आज वसंतपंचमी (१४.२.२०२४) या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांचा प्रकटदिन आहे. त्या निमित्ताने…
‘१०.३.२०२३ या दिवशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात भजने म्हटली. या कार्यक्रमाचे देवाने माझ्याकडून करून घेतलेले सूक्ष्म परीक्षण पुढे दिले आहे.
१. भजनांच्या कार्यक्रमाला आरंभ होताच व्यासपिठावर सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज आणि प.पू. रामानंद महाराज यांचे अस्तित्व जाणवणे
भजनांच्या कार्यक्रमात व्यासपिठावर मधोमध प.पू. भक्तराज महाराज यांचे मोठे छायाचित्र ठेवले होते आणि त्या छायाचित्राच्या दोन्ही बाजूंना बसून भक्तगण भजने म्हणत होते. तेव्हा त्या छायाचित्राकडे बघून ‘ते छायाचित्र सजीव झाले आहे आणि प.पू. भक्तराज महाराज श्वासोच्छ्वास करत आहेत’, असे मला सूक्ष्मातून दिसले. ‘याचे कारण काय ?’, असा प्रश्न माझ्या मनात आल्यावर ‘मला स्वतः प.पू. भक्तराज महाराज सिंहासनावर बसलेले असून त्यांच्या चरणांशी त्यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज बसले आहेत’, असे सूक्ष्मातून दिसले. या संदर्भात ईश्वराने सांगितले, ‘ज्याप्रमाणे जिथे भावपूर्ण रामकथा होते, तिथे सूक्ष्मातून हनुमंत येतो (टीप १); त्याचप्रमाणे जिथे जिथे प.पू. भक्तराज महाराज यांची भजने भावपूर्ण गायली जातात, तिथे सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज आणि त्यांच्या भजनांशी एकरूप झालेले प.पू. भक्तराज महाराज यांचे उत्तराधिकारी प.पू. रामानंद महाराज यांचेही सूक्ष्म अस्तित्व असते. ही त्याचीच अनुभूती आहे.’
टीप १ – ‘जेथे रामकथा होते, तेथे सूक्ष्मातून हनुमंत येतो’, अशी उत्तर भारतातील लोकांची श्रद्धा आहे.
२. भक्तांनी भजने गातांना सूक्ष्मातून विविध अनुभूती येणे आणि भजनांचे चैतन्य उच्च स्वर्गलोकापर्यंत जात असल्याचे जाणवणे
भक्त भजने गात असतांना भजने ऐकून ‘भाव जागृत होणे, नामजप चालू होणे, ध्यान लागणे’, अशा विविध अनुभूती मला येत होत्या. या पूर्वीही काही भजन मंडळांनी सनातनच्या रामनाथी (गोवा) येथील आश्रमात भजने प्रस्तुत केली आहेत; पण त्यांचा भजनांचा सूक्ष्म स्तरावर एवढ्या अधिक प्रमाणात परिणाम जाणवला नव्हता. ‘भजनांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य कुठपर्यंत जाते ?’, असे सूक्ष्मातून शोधल्यावर माझ्या लक्षात आले, ‘या भजनांतून प्रक्षेपित होणारे चैतन्य स्वर्गलोकाच्या पलीकडे उच्च स्वर्गलोकापर्यंत प्रक्षेपित होत आहे.’ ‘याचे कारण काय ?’, असे ईश्वराला विचारल्यावर ईश्वराने सांगितले, ‘प.पू. भक्तराज महाराज यांची शिकवण आध्यात्मिक भजनांची आहे. भजनांचा आध्यात्मिक अर्थ ‘भज + मन’, असा आहे. केवळ तोंडाने म्हटल्या जाणार्या भजनातून साधना होत नाही; पण २ घंटे शाब्दिक भजन करून त्यातील चैतन्याने दिवसाचे पुढील २२ घंटे मन ईश्वराच्या भजनात, म्हणजे अनुसंधानात रहाणे, याला ‘आध्यात्मिक भजन’ म्हणतात. गावोगावी भ्रमण करून प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या भजनांतून समष्टीला आध्यात्मिक भजनांची शिकवण दिली आहे. प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त त्या शिकवणीप्रमाणे वागण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यामुळे इतर भजनी मंडळांच्या तुलनेत प.पू. भक्तराज महाराज यांच्या भक्तांनी केलेल्या भजनांचा सूक्ष्म स्तरावर परिणाम अधिक प्रमाणात जाणवत आहे.’
