मातीच्या गोळ्याला आकार देऊन घडवतात, तसे साधकाला आध्यात्मिक दृष्टीकोन देऊन छायाचित्रे काढण्यास घडवणार्‍या श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ !

‘डिसेंबर २०१४ ते एप्रिल २०२१ या कालावधीत मी रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात चित्रीकरण संबंधित सेवा करत होतो. त्या वेळी मी पुढाकार घेऊन सेवा करत नव्हतो. मला जिज्ञासा आणि साधनेची तळमळ नसल्याने मी छायाचित्रे काढण्याची नवीन सेवा शिकून घेत नव्हतो. मे २०२१ पासून मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ यांच्या दैवी दौर्‍याच्या वेळी सेवा करण्यासाठी गेलो. आरंभी मला काहीच येत नव्हते. मी एखाद्या मातीच्या गोळ्याप्रमाणे होतो. त्या गोळ्याला आकार देण्यासाठी प.पू. गुरुदेवांनी मला श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्याकडे सोपवले होते. त्यांच्यासह सेवा करतांना मला शिकायला मिळालेली सूत्रे येथे दिली आहेत.

‘तुमच्यामध्ये गुणांची वृद्धी झाली की, तुम्ही कोणतीही सेवा परिपूर्ण करू शकता !

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

‘देवाला अपेक्षित काय आहे’, हे देव तुम्हाला आतून सुचवतो आणि ती सेवा परिपूर्ण होऊन तुमची साधना होते. तुमच्यामध्ये एखादा गुण निर्माण झाल्यावर तुम्ही चित्रीकरणाची सेवा करा किंवा स्वयंपाकघरात सेवा करा, तो गुण ‘ईश्वराला जे अपेक्षित आहे’, तशी सेवा करून घेतो.’

– श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली मुकुल गाडगीळ

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांच्या वाढदिवसाच्या सोहळ्याची छायाचित्रे काढू शकणे

श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ

नवरात्रीच्या कालावधीत आम्ही रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात आलो होतो. १४.१०.२०२३ या दिवशी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा सिंगबाळ यांचा वाढदिवस होता. खरंतर मी आश्रमातील अशा कार्यक्रमांची छायाचित्रे काढली नव्हती; पण त्या दिवशी मनात कुठलीही भीती न ठेवता मी वाढदिवसानिमित्त झालेल्या सोहळ्याची छायाचित्रे काढण्याची सेवा करू शकलो. ‘ही सेवा करण्याची शक्ती तीन गुरु देत आहेत’, असे मला सतत जाणवत होते.

– श्री. वाल्मिक भुकन


१. आरंभी छायाचित्रे काढण्याच्या सेवेची भीती वाटणे; परंतु श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी सांगितल्यावर सहसाधकाच्या साहाय्याने सेवा करणे

श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या समवेत सेवेला गेल्यावर त्यांनी आरंभी मला छायाचित्रे काढण्याची सेवा दिली. प्रत्यक्षात मी पूर्वी छायाचित्रीकरण करण्याच्या सेवेत असतांना छायाचित्रे काढण्याची सेवा शिकण्याचे टाळले होते. ‘मी छायाचित्रे काढण्याची सेवा कशी काय करू ? त्यामध्ये चुका होतील’, अशी मला भीती वाटायची. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला ही सेवा श्री. स्नेहल राऊत (आध्यात्मिक पातळी ६१ टक्के) यांचे साहाय्य घेऊन करण्यास सांगितली. मी सहसाधकाचे साहाय्य घेऊन आणि त्यांना विचारून सेवा करत होतो.

