टोळीचा मुख्य सूत्रधार तमिळ चित्रपट निर्माता !
नवी देहली – अमली पदार्थ नियंत्रण विभाग आणि देहली पोलीस यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत आंतरराष्ट्रीय अमली पदार्थांची तस्करी करणारे जाळे उद्ध्वस्त करण्यात आले आहे. या प्रकरणी ३ जणांना अटक करून त्यांच्याकडून ५० किलो स्यूडोफेड्रिन हे अमली पदार्थही जप्त करण्यात आले. या जाळ्याचा मुख्य सूत्रधार तमिळ चित्रपट निर्माता असून तो पसार आहे. या टोळीने गेल्या ३ वर्षांत अनुमाने २ सहस्र कोटी रुपयांच्या अमली पदार्थांची तस्करी केली आहे. ‘मिश्र अन्न पावडर’ आणि वाळलेल्या नारळात लपवून हे अमली पदार्थ ऑस्ट्रेलिया अन् न्यूझीलंड येथे पाठवले जात होते.
स्यूडोफेड्रिन म्हणजे काय ?
स्यूडोफेड्रिन हे एक प्रकारचे रसायन आहे, ज्यापासून मेथॅम्फेटामाइन बनवले जाते. हे एक प्रकारचे अमली पदार्थ आहे, ज्याला आंतरराष्ट्रीय बाजारात प्रचंड मागणी आहे. अहवालानुसार ऑस्ट्रेलिया आणि न्यूझीलंड या देशांमध्ये या अमली पदार्थाचे मूल्य दीड कोटी रुपये प्रति किलो आहे. जर एखाद्या व्यक्तीकडे स्यूडोफेड्रिन असेल किंवा तिने त्याचा व्यापार केला असेल, तर तिला १० वर्षांपर्यंत तुरुंगवासाची शिक्षा होऊ शकते.