा ‘डॉ. दाभोलकर यांना लागलेली गोळी आणि न्यायालयात सादर करण्यात आलेली गोळी एकच होती’, याचा कोणताच पुरावा न्यायालयात सादर केलेला नाही.

२. या खटल्यातील अनेक महत्त्वाचे साक्षीदार अन्वेषण यंत्रणांनी पडताळलेले नाहीत.

३. डॉ. दाभोलकर यांच्याकडे जे भ्रमणभाषचे विदेशी ‘सीमकार्ड’ सापडले, त्याचे पुढे कोणतेच अन्वेषण करण्यात आलेले नाही, तसेच डॉ. दाभोलकर यांची हत्या होण्याच्या आदल्या दिवशी, तसेच सकाळी ते कुठे होते ? याचा भ्रमणभाषचा ‘सीडीआर्’ अहवाल न्यायालयात सादर करण्यात आलेला नाही.

४. डॉ. दाभोलकर यांना कोणत्या डॉक्टरांनी मृत घोषित केले, हे आजपर्यंत सरकारी पक्षाने सांगितलेले नाही.


अन्वेषण यंत्रणांनी केलेले अन्वेषण हे संशयितांना आणि सनातन संस्थेला जाणीवपूर्वक गुंतवण्याच्या दृष्टीकोनातून केले गेले. ही हत्या अंधश्रद्धा निर्मूलन समितीला मिळणार्‍या पैशाच्या आर्थिक व्यवहारातून झाली का ? डॉ. दाभोलकर यांना भूतकाळात ज्यांनी कुणी धमक्या दिल्या होत्या, त्यांच्याकडून हत्या झाली का ? अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे नक्षलवाद्यांशी संबंध होते, अशी वृत्ते आली होती आणि त्यातून हत्या झाली का ? यांसह अन्य कोणत्याच दृष्टीने अन्वेषण झालेले नाही. त्यामुळे सरकारी पक्ष हत्येचा जो ‘हेतू’ (मोटिव्ह) सांगत आहे, तो सिद्ध होत नाही.

‘डॉ. हमीद दाभोलकर यांनी ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर यांना ‘दुसरा गांधी करू’, अशी धमकी दिली होती’, असे सांगितले. प्रत्यक्षात अशी धमकी त्यांना कधी आणि कुठे दिली ? या संदर्भात ते कोणत्याही प्रकारचे पुरावे देऊ शकलेले नाहीत. यावरून सवंग प्रसिद्धीसाठी त्यांनी हे विधान केले होते, हेच सिद्ध होते’, असेही अधिवक्ता साळसिंगीकर यांनी न्यायालयात सांगितले.