दुधाळी नाल्याचे सांडपाणी पंचगंगा नदीत मिसळल्याने मोठ्या प्रमाणात प्रदूषण ! – सुशील भांदिगरे, पंचगंगा विहार मंडळ

वेळीच उपाययोजना न केल्यास आंदोलन

नदी प्रदूषण (प्रतिकात्मक चित्र )

कोल्हापूर – दुधाळी नाल्याचे सांडपाणी पंचगंगा नदीत सातत्याने मिसळत असल्याने नदी मोठ्या प्रमाणात प्रदूषित होत आहे. या सांडपाण्यामुळे नदीच्या पाण्यावर तवंग दिसत असून काठावर मोठ्या प्रमाणात कचरा आहे. अनेकजण नदीमध्ये पोहण्यासाठी येतात, त्यांच्या आरोग्याला मोठ्या प्रमाणात धोका निर्माण झाला आहे, तसेच यातून कोल्हापूर शहराला जे पिण्याचे पाणी वापरले जाते. त्यामुळे शहरातील नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे. याकडे प्रदूषण मंडळ आणि महापालिका प्रशासन यांचे दुर्लक्ष होत आहे. हे प्रदूषण थांबवण्यासाठी महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ यांनी वेळीच उपाययोजना केली नाही, तर आंदोलन केले जाईल, अशी चेतावणी जुना बुधवार पेठ आणि पंचगंगा विहार मंडळाचे सदस्य श्री. सुशील भांदिगरे यांनी दिली आहे.

या संदर्भात दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, एकीकडे केंद्र सरकार गंगा नदी स्वच्छता अभियान राबवत आहे, अशा वेळी स्थानिक प्रशासन नदीची स्वच्छता का करत नाही ? जयंती नाल्यातील (जी पूर्वी जयंती नदी म्हणून ओळखली जायची) सांडपाणी उपसा करणारी यंत्रणा असूनही तेथून प्रतिदिन सांडपाणी वाहून नदीत जाते. याकडे लक्ष दिले जात नाही. यामुळे गेल्याच आठवड्यात पंचगंगा नदीत मोठ्या प्रमाणात जलपर्णी आढळली होती, तसेच प्रदूषित पाण्यामुळे मासे मृत्यूमुखी पडले होते.

संपादकीय भूमिका :

दायित्वशून्य महापालिका प्रशासन आणि प्रदूषण मंडळ !