भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक १६)
१. त्याग आणि दुःखरहित समाधानी वृत्तीमुळे मिळालेले स्वर्गारोहणाचे वरदान
‘ॐ भवति भिक्षां देहि ।’ (अर्थ : हे माते, मला भिक्षा वाढ), अशी हाक येताच, महर्षींनी दाराकडे पाहिले. एक सामान्य अतिथी भिक्षा मागत होता. महर्षींनी स्वीकारलेला ‘शिलोंछवृत्ती’ नामक व्रताप्रमाणे ते प्रति १५ दिवसांनी केवळ एक द्रोण अन्न घ्यायचे. १५ दिवसांच्या उपवासानंतर सिद्ध केलेले अन्न अतिथीला देऊन महर्षींनी पुन्हा स्वतःच्या तपाला आरंभ केला. त्यानंतर १५ दिवसांनी अन्न सिद्ध करून ते भोजनासाठी बसले आणि तोच अतिथी भिक्षा मागू लागला. पुन्हा महर्षींनी स्वतः उपाशी राहून अन्नाचा द्रोण त्याला दिला. असे ६ वेळा घडले. महर्षि ३ मास उपाशी राहिले. त्यांचा त्याग आणि दुःखरहित समाधानी वृत्ती पाहून अतिथीने आपले खरे रूप प्रकट केले. तो अतिथी म्हणजे महर्षि दुर्वास होते आणि या अतिथीला भिक्षा घालणारे महर्षि मुद्गल होते. प्रसन्न होऊन दुर्वासांनी मुद्गलांना स्वर्गारोहणाचे वरदान दिले.
२. स्वर्गापेक्षा भारतभूमीत राहून तप, साधना, भक्ती आणि ज्ञानकार्य करण्यात अधिक आनंद मानणे
या वरदानाचा प्रत्यय अल्प काळातच आला. स्वर्गातील देवदूत महर्षि मुद्गलांना आदरपूर्वक स्वर्गात नेण्यासाठी विमान घेऊन आले; मात्र महर्षिंनी नम्रतेने त्यांना नकार दिला. देवदूतांनी महर्षींना विचारले, ‘‘आपण स्वर्ग का नाकारता ?’’ महर्षि मुद्गल म्हणाले, ‘‘स्वर्गामध्ये दोष आहेत. पुण्यक्षय होताच, त्या त्या व्यक्तीला कठोरपणे स्वर्गाबाहेर काढले जाते. तेथे प्रेम, सहानुभूती दाखवली जात नाही. हा स्वर्गाचा पहिला दोष ! दुसरा दोष म्हणजे आपल्यापेक्षाही पुण्यवान व्यक्तीला अधिक सुख मिळते, हे पाहून असुया निर्माण होते, म्हणजे स्वर्गात मत्सर होतो. तेथेही निर्भेळ सुख उपभोगता येत नाही. स्वर्गाचा तिसरा दोष म्हणजे तेथे यज्ञ, तप, व्रत इत्यादी करण्याची सोय नाही. अशा दोषपूर्ण स्वर्गात यायची माझी इच्छा नाही. मला या भारतभूमीत राहून तप, साधना, भक्ती आणि ज्ञानकार्य करण्यात अधिक आनंद वाटतो.’’ महर्षि मुद्गलांना सादर वंदन करून देवदूत निघून गेले. स्वर्ग नाकारणारे हे महात्मा म्हणजे भगवान श्री गणेशाचा अंश असलेले महर्षि मुद्गल !
३. महर्षि मुद्गल यांचा जन्म आणि वेदाभ्यास !
महर्षि अंगिरस आणि त्यांची पत्नी श्रुती यांच्यासमोर एका सुमुहूर्तावर श्री गणेश बालरूपात प्रगटले. त्या दांपत्याने बालकाचा पुत्र म्हणून सांभाळ केला. उपनयन संस्कारानंतर मुद्गल अंगिरसांच्या आश्रमातच वेदाध्ययन करू लागले. वडील असलेले महर्षि अंगिरस आता मुद्गलांचे गुरु झाले. पिता-पुत्र, गुरु-शिष्य या भूमिकेत असलेले ते दोघेही श्रेष्ठ होते. विद्या म्हणजे केवळ शब्द ज्ञान नव्हे, पाठांतर नव्हे, ही त्यांची भूमिका होती. महर्षि अंगिरसांनी मुद्गलाला गणेशाविषयी तत्त्वज्ञानाचे धडे द्यायला आरंभ केला. ते धडे शिकून शांत न बसता मुद्गलाने विदर्भ प्रांती, श्रीक्षेत्र अदोष येथे गणेश आराधनेला आरंभ केला. कठोर तपश्चर्या करून तो ‘गणेशाचार्य मुद्गल’ झाला.
