Chhattisgarh Congress MLA Bowed Padri : छत्तीसगडमधील काँग्रेसच्या महिला आमदाराचा पाद्रयाच्या पायावर डोके टेकवल्याचा व्हिडिओ प्रसारित

  • पाद्रयामुळेच आमदार झाल्याचा दावा

  • भाजपची टीका

काँग्रेसच्या आमदार कविता प्राण लाहेरे

बिलाईगड (छत्तीसगड) – येथील काँग्रेसच्या आमदार कविता प्राण लाहेरे यांचा एक व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला आहे. आमदार पाद्री बाजिंदर सिंह याच्या सभेत उपचारासाठी गेल्या असतांनाचा हा व्हिडिओ आहे. यात आमदार कविता प्राण लहरे पाद्री सिंह याची स्तुती करतांना दिसत आहेत. त्या म्हणतात, ‘पाद्री बाजिंदर सिंह यांच्यामुळेच मी आमदार झाले.’ या व्हिडिओवरून भाजपने आमदार लहरे यांच्यावर टीका केली आहे.

१. या व्हिडीओमध्ये आमदार कविता लाहेरे या बाजिंदर सिंह याच्या समोर लोटांगण घालतांना दिसत आहेत. यानंतर बाजिंदर सिंग म्हणतो, ‘मी भाकीत केले होते आणि सांगितले होते की, घाबरण्याची आवश्यकता नाही. देव तुमचे काम करील.’ यानंतर आमदार कविता लहरे यांनी ‘जय ख्रिस्त, जय प्रभु येशू ख्रिस्त’ असे म्हटले.

२. हा व्हिडिओ भाजपचे माध्यम विभागाचे प्रमुख अमित चिमनानी यांनी शेअर करतांना लिहिले आहे की, छत्तीसगडच्या संस्कृतीचा प्रचार करत असल्याचा दावा करून काँग्रेसने ५ वर्षे कशाचा प्रचार केला, हे स्पष्ट झाले आहे.

३. यासमवेतच भाजपने आणखी एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिले की, या बिलाईगडच्या आमदार कविता प्राण लाहेरे आहेत. ‘पापाने (पाद्री बाजिंदर यांना ‘पिता’ असे उद्देशून) माझ्यासाठी सर्व काही केले आहे’, असे सांगून एका समाजाने तिचा बुद्धीभेद केला आहे. एका कुटुंबाला खूश करण्यासाठी काँग्रेसने छत्तीसगड आणि हिंदु संस्कृती यांवर आक्रमण केले आहे. त्यामुळे लोक काँग्रेसचा तिरस्कार करू लागले आहेत. आमदाराची ही अवस्था असेल, तर सर्वसामान्यांचे काय होणार ?

लोकप्रतिनिधी मंदिर, मशीद किंवा अन्य धार्मिक ठिकाणी गेल्यास भाजपचा आक्षेप का ? – काँग्रेस

काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष दीपक बैज यांनी भाजपच्या टीकेवर प्रत्युत्तर देतांना म्हटले की, जर कुणी लोकप्रतिनिधी मंदिर, मशीद किंवा कोणत्याही धार्मिक स्थळी गेला, तर भाजप आक्षेप का घेतो ? लोकांनी केवळ अयोध्येला जावे, केवळ प्रभु श्रीरामाचे नाव घ्यावे, इतर कुणाचेही नाव घेऊ नये, अशी भाजपची इच्छा आहे का ? भाजपला ही सर्व सूत्रे निवडणुकीच्या वेळीच आठवतात.

संपादकीय भूमिका

काँग्रेसवाल्यांनी अयोध्येतील श्रीराममंदिरात जाण्याचे टाळले; मात्र पाद्रयाच्या पायावर डोके टेकवायला त्यांना वेळ आहे, हे हिंदूंनी लक्षात ठेवावे !