Madagascar Law Against Rape : मादागास्कर सरकारने केलेल्या नवीन कायद्यानुसार बलात्कार्‍याला नपुंसक बनवण्याची शिक्षा !

अंतानानारिवो (मादागास्कर) – बलात्कार हा जघन्य गुन्हा आहे. जगभरातील देशांमध्ये बलात्कारार्‍यांना कठोर शिक्षा करण्याची तरतूद आहे. हा गुन्हा लहान मुलांवरील क्रौर्याशी संबंधित असेल, तर तो गुन्हा आणखीनच भयावह होतो. अशा बलात्कार्‍यांना धडा शिकवण्यासाठी आफ्रिकन देश मादागास्करमध्ये एक नवा कायदा करण्यात आला आहे. या कायद्याच्या अंतर्गत लहान मुलांवर बलात्कार करणार्‍यांना शस्त्रक्रियेद्वारे किंवा रासायनिक द्रव्याद्वारे नपुंसक बनवले जाईल.

(सौजन्य : Brut India)

बलात्काराच्या घटना रोखण्यासाठी महत्त्वाचे पाऊल ! – मादागास्करचे न्यायमंत्री

याविषयी मादागास्करचे न्यायमंत्री लँडी म्बोलटियाना रँड्रिमनान्तेसोआ म्हणाले की, लहान मुलींवरील बलात्काराच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. हे थांबवण्यासाठी हे महत्त्वाचे पाऊल आहे. वर्ष २०२३ मध्ये अल्पवयीन मुलींवर बलात्काराचे ६०० गुन्हे नोंदवण्यात आले होते. यावर्षी जानेवारी महिन्यात आतापर्यंत १३३ गुन्हे नोंदवण्यात आले आहेत.

शिक्षा ही पीडितेच्या वयावर अवलंबून असेल !

नवीन कायद्यानुसार १० वर्षांपेक्षा अल्प वयाच्या मुलीवर बलात्कार केल्याच्या प्रकरणी कुणी दोषी आढळल्यास त्याला शस्त्रक्रियेद्वारे नपुंसक बनवले जाईल. १० ते १३ वर्षे वयोगटातील मुलींवर बलात्कार करणार्‍याला शस्त्रक्रिया किंवा रासायनिक इंजेक्शन देऊन नपुंसक बनवले जाईल. १४ ते १७ वर्षे वयोगटातील अल्पवयीन मुलींवर बलात्कार प्रकरणी दोषी आढळल्यास त्याला रासायनिक द्रव्य देऊन नपुंसक बनवले जाईल. नवीन कायद्यानुसार बलात्कार करणार्‍यांना नपुंसक बनवून जन्मठेपेची शिक्षाही दिली जाणार आहे.

न्यायमंत्री पुढे म्हणाले की, मुलांच्या सुरक्षेसाठी आम्ही कटीबद्ध आहोत. पीडिता जितकी लहान असेल तितकी गुन्हेगाराला शिक्षा अधिक असेल. ‘बलात्काराचा विचार करायलाही कोणी धजावणार नाही’, असा कायदा करण्यात आला आहे.

संपादकीय भूमिका

देशातील बलात्कार न्यून करण्यासाठी मादागास्कर सरकारने घेतलेला अभिनंदनीय निर्णय ! भारतानेही यातून बोध घेणे आवश्यक !