‘साधकातील कौशल्य त्याचे आनंदाचे निधान (ठेवा) आहे’, याची साधकाला आलेली प्रचीती !

श्री. अनिल पाटील

१. तरण तलावातील मुलांना विनामूल्य पोहायला शिकवणे, गुरुकृपेने त्यातून समष्टी सेवा होणे आणि त्या सेवेतून आनंद मिळणे

‘मी सेवानिवृत्त झाल्यावर तरण तलावातील प्रशिक्षकांनी मला विचारले, ‘‘तुम्ही उन्हाळी शिबिरात मुलांना पोहायला शिकवायला याल का ? आम्ही मानधन देऊ.’’ मला पैसे घेऊन मुलांना पोहायला शिकवणे पटत नव्हते; म्हणून मी त्यांना नकार दिला.

तेव्हा गुरुमाऊलींच्या (सच्चिदानंद परब्रह्म डॉ. जयंत आठवले यांच्या) कृपेने माझ्या मनात विचार आले, ‘अध्यात्मप्रसारासाठी ही चांगली संधी आहे. माझ्यातील कौशल्याचा उपयोग केला, तर गुरुकार्य गतीने होऊन मला आनंद मिळेल. आपल्या जीवनाच्या ध्येयाची (अध्यात्मप्रचाराची) दोरी आपल्या हातात ठेवून जीवनरूपी भोवर्‍याला गती दिली की, जीवनात आनंदच आनंद मिळेल.’

त्यानंतर मी लहान मुलांना पोहण्याचे धडे दिले आणि मुलांच्या पालकांना साधनेविषयी माहिती सांगितली. गुरुमाऊलींच्या कृपेने मला लहान मुलांच्या सान्निध्यातील आनंदसागरात यथेच्छ डुंबता आले. आनंदाचे नाते आनंदाशी जुळले. ‘मुले ही माझ्यासाठी आराध्य दैवत आणि ‘त्यांना पोहण्याचे धडे देणे, पालकांना साधनेची गोडी लावणे’ ही पूजा अन् त्यांच्या चेहर्‍यावरील आनंद’ हा प्रसाद आहे’, हे मला अनुभवता आले.

२. ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतील महत्त्वाची सूत्रे आणि लेख यांचे लिखाण करून ते जिज्ञासू अन् साधक यांना वाचायला देणे

कोरोना महामारीच्या कालावधीत तरण तलाव बंद होता. गुरुमाऊलींच्या कृपेने मला सुचले, ‘सनातन प्रभात’ नियतकालिकांतील महत्त्वाची सूत्रे आणि लेख यांचे वहीत लिखाण करूया.’ त्यानुसार मी ८ – १० वह्यांमध्ये लिखाण केले. मी काही धारिका बनवल्या आणि त्या जिज्ञासू अन् साधक यांना वाचायला दिल्या. त्यांना त्याचा पुष्कळ लाभ झाला.

३. अध्यात्मप्रचार केल्यामुळे मुलांना नामजपाची गोडी लागणे आणि जिज्ञासू अन् साधक यांची तळमळ आणि भाव वाढायला साहाय्य होणे

मी मुलांना ‘संघर्ष’ या शब्दाचा गूढार्थ सांगितला, ‘संघर्ष म्हणजे संघ + हर्ष. देवाला समवेत घेऊन प्रयत्न केल्यास आनंद मिळतो.’ मी मुलांना सांगितले, ‘‘गणपति विद्येची देवता आहे. तुम्ही अभ्यास चालू करण्यापूर्वी १५ मिनिटे गणपतीचा नामजप केल्यास तुमचा अभ्यास चांगला होईल आणि तुम्हाला परीक्षेत चांगले यश मिळाल्याने आनंद होईल.’’ त्यामुळे मुलांना नामजपाची गोडी लागली, तसेच जिज्ञासू आणि साधक यांची तळमळ अन् भाव वाढायला साहाय्य झाले. माझा समष्टी भाव वाढायला साहाय्य झाले. काही जिज्ञासू संस्थेशी जोडले गेले. मला गुरुमाऊलींची कृपा अनुभवता आली.

४. अंतरंगात आनंद असेल, तर तो अनुभवता येणे आणि त्यासाठी तशी दृष्टी आवश्यक असणे

‘आनंद हा सगळीकडे परब्रह्मरूपाने प्रकृतीच्या माध्यमातून भरून राहिला आहे. अंतरंगात आनंद असेल, तर तो अनुभवता येतो. त्यासाठी तशी दृष्टी असावी लागते. आपल्यातील कुठलेही कौशल्य हे आपले आनंदाचे निधान (ठेवा) आहे. मुले, समाज आणि साधक हे चैतन्याचे प्रवाह आहेत’, असे मला जाणवले अन् आनंद झाला. आनंदाची देवाण-घेवाण झाल्यामुळे चित्तशुद्धी झाल्याचे मला अनुभवता आले.

गुरुमाऊलींनी मला हे विचार सुचवले, माझ्या कृतीत आणून घेतले आणि मला आनंद दिला, त्याबद्दल त्यांच्या चरणी कोटीश: कृतज्ञता !’

– श्री. अनिल पाटील (आध्यात्मिक पातळी ६८ टक्के, वय ७७ वर्षे), नाशिक (३.११.२०२३)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक