बरेली (उत्तरप्रदेश) येथे कोठडीतून दोन कुख्यात गुंड पसार : ३ पोलीस निलंबित !

बरेली (उत्तरप्रदेश) – येथील जिल्हा न्यायालयात उपस्थित रहाण्यासाठी आणलेले दोन कुख्यात गुंड न्यायालयात असलेल्या कोठडीमधून पसार झाले. ते दोघे कारागृहाच्या खिडकीच्या लोखंडी सळ्या कापून बाहेर पडले आणि पसार झाले. या घटनेनंतर ३ पोलिसांना निलंबित करण्यात आले आहे.

वरिष्ठ पोलीस अधीक्षक (एस्.एस्.पी.) घुले सुशील चंद्रभान यांनी सांगितले की, पसार आरोपींना पकडण्यासाठी ४ पथके सिद्ध करण्यात आली आहेत. अंकित यादव आणि सचिन सैनी अशी आरोपींची नावे आहेत. अंकित यादव विरुद्ध चोरी, दरोडा आणि अपहरण यांसह भारतीय दंड संहितेच्या गंभीर कलमांतर्गत ४७ गुन्हे नोंद आहेत. सचिन सैनी याच्यावर ‘गँगस्टर अ‍ॅक्ट’च्या अंतर्गत गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

पोलीस उपनिरीक्षक वीरेंद्र कुमार यांनी सांगितले की, अंकित यादव आणि सचिन सैनी यांना नुकतेच मुख्य न्यायदंडाधिकारी आणि अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी यांच्या न्यायालयात उपस्थित केले होते. त्यांच्यासोबत एकूण ५५ कैद्यांना न्यायालयात उपस्थित करण्यासाठी आणले होते. अंकित यादव आणि सचिन सैनी यांच्या सुरक्षेसाठी तैनात असलेले पोलीस त्यांना परत नेण्यासाठी कोठडीच्या ठिकाणी पोचले असता दोन्ही चोरटे बेपत्ता असल्याचे आढळून आले. या घटनेविषयीची माहिती मिळताच वरिष्ठ पोलीस अधीक्षक घुले सुशील चंद्रभान आणि पोलीस अधीक्षक (शहर) राहुल भाटी घटनास्थळी पोचले. दोन्ही कुख्यात गुन्हेगारांचा कसून शोध चालू आहे.

संपादकीय भूमिका 

कोठडीमध्ये असलेल्या गुन्हेगारांना सांभाळू न शकणारे पोलीस आतंकवाद्यांना काय पकडणार ? अशा पोलिसांना केवळ निलंबित न करता बडतर्फ करून त्यांना कठोर शिक्षा द्यायला हवी !