खराडी (पुणे) येथे मुठा नदीवर डासांचे वादळ आल्याचे चलचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित !

मुठा नदीवर डासांचे वादळ

खराडी (पुणे) – केशवनगर भागात मुठा नदीवर डासांचे वादळ आल्याचे चलचित्र सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाले आहे. या चलचित्रामध्ये लाखोंच्या संख्येने मुठा नदीवर डास घोंगवतांना दिसत आहेत. मध्य अमेरिका, रशिया अशा देशांमध्ये पावसाळ्यात हे डासांचे वादळ पहायला मिळते.

या चलचित्रावर प्रतिक्रिया देत एकाने सांगितले की, मुठा नदी स्वच्छ नसल्याने, तसेच नदीमध्ये सांडपाणी येत असल्याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे, असे वादळ येणे नागरिकांच्या स्वास्थ्यासाठी धोकादायक असल्याने महापालिका आतातरी मुठा नदी स्वच्छतेच्या सूत्रावर गंभीर होऊन नदीच्या स्वच्छतेसाठी शीघ्र कृती करेल का ? असा प्रश्न पुणेकरांना पडला आहे. (अशा घटनांना अनेक वैज्ञानिक कारणे असली, तरी कीटकांचा प्रादुर्भाव येणारा आपत्काल दर्शवतो, असे धर्मशास्त्र सांगते. गणेशोत्सव काळात नदी प्रदूषित होईल, असे सांगत श्री गणेशमूर्ती विसर्जनाला विरोध करणारे तथाकथित पर्यावरणवादी अशा घटनांवर काहीच बोलत नाहीत, हेही हिंदूंनी लक्षात घ्यावे ! – संपादक)