३. भक्तांनी प्रस्तुत केलेली व्यष्टी आणि समष्टी शिकवण देणारी भजने ऐकतांना सूक्ष्म गंध, सूक्ष्म चव अन् सूक्ष्म नाद यांची अनुभूती येणे
भक्त प्रस्तुत करत असलेली भजने ऐकतांना मला कधी सूक्ष्म गंध यायचा, कधी तोंडात गोड चव निर्माण व्हायची, तर मध्येच सूक्ष्मातून नाद ऐकू यायचा. ‘याचे कारण काय ?’, असे मी ईश्वराला विचारल्यावर ईश्वराने सांगितले, ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी व्यष्टी आणि समष्टी, अशा दोन्ही साधनेची शिकवण देणारी भजने लिहिली आहेत. ज्या वेळी भक्तगण व्यष्टी साधनेची शिकवण असलेले भजन गातात, उदा. ‘एक तुझे नाम । शास्त्रांचा
आधार ।।’इत्यादी, त्या वेळी पृथ्वी आणि आप या तत्त्वांशी निगडित सूक्ष्म गंध अन् सूक्ष्म चव यांची अनुभूती येते, तर ज्या वेळी समष्टी साधनेची शिकवण असलेले भजनांचे गायन होते, उदा. ‘भोलाजी तुमने कैसी धुनी ये रमाई ।’ इत्यादी, त्या वेळी आकाशतत्त्वाशी निगडित सूक्ष्म नाद ऐकू येण्याची अनुभूती येते.
४. भक्त भजन करतांना सूक्ष्मातून गुरुकृपायोग साधनामार्गातील अष्टांग अंगांचे नाव ऐकू येणे आणि गुरुकृपायोग साधनामार्गाची शिकवण प.पू. भक्तराज यांच्या भजनात दडलेली असल्याचे ईश्वराने सांगणे
प.पू. भक्तराज महाराज यांचे भक्त भजन प्रस्तुत करत असतांना प्रत्येक भजनाच्या वेळी मला सूक्ष्मातून ‘गुरुकृपायोग’ या साधनातील अष्टांगसाधनेतील एका अंगाचे नाव ऐकू यायचे. ‘याचे कारण काय ?’, असे मी ईश्वराला विचारल्यावर ईश्वराने सांगितले, ‘रामनाथी आश्रमात चालू असलेला भजनांचा कार्यक्रम ईश्वरेच्छेने होत आहे. या भजनांच्या माध्यमातून स्वतः प.पू. भक्तराज महाराज उपस्थित भक्तांना व्यष्टी आणि समष्टी साधनेचे मार्गदर्शन करत आहेत. प.पू. भक्तराज महाराज यांनी भजनांतून सांगितलेली व्यष्टी आणि समष्टी साधनेची शिकवण ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाच्या रूपात सोप्या भाषेत सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांनी समष्टीला दिली आहे. पुढील विश्लेषणातून हे सूत्र अधिक स्पष्ट होईल.
४ अ. नामजप
‘ब्रह्मानंद परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिम् ।
द्वंद्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् ।
एकं नित्यं विमलमचलं सर्वधीसाक्षिभूतम् ।
भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरुं तं नमामि ।।’
या प्रार्थनेनंतर भक्तांनी प.पू. भक्तराज महाराज विरचित ‘एक तुझे नाम । शास्त्रांचा आधार ।।’ हे भजन गायले. या भजनात प.पू. भक्तराज महाराज यांनी नामजपाचे महत्त्व सांगितले आहे. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गातही नामजपाची साधना सांगितलेली आहे.
४ आ. भावजागृती : ‘वंदू या निखिल ब्रह्म अवधूता ।’ या भजनातून प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘चराचरात दडलेल्या ईश्वरी तत्त्वाप्रती कृतज्ञताभाव कसा ठेवावा ?’, याची शिकवण दिली आहे. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गातही ‘दैनंदिन कृतींना भावाची जोड देणे, निर्जीव वस्तूंप्रती भाव ठेवणे’, अशा प्रकारे चराचरात देवत्व बघून त्यांच्याप्रती भाव ठेवण्याची, म्हणजे भावजागृतीची शिकवण दिली जाते.
४ इ. स्वभावदोष आणि अहं यांचे निर्मूलन : ‘लाजता पतित म्हणविता…’ आणि ‘लुटाओजी दिल को प्रभु के चरणों में…’, अशा भजनांच्या माध्यमातून प.पू. भक्तराज महाराज यांनी स्वभावदोष-निर्मूलनासाठी प्रयत्न करण्याची शिकवण दिली आहे. ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गातही स्वभावदोष आणि अहं यांच्या निर्मूलनालाच प्राधान्य देण्यात आले आहे.