४. मुद्गल पुराणाची निर्मिती
भारतीय संस्कृतीने, मानवी समाजाला धर्म, अर्थ, काम, मोक्ष हे पुरुषार्थ दिले आहेत. अर्थ आणि काम, या माध्यमातून सुख मिळवत असतांना धर्माचे बंधन आणि मोक्षाचे ध्येय विसरू नये, हा या संस्कृतीचा संदेश आहे. त्याचप्रमाणे बहुसंख्य ऋषि गृहस्थाश्रमी होते. महर्षि मुद्गलांनीही गृहस्थाश्रम नाकारला नाही. महर्षि अत्रींची कन्या अत्रेयी हिच्याशी ते संसारबद्ध झाले; मात्र संसार हेच सर्वस्व न मानता पहिल्या अपत्यानंतर ते विरक्त वृत्तीने गृहस्थाश्रमात राहू लागले. गणेश आराधनेचा उपदेश लोकांना करणे, हे ध्येय त्यांनी ठरवले. त्याप्रमाणे अध्यापन करू लागले. मौखिक ज्ञानाच्या मर्यादा लक्षात घेऊन त्यांनी श्री गणेशाविषयीचा ग्रंथ निर्माण करण्याचे कार्य चालू केले. त्यांचे हे कार्य पूर्णत्वाला गेले, तेव्हा ९ खंडामध्ये मुद्गल पुराणाची निर्मिती झाली होती.
मुद्गल पुराणाच्या निर्मितीचे निमित्त होते, प्रजापतींचा राजा दक्ष ! दक्षाने आपली कन्या सती हिच्या पतीची म्हणजे भगवान शंकरांची निंदा केली. ते सहन न होऊन सतीने स्वतःचा देह यज्ञात समर्पित केला. यामुळे क्रोधित झालेल्या शंकरांनी दक्षाला शाप दिला. स्मृतीभ्रंश आणि ज्ञानभ्रंश झालेल्या दक्षाची भेट भारत भ्रमण करत असलेल्या महर्षि मुद्गलांशी झाली. महर्षि मुद्गलांनी गणेश तत्त्वज्ञानाचा उपदेश दक्षाला केला. हा उपदेश म्हणजे मुद्गल पुराण होय.
५. विकारांचे वर्चस्व नष्ट करून योग्य मर्यादेत त्यांचे अस्तित्व ठेवावे, ही शिकवण देणारे मुद्गल पुराण !
गणेश पुराणामध्ये गणेशाचे आख्यान आहे. मुद्गल पुराण हे गणेश पुराणानंतर रचले गेले आहे. मुद्गल पुराणामध्ये गणेश कथांसमवेत आध्यात्मिक विवेचनही समाविष्ट आहे. या पुराणाचे ९ खंड आणि ४२७ अध्याय आहेत. या ९ खंडांमध्ये अनुक्रमे वक्रतुंड, एकदंत, महोदर, गजानन, लंबोदर, विकट, विघ्नराज, धूम्रवर्ण असे ८ विनायक वर्णिले आहेत आणि ९व्या खंडात योगमार्गाचे वर्णन आहे. ८ खंडामध्ये ८ राक्षस म्हणजे मत्सरासुर, मदासुर, मोहासुर, लोभासुर, क्रोधासुर, कामासुर, ममतासुर आणि अहंकारासुर हे आहेत, तसेच त्यांच्या पत्नी आशा, तृष्णा, इत्यादी आणि पुत्र दंभ, दर्प इत्यादी, अशी सर्व मानवी भावनांची रूपे दर्शवली आहेत. प्रत्येक खंडातील गणेश अवतार या राक्षसांशी संघर्ष करून त्यांना अभय देतो आणि आपल्या चरणाशी स्थान देतो. एकाही खंडात राक्षसाचा मृत्यू झालेला नाही; कारण हे राक्षस म्हणजे मानवी विकार आहेत. विकार नष्ट करणे, हे निरर्थक आहे; कारण विकारांशिवाय जीवन नाही. विकारांचे वर्चस्व नष्ट करून योग्य मर्यादेत त्यांचे अस्तित्व ठेवावे, ही शिकवण या कथांमध्ये दिसून येते.
महर्षि मुद्गलांच्या मते, विकार पूर्ण नाहिसे करणे अशक्य आहे. एखाद्या सर्पाला न मारता केवळ त्याचे दात काढून गळ्यात मिरवले, तर तो बाधक ठरणार नाही. अशा प्रकारे विकारांना नष्ट न करता त्यांचा प्रभाव अल्प केला पाहिजे.
गणेशभक्तीचे आध्यात्मिक मार्गदर्शन करणार्या महर्षि मुद्गलांचा हा संदेश आजही मानवी जीवनाला हितकारक आहे.’
– स्वाती आलूरकर ( साभार : ‘मासिक’ मनशक्ती, सप्टेंबर २००६)