कर्मकांडाप्रमाणे साधना करणारे आणि अंत्यसमयीही गुरुस्मरण करणारे गंगाखेड (जिल्हा परभणी, महाराष्ट्र) येथील ६१ टक्के पातळीचे कै. दत्तात्रय किशनराव आय्या (वय ८३ वर्षे) !

२७.१.२०२३ (माघ शुक्ल षष्ठी) या दिवशी गंगाखेड (जिल्हा परभणी, महाराष्ट्र)) येथील दत्तात्रय किशनराव आय्या (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले. १५.२.२०२४ या दिवशी त्यांचे पहिले वर्षश्राद्ध आहे. त्यानिमित्त रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात राहून साधना करणारा त्यांचा मुलगा श्री. कृष्णा आय्या आणि सून सौ. सारिका आय्या यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

कै. दत्तात्रय किशनराव आय्या

१. श्री. कृष्णा आय्या (मोठा मुलगा), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा

१ अ. वडिलांनी केलेली साधना

१ अ १. ‘वडिलांनी श्री बालाजीची निस्सीम भक्ती केली. ते पहाटे ४ वाजता उठून भूपाळ्या आणि अभंग म्हणत अन् नामजप करत असत.

१ अ २. कर्मकांडाप्रमाणे केलेली साधना : वडिलांनी त्यांच्या वयाच्या ८० वर्षांपर्यंत कर्मकांड पाळले. तोपर्यंत ते बाहेरचे (हॉटेल) किंवा इतर ठिकाणचे पाणीही प्यायचे नाहीत. बाहेरगावी जातांना ते स्वतः समवेत पाणी घेऊन जायचे.

१ अ ३. श्री गुरूंवर असलेली श्रद्धा : वडिलांची त्यांचे गुरु पू. शिवराम महाराज यांच्यावर अपार श्रद्धा होती. पू. शिवराम महाराज अध्यात्मातील मोठे अधिकारी होते. माझे वडील लहानपणापासून पू. शिवराम महाराज यांची पुष्कळ सेवा करत असत. ते प्रत्येक गोष्ट पू. शिवराम महाराज यांना विचारून करत असत.

श्री. कृष्णा आय्या

१ आ. परात्पर गुरु पांडे महाराज यांनी हात धरल्यामुळे ‘आता मोक्षाला जाईपर्यंत काळजी नाही’, असे वडिलांना वाटणे : फेब्रुवारी २०२० मध्ये (कोरोना महामारी चालू व्हायच्या आधी काही दिवस) माझ्या वडिलांची देवद (पनवेल) येथील सनातनच्या आश्रमात परात्पर गुरु पांडे महाराज यांच्याशी भेट झाली होती. परात्पर गुरु पांडे महाराज माझ्या वडिलांचा हात त्यांच्या हातात धरून बसले होते. ते वडिलांचा हात सोडतच नव्हते. तेव्हा माझ्या वडिलांना वाटले, ‘परात्पर गुरु पांडे महाराज यांनी माझा हात धरला आहे. आता मला मोक्षाला जाईपर्यंत काही काळजी नाही.’ परात्पर गुरु पांडे महाराज मला म्हणाले होते, ‘तुझे वडील महात्मा आहेत. थोर आहेत.’

१ इ. रुग्णालयात असतांना गुरु पू. शिवराम महाराज यांच्या अनुसंधानात राहून वडील होणारा त्रास सहन करत असणे : २५.१.२०२३ या दिवशी माझ्या वडिलांना रुग्णालयात भरती केले होते. तेव्हा त्यांना श्वास घेण्यास पुष्कळ त्रास होत होता. त्यांना बोलताही येत नव्हते. ते मला केवळ खुणावून, ‘मला घरी घेऊन चल’, असे सांगत होते. मी वडिलांना म्हणालो, ‘‘पू. शिवराम महाराज यांनी (पू. शिवराम महाराज यांच्या छायाचित्रासमोर चिठ्ठ्या टाकून आलेल्या चिठ्ठीनुसार) तुम्हाला रुग्णालयात भरती करायला सांगितले आहे; म्हणून तुम्हाला रुग्णालयात भरती केले आहे.’ तेव्हा वडील शांत झाले. वडिलांना रात्रभर श्वास घ्यायला त्रास होत होता. ते सतत तोंडाने ‘शिवराम’, ‘शिवराम’, असे म्हणत होते. त्यांना अन्य काहीच बोलता येत नव्हते; पण ते ‘शिवराम’ हा शब्द स्पष्ट म्हणत होते. ‘केवळ गुरुस्मरणाने ते त्यांना होणार्‍या असह्य वेदना सहन करत आहेत’, असे त्यांच्याकडे पाहून मला वाटत होते. २७.१.२०२३ या दिवशी सकाळी १०.५० वाजता त्यांचे निधन झाले.

