थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम आणि तिचे अतीकार्य होणे यांमधील जीवनशैली कशी असावी ?

७ फेब्रुवारी या दिवशी प्रसिद्ध झालेल्या लेखात आपण थायरॉईड ग्रंथी (एक अंतःस्रावी ग्रंथी) अकार्यक्षम होणे आणि तिचे अतीकार्य होणे यांविषयी माहिती बघितली. आजच्या लेखात आपण दोन्ही प्रकारात जीवनशैली कशी असावी ? ते येथे देत आहे.

या लेखाचा मागील भाग वाचण्यासाठी येथे क्लिक करा : https://sanatanprabhat.org/marathi/762225.html

थायरॉईड ग्रंथी

१. थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम असतांनाची जीवनशैली

‘थायरॉईड ग्रंथी अकार्यक्षम आहे’, हे रक्ताची चाचणी केल्यावर आपल्याला लक्षात येते. थायरॉईडकडून स्रवणारे अंतःस्राव ‘T3’ आणि ‘T4’ यांची (‘T3’ आणि ‘T4’ या नावाने ओळखले जाणारे स्राव) पातळी रक्तात न्यून आढळते. त्याची पातळी नियंत्रित करण्यासाठी आपल्याला गोळी चालू करावी लागते. वैद्यांच्या सल्ल्याने गोळी घेणे, त्याची नियमित चाचणी करणे अत्यंत आवश्यक आहे. कधीतरी आपल्याला गोळी चालू केली आणि महिनोन्महिने त्याच मात्रेतील गोळी घेत रहाणे चुकीचे आहे. बरेच रुग्ण या चुका करतांना आढळतात.

१ अ. कोणता आहार घ्यावा ? : आता आहाराच्या संदर्भात बघूया. यामध्ये वजन वाढत जाते; कारण चयापचय क्रिया मंदावलेली असते. म्हणून आहार घेतांना प्रतिदिन घरी बनवलेला आणि पचेल एवढाच ताजा आहार घ्यावा. पोळी खाण्याऐवजी भाकरी खावी. आहारात प्रथिने थोडी अधिक प्रमाणात असावीत आणि पिष्टमय अन् स्निग्ध पदार्थ न्यून प्रमाणात असावेत. दोन वेळच आहार घ्यावा. रात्रीचे जेवण ७ वाजेपर्यंत ग्रहण करण्याचा प्रयत्न करावा, जेणेकरून रात्रीचा आहार पूर्णपणे पचेल. प्रतिदिन किमान ४० मिनिटे कोणताही व्यायाम करावा. व्यायाम केल्याने आपला जठराग्नी प्रदीप्त होत असल्याने घेतलेला आहार पचण्यास साहाय्य होते.

वैद्या (सौ.) मुक्‍ता लोटलीकर

१ आ. आहारात कोणत्या गोष्टी टाळाव्यात ?

अ. सोयाबीन, सोया दूध, सोयाबीनच्या वड्या खाऊ नये.

आ. कोबीच्या प्रकारातील भाज्या जसे फुलकोबी, कोबी, ब्रोकोली, पालक या भाज्या टाळाव्यात.

इ. ‘कॅफिन’युक्त पेय जसे की, कॉफी, ‘ग्रीन टी’ (चहाचा एक प्रकार) हे घेणे टाळावे.

ई. पूर्ण तळलेले पदार्थ, विकत मिळणारे बटर, प्रक्रिया केलेले विकतचे पदार्थ जसे की, डबा बंद पदार्थ, सरबते, शीतपेये पूर्ण टाळायला हवेत. यामध्ये सॉस, मेयॉनीज इत्यादींचा समावेश होतो.

२. थायरॉईड अतीकार्यक्षम असतांनाची जीवनशैली

यामध्ये ‘T3’ आणि ‘T4’ यांचे रक्तातील प्रमाण वाढलेले असते अन् ‘टी.एस्.एच्.’ नावाच्या अंतःस्रावाचे प्रमाण न्यून झालेले असते. रक्ताची चाचणी करून आवश्यकतेनुसार गोळी घ्यावी लागते.

