देवा, या जिवास तूच कृतार्थ केले ।

‘गुरुमाऊली, तुमचा लाभलेला सत्संग स्मरून तुम्हीच सुचवलेली ही सुगंधी, अलौकिक आणि विलोभनीय शब्दसुमने तुमच्या चरणी अर्पण करत आहे. ‘तुमच्या दैवी चरणी कितीही कृतज्ञता व्यक्त केली, तरी तिचे खसखशीच्या दाण्याइतकेही अस्तित्व नाही’, याची जाणीव या जिवाला आहे, तरीही ‘हा शब्दप्रपंच तुमच्या चरणी अर्पण करून घ्यावा’, अशी मी तुमच्या चरणी संपूर्ण शरणागतभावाने प्रार्थना करते.

सौ. वैशाली देसाई

अर्थहीन जीवन सारे, तुझ्या कृपेने कृतार्थ जाहले ।
तव प्रीतीने तन, मन अन् पंचप्राण सारे व्यापून राहिले ।। १ ।।

आप्तांचे कटू शब्दशस्त्र जरी मना अती बोचले ।
अलौकिक तुझ्या हास्याचे चांदणे त्यावर तू पांघरले ।। २ ।।

हृदयी माझ्या तव आशीर्वादाचे आनंदी पुष्प तूच फुलवले ।
संकल्पच जाहले शब्द तुझ्या दैवी वाणीने उच्चारलेले ।। ३ ।।

जगात कुचकामी ठरलेल्या जिवास तूच आश्रयास घेतले ।
पृथ्वीवरील भुवैकुंठ अनुभवण्याचे भाग्य तुज कारणे लाभले ।। ४ ।।

धरूनी बोट या अल्लड जिवास, तू साधनापथावर आणले ।
प्रारब्ध भोगूनी संपवण्याचे बळ देवा, तूच मज दिधले ।। ५ ।।

आशीर्वचन देऊनी या जिवास त्वा भाग्यवंत केले ।
अंतर्बाह्य शुद्ध होण्या प्रक्रियारूपी (टीप) गुपित शिकवले ।। ६ ।।

मायेच्या चिखलातूनी साधक कमळ तव कृपेने उमलले ।
सकारात्मकतेचे बीज तूच अंतरी रुजवले ।। ७ ।।

निरपेक्ष प्रीतीचे शिंपण करूनी त्यास उल्हसित रोपटे केले ।
तुझ्या कृपाछत्राखाली देवा, तूच निर्धास्त केले ।। ८ ।।

स्मरता तुला होते सद्गदित मन अन् नेत्र अश्रूंनी ओथंबलेले ।
दैवी रूप तुझे पाहूनी मनःचक्षु धन्य धन्य जाहले ।। ९ ।।

साठवण्या रूप तुझे हृदयी अंतर्मन सदैव आतुरलेले ।
प्रीतीवर्षावात तुझ्या चिंब होऊनी अंतर्बाह्य भरून पावले ।। १० ।।

या जिवास देवा, तूच कृतार्थ केले, कृतार्थ केले, कृतार्थ केले ।
यास्तव सदैव कृतज्ञ मी, कृतज्ञ मी, कृतज्ञ मी ।। ११ ।।

टीप – स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनाची प्रक्रिया’

– सौ. वैशाली देसाई, अंबरनाथ, जिल्हा ठाणे.

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक