IT Freezed Congress BankAccounts : आयकर खात्याने आमची बँक खाती गोठवली ! – काँग्रेसचा आरोप

काँग्रेसचे खजिनदार अजय माकन

नवी देहली – सर्वोच्च न्यायालयाने निवडणूक रोखे योजना रहित केल्यानंतर १६ फेब्रुवारी या दिवशी काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पत्रकार परिषद घेऊन त्यांच्या पक्षाची बँक खाती गोठवण्यात आल्याचा आरोप केला. माकन यांनी म्हटले, ‘आम्ही दिलेले धनादेश बँका वठवत नाहीत. आमच्याकडे आता वीज देयक भरण्यासाठी आणि कर्मचार्‍यांचे वेतन देण्यासाठीही पैसे नाहीत. आयकर विभागाने युवक काँग्रेस आणि काँग्रेस पक्ष यांच्याकडून २१० कोटी रुपयांची वसुली मागितली आहे.’ यासाठी त्यांनी भाजप आणि आयकर विभाग यांना उत्तरदायी ठरवले.

अजय माकन म्हणाले की, आम्हाला पक्षनिधी स्वरूपात लोकांकडून पैसे येत होते आणि त्यातून आम्ही खर्च भागवत होतो; पण आता लोकांना प्रश्‍न पडेल की, आम्ही दिलेला पैसा पक्षाला पोचतच नाही; मग आपण पैसे द्यावेत कि नाही ?

गोठवण्यात आलेली काँग्रेसची बँक खाती पूर्ववत्

आयकर अपीलीय न्यायाधिकरणाने १६ फेब्रुवारीला दुपारी १२.३० वाजता काँग्रेसची खाती गोठवण्यावरील बंदी उठवली आहे. या आदेशाच्या एक घंटा आधी काँग्रेसचे खजिनदार अजय माकन यांनी पक्षाची बँक खाती गोठवल्याचा आरोप केला होता.