१ ई. वडिलांच्या निधनामुळे येणारे अश्रू हे गरम नसून थंड असणे : वडिलांना अग्नी देण्याच्या वेळी मला पुष्कळ रडू येत होते. मी मनात वडिलांची क्षमायाचना केली, ‘तुमच्या सेवेत माझ्याकडून झालेल्या चुकांसाठी मला क्षमा करावी.’ तेव्हा माझ्या एकाच डोळ्यातून सतत अश्रू येत होते आणि त्यांचा वेगही अधिक होता. याचे कारण मला कळले नाही. नंतर मी ‘माझे अश्रू गरम आहेत कि गार आहेत ?’, हे पाहिले. तेव्हा ते अश्रू गार होते.

१ उ. वडिलांच्या अंत्यविधीनंतर जाणवलेली सूत्रे

१. आम्ही वडिलांचे अंत्यविधीचे सर्व विधी परंपरेनुसार आणि तिकडच्या पुरोहितांनी सांगितल्यानुसार केले. ते सर्व विधी पाहून गावातील लोक आम्हाला म्हणाले, ‘तुम्ही सर्व विधी पुष्कळच छान केले.’

२. प.पू. गुरुदेवांच्याच कृपेने ते १४ दिवस मला गुरुदेवांच्या अनुसंधानात रहाता आले.

३. १४ व्या दिवशी सर्व बहिणी आणि नातेवाईक परत गेल्यामुळे मला एकटे वाटत होते. त्याच वेळी श्रीसत्‌शक्ति (सौ.) बिंदा नीलेश सिंगबाळ यांचा मला भ्रमणभाष आला. तेव्हा मला वाटले, ‘सांसारिक माया गेली आणि गुरुकृपेचा ओघ (आशीर्वाद) आला. या दुःखाच्या प्रसंगातही गुरुदेवांनी मला सत्मध्ये ठेवले.’

१ ऊ. ‘साधकासह त्याच्या कुटुंबियांची इहलोकी आणि परलोकीही काळजी घेणारे सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ! : वडिलांना अग्नी देऊन आम्ही घरी परत जात असतांना माझे मन मागे वळून पहात होते. मी मनाने मागे वळून पहातांना मला सूक्ष्मातून दिसले, ‘वडिलांजवळ गुरुदेव बसले आहेत. गुरुदेव मला म्हणाले, ‘मी तुझ्या वडिलांचे अनिष्ट शक्तींपासून रक्षण करीन. तू घरी जा.’ ते ऐकून मला पुष्कळ गहिवरून आले आणि जाणवले, ‘नातेवाईक केवळ जिवंत असेपर्यंतच आपल्या समवेत असतात; मात्र इहलोकी आणि परलोकी शेवटपर्यंत आपल्या समवेत केवळ गुरुदेवच असतात आणि तेच आपले रक्षण करतात !’

२. सौ. सारिका आय्या (मोठी सून), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.

सौ. सारिका आय्या

२ अ. गांभीर्याने नामजप करणे : ‘माझे सासरे प्रतिदिन अगदी न चुकता गुरुमंत्र आणि कुलदेवता श्री व्यंकटेश बालाजी यांच्या नामजपाची १ – १ माळ करूनच सकाळचा अल्पाहार करायचे. अगदी बाहेरगावी जायचे असेल किंवा घरी कुठलाही कार्यक्रम असला, तरी त्यांच्या या कृतीत कधीही खंड पडला नव्हता.

२ आ. धर्माचरण करण्याविषयी आग्रही असणे

१. माझ्या लग्नाच्या आधी त्यांनी मला प्रतिदिन ‘कुंकू लावणे, हातात काचेच्या बांगड्या घालणे, साडी नेसणे’, असे विवाहित स्त्रीसाठी आवश्यक असलेले सर्व धर्माचरण करायला सांगितले.

२. माझा मुलगा कु. विश्व याची मुंज झाल्यानंतर ‘विश्वने सकाळ-संध्याकाळ संध्या करावी’, यासाठी त्यांचा आग्रह असायचा.

३. ते घराबाहेर पडतांना नेहमी पिवळ्या रंगाचा फेटा बांधूनच घराबाहेर जात असत.

२ इ. त्यांच्या भूपाळ्या किंवा ज्ञानेश्वरीतील अभंग तोंडपाठ होते. दिवसभर सासरे ते अभंग गुणगुणत असायचे.’

२ ई. ते पंचक्रोशीत प्रसिद्ध होते.’

(सर्व सूत्रांचा दिनांक १५.१.२०२४)

  • सूक्ष्म : व्यक्तीचे स्थूल म्हणजे प्रत्यक्ष दिसणारे अवयव नाक, कान, डोळे, जीभ आणि त्वचा ही पंचज्ञानेंद्रिये आहेत. ही पंचज्ञानेंद्रिये, मन आणि बुद्धी यांच्या पलीकडील म्हणजे  ‘सूक्ष्म’. साधनेत प्रगती केेलेल्या काही व्यक्तींना या ‘सूक्ष्म’ संवेदना जाणवतात. या ‘सूक्ष्मा’च्या ज्ञानाविषयी विविध धर्मग्रंथांत उल्लेख आहेत.
  • येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक