वर्ष १९७० चा ‘मुक्त संचार व्यवस्था’ (फ्री मुव्हमेंट रिजीम) करार केला रहित !

भारत-म्यानमार सीमेवरील सुरक्षेसाठी केंद्रशासनाचा एक महत्त्वाचा निर्णय !

सध्या म्यानमारमध्ये बंडखोर गट आणि लष्कर यांच्यात संघर्ष चालू आहे, तसेच नोव्हेंबर २०२३ मध्ये भारतात म्यानमारचे जवळपास ६०० सैनिक घुसले होते. या प्रकरणी मिझोराम सरकारने केंद्र सरकारकडे साहाय्य मागितले होते.

देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीने भारत सरकारने काही दिवसांपूर्वी मोठा निर्णय घेतला. त्यानुसार भारत-म्यानमारच्या सीमेवर तब्बल १ सहस्र ६४३ किलोमीटरचे कुंपण घालण्यात येणार आहे. आता त्याही पुढे जाऊन सरकारने आणखी एक निर्णय घेतला आहे. तो म्हणजे ‘फ्री मुव्हमेंट रिजीम’ (एफ्.एम्.आर्.) अर्थात् ‘मुक्त संचार व्यवस्था’ करार रहित करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

मणीपूर राज्याने शिफारस केल्यानुसार केंद्रीय गृह मंत्रालयाचा निर्णय !

१. गृह मंत्रालयाकडून तात्काळ ‘एफ्.एम्.आर्.’ रहित करण्याची शिफारस

केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी यासंदर्भात ‘एक्स’ या सामाजिक माध्यमावर माहिती दिली. ते म्हणाले, ‘‘देशाची अंतर्गत सुरक्षा सुनिश्चित करण्यासाठी आणि म्यानमारच्या सीमेला लागून असलेल्या भारताच्या ईशान्येकडील राज्यांची लोकसंख्याशास्त्रीय संरचना राखायला हवी. त्यासाठी भारत आणि म्यानमार यांच्यामधील ‘फ्री मूव्हमेंट रेजिम’ (एफ्.एम्.आर्.) रहित करण्याचा निर्णय गृह मंत्रालयाने घेतला आहे. परराष्ट्र मंत्रालय सध्या ते रहित करण्याच्या प्रक्रियेत असल्याने गृह मंत्रालयाने तात्काळ  ‘एफ्.एम्.आर्.’ रहित करण्याची शिफारस केली आहे.’’

२. काय आहे ‘मुक्त संचार व्यवस्था’ ?

भारत आणि म्यानमार यांच्यामधील सीमेवर मिझोराम, मणीपूर, नागालँड अन् अरुणाचल प्रदेश ही ४ राज्ये आहेत. दोन्ही देशांनी वर्ष १९७० मध्ये ‘मुक्त संचार व्यवस्थे’चा करार मान्य केला. यामुळे सीमाभागातील आदिवासी जमातींना दोन्ही देशांमध्ये १६ किलोमीटरपर्यंत व्हिसाखेरीज मुक्तपणे प्रवास करण्याची मुभा देण्यात आली; परंतु हा करार आता रहित करण्यात आला आहे.

३. केंद्रशासन भारत-म्यानमार सीमेवर बांधणार तब्बल १ सहस्र ६४३ किलोमीटरचे कुंपण !

बिग्रेडियर हेमंत महाजन (निवृत्त)

सप्टेंबर २०२३ मध्ये मणीपूरच्या मुख्यमंत्र्यांनी गृह मंत्रालयाला ‘अवैध घुसखोरी रोखण्यासाठी ‘मुक्त संचार व्यवस्था’ करार रहित करावा’, अशी शिफारस केली होती. त्या वेळी त्यांनी ‘म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालण्याच्या कामाला गती देण्यात येत आहे’, असेही त्यांनी म्हटले होते. मणीपूरची म्यानमारशी ३९० किलोमीटर लांबीची सीमा आहे. यापैकी केवळ १० किलोमीटरच्या कुंपणाचे काम पूर्ण झाले आहे.

या करारामुळे अनवधानाने अवैध स्थलांतर, अमली पदार्थांची तस्करी आणि शस्त्रास्त्रांचा व्यापार होत असल्याची टीका केली जात होती. भारत आणि म्यानमार यांची सीमा दाट जंगल अन् असमान भूपरिस्थितीतून (मैदानी प्रदेश नसलेली) जाते. सीमेवर पुष्कळ भागात कुंपण घातलेले असल्यामुळे तिथे दृष्टी ठेवण्यास कठीण जाते.

– ब्रिगेडियर हेमंत महाजन (निवृत्त), पुणे. (९.२.२०२४)