२ अ. कोणता आहार घ्यावा ? : या प्रकारात सुद्धा आहार वरीलप्रमाणेच असला पाहिजे. दोन जेवणाच्या मधल्या वेळेत भूक लागल्यास फळे खावीत.

२ आ. आहारात कोणते पदार्थ वर्ज्य करावेत ?

अ. आयोडीन अधिक असलेले पदार्थ जसे की, अंड्याचा पिवळा भाग, आयोडीनयुक्त मीठ, मासे इत्यादी पदार्थ वर्ज्य समजावेत.

आ. ‘ग्लुटेन’ हा घटक असलेले पदार्थ जसे की, पास्ता, मैद्याचे पदार्थ हे पदार्थ टाळावेत.

इ. याखेरीज चहा, कॉफी, चॉकलेट, शीतपेये, केक आणि विकतचे ज्यूस पूर्णपणे टाळले पाहिजे.

३. थायरॉईडचा त्रास असणार्‍यांनी करावयाची योगासने

थायरॉईडचा त्रास असणार्‍यांनी भुजंगासन, सर्वांगासन, मत्स्यासन, पश्चिमोत्तनासन, उष्ट्रासन, सुप्त वज्रासन, विरासन, त्रिकोणासन, धनुरासन आणि शवासन ही योगासने नियमित करावीत. आसने कशी करावीत ? हे माहिती नसल्यास जाणकार व्यक्तीकडून शिकून ती करू शकतो.

४. महत्त्वाचे

४ अ. सुयोग्य जीवनशैलीचे आचरण चिकाटीने करणे आवश्यक : बर्‍याच रुग्णांमध्ये थायरॉईडची गोळी चालू झाली, म्हणजे ‘आता आपल्याला पुष्कळ मोठा आजार झाला आहे आणि यातून आपली सुटका नाही’, अशी मानसिकता निर्माण होते. त्याचाही एक मानसिक ताण रुग्णामध्ये असतो किंवा बरेच रुग्ण मनानेच गोळी बंदही करतात. ही अत्यंत गंभीर चूक आहे. इथे आयुर्वेद आणि आधुनिक वैद्यकशास्त्रात तुलना न करता जिथे जी आवश्यक आहे ती उपाययोजना कार्यवाहीत आणली पाहिजे. सुयोग्य जीवनशैली आपल्याला निरोगी ठेवणारच आहे, हे लक्षात घेऊन चिकाटीने प्रयत्न करत रहाणे आवश्यक आहे.

४ आ. अंतःस्रावांचे असंतुलन वाढण्यामागे मानसिक ताण हे एक कारण ! : अंतःस्रावांचे असंतुलन हे ९० टक्के मानसिक ताणामुळे निर्माण होते. मग हे असंतुलन थायरॉईड वा मधुमेह यांच्या संदर्भात असो किंवा ‘पीसीओडी’सारख्या (मासिक पाळी) विकारांमध्ये असो. मानसिक ताण वाढल्यास आपल्या शरिरात असे काही अंतःस्राव सिद्ध होतात, जे आपल्या शरिरातील ग्रंथींवर विपरित परिणाम करू लागतात. ही प्रक्रिया एका दिवसात घडून येणारी नसते. सततचा मानसिक ताण असल्यास अशा व्याधी पुढे उद्भवू शकतात. तेव्हा मानसिक ताण घालवणे किती महत्त्वाचे आहे, हे आपल्याला लक्षात येईल. मानसिक ताण आपल्या शरिरावर कसा परिणाम करतो ? हा एक सविस्तर विषय लवकरच प्रसिद्ध करणारच आहोत. मनाचा ताण घालवण्यासाठी सध्या बहुसंख्य लोक व्यसनांचा आधार घेतला जातो की, जो शरिरावर अधिकच घातक परिणाम करतो. मानसिक ताण घालवण्यासाठी कोणत्याही मार्गाने साधना करणे, ध्यानधारणा करणे, प्राणायाम करणे, मनमोकळेपणाने बोलणे आणि वेळ पडल्यास तज्ञांचा सल्ला घेणे, एखादा छंद जोपासणे असे विविध उपाय करायला हवेत.

– वैद्या (सौ.) मुक्ता लोटलीकर, पुणे. (१३.२.२०२४)