श्री. वाल्मिक भुकन
श्री. वाल्मिक भुकन

२. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी ‘देवच सेवा करून घेईल’, अशी श्रद्धा ठेवून संतसन्मान सोहळ्याची छायाचित्रे एकट्यालाच काढण्यास सांगणे

एके दिवशी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ मला म्हणाल्या, ‘‘यापुढे तू एकट्यानेच छायाचित्रे काढण्याची सेवा करायची.’’ आता मी गुर्वाज्ञा म्हणून सेवा करायचे ठरवले. जयपूर, राजस्थान येथे एका संतसन्मान सोहळ्यात (हितचिंतक वारीद सोनी यांच्या वडिलांचे संतपद घोषित करण्याच्या कार्यक्रमात) छायाचित्रे काढायची होती. त्यामध्ये माझ्याकडून चुका होऊ नयेत; म्हणून मी श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना ‘दुसर्‍या साधकांनी छायाचित्रे काढली, तर बरे होईल’, असे सुचवले. तेव्हा श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ म्हणाल्या, ‘‘छायाचित्रे तूच काढायची आहेस. छायाचित्रे काळी आली, तरी चालतील; पण ती तुलाच काढायची आहेत. ‘देवाने आतापर्यंत माझ्याकडून अन्य सेवा करून घेतली आहे. मग हीसुद्धा करून घेईल’, अशी श्रद्धा निर्माण व्हायला हवी.’’

३. गुरूंवर श्रद्धा ठेवून सेवा केल्याने त्यात यश मिळणे आणि सेवेतून आनंदही मिळणे

प्रत्येक छायाचित्र काढतांना मी गुरुस्मरण आणि नामजप करत काढत होतो. सर्व सोहळा छान झाला. रात्री श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला विचारले, ‘‘आज सेवा करतांना मनात काय विचार होते ?’’ तेव्हा मी त्यांना सांगितले, ‘‘आज पहिल्यांदा सेवा काय असते आणि त्या सेवेतून मिळणारा आनंद कसा असतो ?’, ते मला अनुभवता आले. मन पूर्णपणे निर्विचार होते. ‘गुरूंवर श्रद्धा ठेवून केलेली सेवा कधीही असफल होत नाही, भलेही आपण त्यामध्ये पुष्कळ शिकलेलो नसो. गुरु त्या वेळी ते सर्व करून घेतात. आपण केवळ आपली श्रद्धा अल्प पडू द्यायची नाही’, हे मला शिकायला मिळाले.’’

४. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी आध्यात्मिक दृष्टीने सेवेकडे बघायला शिकवणे

मी काढलेली छायाचित्रे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांना आवडली. त्यांनी मला एका छायाचित्रात झालेली चूक पुढील वेळी सुधारायला सांगितली. त्या म्हणाल्या, ‘‘ही चूक या पुढच्या छायाचित्रांमध्ये होऊ न देणे, हे खरे शिकणे.’’ अशा प्रकारे श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांनी मला सेवेकडे आध्यात्मिकदृष्टीने पहायला शिकवले. त्यामुळे सेवा करतांना आत्मविश्वास वाढून मनातील भीती नाहीशी झाली.

५. श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ यांच्या कृपेने छायाचित्रे काढण्याच्या सेवेत आत्मविश्वास निर्माण होणे

मी हळूहळू छायाचित्रे काढण्याच्या सेवेतील बारकावे शिकून घेतले. पूर्वी ‘क्लोज अँगल’वर मला चित्रीकरण करायला जमेल ना ?’, अशी मनात भीती असायची. श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ यांच्या कृपेने सेवेविषयी मनातील भीती जाऊन आत्मविश्वास निर्माण झाला आहे. त्यामुळे ‘उत्तरदायी साधक ज्या छायाचित्राचे नियोजन करतील, त्या ठिकाणी जाऊन गुरूंना अपेक्षित अशी सेवा करायची’, असा विचार मनात येतो.

श्रीचित्‌शक्ति (सौ.) अंजली गाडगीळ नेहमी म्हणतात, ‘‘देवाचा एक ईश्वरी गुण आपल्यात आला, तर तो गुण आपल्याला ईश्वरप्राप्ती सोपी करून देतो. आपल्यामध्ये एक एक गुण आल्यावर ईश्वरप्राप्ती लवकर होते.’’ श्रीचित्‌शक्ति (सौ.) गाडगीळ आम्हाला साधनेतील बारकावे शिकवून ईश्वरप्राप्तीच्या मार्गावर घेऊन जात आहेत. ‘आम्हा सर्व साधकांची श्रद्धा अखंड वाढत राहो’, अशी त्यांच्या कोमल चरणी प्रार्थना !’

– श्री. वाल्मिक भुकन, कांचीपूरम्, तमिळनाडू. (३.१२.२०२३)

• येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक