Ajmer Sharif On CAA : सुधारित नागरिकत्व कायद्यामुळे मुसलमानांचे नागरिकत्व जाणार, हा अपप्रचार !

  • अजमेर दर्ग्याचे दिवाण सैयद जैनुल आबेदीन यांची स्पष्टोक्ती !

  • काशी आणि मथुरा येथील मंदिरांचे प्रकरण न्यायालयाबाहेरच सामोपचाराने सोडवण्याचे आवाहन

अजमेर दर्ग्याचे दिवाण सैयद जैनुल आबेदीन

अजमेर (राजस्थान) – सुधारित नागरिकत्व कायदा (सीएए) हा भारताच्या शेजारील देशांतून येणार्‍या शरणार्थींना भारताचे नागरिकत्व देण्यासाठी आहे. या कायद्यामुळे भारतातील कोणत्याही मुसलमानाचे नागरिकत्व काढून घेण्यात येणार नाही.  नागरिकत्व काढले जाणार, हे अपप्रचार आहे, अशी स्पष्टोक्ती येथील मोईनुद्दीन चिश्ती दर्ग्याचे दिवाण सैयद जैनुल आबेदीन यांनी मुसलमानांना उद्देशून दिली. ते येथे आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते. ‘सीएए कायदा मुसलमानांच्या विरोधात आहे का ?’ असा प्रश्‍न त्यांना विचारण्यात आला होता. तसेच त्यांनी काशी आणि मथुरा येथील मंदिरांच्या संदर्भात दोन्ही पक्षांनी न्यायालयाबाहेर चर्चा करून सोडवावा, असेही आवाहन केले.

दिवाण आबेदिन यांनी मांडलेली सूत्रे

१. गृहमंत्र्यांनी संसदेत जे सांगितले तेच मी सांगत आहे. बांगलादेश, पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि म्यानमार या देशांतून भारतात स्थलांतरित झालेल्या आणि सध्या येथे वास्तव्य करणार्‍यांसाठी सीएए कायदा असल्याचे संसदेतील प्रत्येकाने म्हटले आहे.

२. या देशांतून येणार्‍या लोकांना भारतीय नागरिकत्व दिले जाते का ? तर नाही. हा कायदा केवळ त्यांच्यासाठीच आहे. भारतातील मुसलमान का घाबरत आहेत ? हा कायदा  त्यांच्यासाठी नाही. यामुळे नागरिकत्व रद्द होत नाही. बस एवढेच. तुम्हाला सांगतो की, ‘सीएए कायदा मुसलमानांचे नागरिकत्व रहित करण्यासाठी आणण्यात आला आहे’, असा प्रचार देशातील मुसलमानांमध्ये करण्यात आला होता.

न्यायालयाच्या निर्णयाने कटुता येण्यापेक्षा आधीच तोडगा काढा ! – सैयद जैनुल आबेदीन, दिवाण, अजमेर दर्गा

काशी आणि मथुरा येथील मंदिरांचा वाद अद्याप न्यायालयासमोर प्रलंबित आहे. त्यामुळे त्यावर भाष्य करता येणार नाही. आमच्या भूतकाळातील अनुभवानुसार आम्हाला असे वाटते की, या प्रश्‍नावर न्यायालयाबाहेरच तोडगा काढता आला, तर ते दोन्ही पक्षांच्या हिताचे आहे. त्यामुळे दोन्ही बाजूंमध्ये निर्माण होणारी कटुता टाळली जाईल. तेथे शांतता निर्माण होईल. कारण ज्याच्या बाजूने निर्णय येईल तो न्यायालयाच्या निर्णयाने खूश होईल आणि ज्याच्या विरुद्ध येईल त्याच्या मनात कटुता येईल. मग ते का करायचे ?

धर्म आणि राजकारण यांचे महत्त्व !

पूर्वी राजघराण्यांसाठी धर्मगुरु असायचे. ज्यांच्याशी चर्चा करून राजा निर्णय घेत होता. आज मात्र ‘धर्म म्हणजे राजकारण’ असे नवीन चित्र निर्माण करण्यात आले आहे. गोरखपूर येथील गीता प्रेस भारतात सर्वांत प्रसिद्ध आहे. या प्रेसची वर्ष १९५७ ची ‘श्री कल्याण’ ही आवृत्ती आहे. खूप जाडजूड पुस्तक आहे. त्या पुस्तकातील पृष्ठ क्रमांक ७७१ आणि ७७२ वरील श्‍लोकामध्ये म्हटले आहे, ‘जर राजकारण धर्मापासून वेगळे झाले, तर राजकारण विधवा होईल आणि धर्म राजकारणापासून विभक्त झाला, तर धर्म विधुर होईल. (विधुर म्हणजे ज्याची पत्नी मरण पावली आहे). – सैयद जैनुल आबेदीन, दिवाण, अजमेर दर्गा

संपादकीय भूमिका

काशी आणि मथुरा येथे हिंदूंची मंदिरे होती. त्यामुळे ती हिंदूंना देऊन टाकावीत, असे आबेदीन यांनी स्पष्टपणे मुसलमानांना म्हणणे अपेक्षित आहे !