Mizo Students’ Union Threat : जर मिझोरामच्या लोकांना हाकलून लावले, तर आम्ही मैतेईंना राज्यातून हाकलून देऊ !

मिझोराम विद्यार्थी संघटनेची मणीपूरच्या मुख्यमंत्र्यांना धमकी !

मणीपूरचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह

इंफाळ (मणीपूर) – जर तुम्ही (मणीपूर सरकारने) मणीपूरमधून कोणत्याही मिझो किंवा आदिवासी व्यक्तीला बाहेर काढले, तर आम्ही मिझोराममध्ये रहाणार्‍या सर्व मैतेईंनाही हाकलून देऊ, अशी धमकी मिझो स्टुडंट्स युनियनने (एम्.एस्.यू.) या मिझोरामच्या विद्यार्थी संघटनेने दिली आहे. मणीपूरचे मुख्यमंत्री एन्. बिरेन सिंह यांच्या १२ फेब्रुवारी या दिवशी ‘वर्ष १९६१ नंतर मणीपूरमध्ये येणार्‍या प्रत्येक व्यक्तीची ओळख पटवून राज्याबाहेर हाकलून दिले जाईल. ते कोणत्याही जातीचे किंवा समाजाचे असले, तरी त्यांना वगळण्यात येईल’, असे विधान केले होते. त्याला प्रत्युत्तर म्हणून एम्.एस्.यू.ने ही धमकी दिल्याचे मानले जात आहे. विद्यार्थी नेत्याचे म्हणणे आहे की, मिझोराममध्ये रहाणार्‍या सर्व मैतेईंची विस्तृत सूचीदेखील सिद्ध करण्यात आली आहे.

मिझोराम सरकारने म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालण्याच्या निषेधार्थ आणि मुक्त हालचाली थांबवण्याच्या निषेधार्थ वर्ष १९५० नंतर राज्यात येणार्‍या लोकांना भूमी खरेदी करण्यास किंवा मालकी हक्क संपादन करण्यावर बंदी घालणारी नोटीसही प्रसारित केली आहे.

संपादकीय भूमिका

मैतेई हिंदूंना हाकलून देण्याची धमकी देणार्‍या संघटनेवर बंदी घालून सर्व पदाधिकार्‍यांना कारागृहात डांबण्याचे धाडस सरकारने दाखवले पाहिजे !