४ ई. समष्टी साधना : ‘गुरुकृपायोग’ या साधनामार्गाचे आगळेवेगळे वैशिष्ट्य, म्हणजे त्यात समष्टी साधना शिकवली जाते. या समष्टी साधनेचे बीज प.पू. भक्तराज महाराज यांनी रचलेल्या अनेक भजनांमध्ये दडलेले आहे, उदा. ‘भोलाजी तुमने कैसी धुनी ये रमाई । उठोजी प्रभु कैसी धुनी ये रमाई ।’, या भजनाच्या माध्यमातून प.पू. भक्तराज महाराज यांनी समष्टी साधनेची शिकवण दिली आहे. या भजनात प.पू. भक्तराज महाराज ध्यानस्थ शिवाला जागृत होण्यासाठी आळवत आहेत. याचे कारण असे की, ज्या ज्या वेळी भूतलावर अधर्म बळावतो आणि धर्म लोप पावू लागतो, त्या वेळी भक्तांनी केवळ नामजप, भजन आणि ध्यान यांसारखी व्यष्टी साधना करणे अपेक्षित नाही. व्यष्टी साधनेमुळे धर्मराज्य संस्थापनेच्या कार्यात सहभागी होण्याची आध्यात्मिक क्षमता भक्तांमध्ये काही प्रमाणात असते. त्यामुळे त्यांनी राष्ट्र्र आणि धर्म यांच्या दुरवस्थेकडे नुसते बघत न बसता ती दूर होण्यासाठी ईश्वराच्या अधिष्ठानाने प्रयत्न केले पाहिजेत. यालाच ‘समष्टी साधना’ म्हणतात. सत्य, त्रेता आणि द्वापर या युगांतही विविध ऋषिमुनींनी, म्हणजे समष्टी संतांनी भगवंताला अवतार घेण्यासाठी प्रार्थना केली आहे अन् पुष्कळ विरोध झाला, तरी धर्मरक्षणासाठी स्वतः प्रयत्न केले आहेत. त्याचप्रमाणे या भजनात प.पू. भक्तराज महाराज शिवालाच ध्यानातून जागृत होऊन समष्टी कार्य करण्यासाठी प्रार्थना करत आहेत.
प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या भजनांतून व्यष्टी आणि समष्टी दोन्ही प्रकारच्या साधनेची शिकवण दिली आहे अन् मानवजातीला सोप्या भाषेत समजावे; म्हणून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले तीच शिकवण गद्यरूपात विविध ग्रंथांच्या माध्यमातून देत आहेत.
५. ‘सोनियाच्या शिंपल्यात । घावला हा चिंतामणी ।।’, या भजनाचे गायन होत असतांना सूक्ष्मातून प.पू. भक्तराज महाराज यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या डोक्यावर हात ठेवला आहे’, असे दिसणे आणि ‘कृतज्ञता, कृतज्ञता…’, असा नामजप चालू होणे
भक्तांनी ‘सोनियाच्या शिंपल्यात । घावला हा चिंतामणी ।।’, हे भजन गायिले. हे भजन चालू होताच माझे ध्यान लागू लागले. ध्यानात मला दिसले, ‘प.पू. भक्तराज महाराज सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्या डोक्यावर हात ठेवून त्यांना आशीर्वाद देत आहेत.’ भजनातील ‘कोटीसूर्य प्रकाशाचा । दीप पाजळीला ।’ ही पंक्ती ऐकतांना माझ्या मनात ‘कृतज्ञता, कृतज्ञता…’, असा नामजप चालू झाला. ‘वरील दोन्ही अनुभूतींचे कारण काय ?’, असे मी ईश्वराला विचारल्यावर ईश्वराने सांगितले, ‘गुरूंची शिकवण अनमोल असते. केवळ अंतरंग शिष्य गुरूंची खरी शिकवण समजून त्यांच्याप्रती कृतज्ञता म्हणून तिचे आचरण करतो. असे कृतज्ञतापूर्वक आचरण करणार्या शिष्यावर गुरूंची कृपा होते. प.पू. भक्तराज महाराज यांनी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना ग्रंथलेखन अन् अध्यात्मप्रसार करण्याची आज्ञा केली होती. त्या आज्ञेनुसार शारीरिक स्थिती बरी नसतांना आजही वयाच्या ८१ व्या वर्षी सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले ग्रंथलेखन आणि अध्यात्मप्रसार करण्यासाठी अविरत झटत आहेत; म्हणून त्यांच्यावर प्रसन्न होऊन प.पू. भक्तराज महाराज यांनी त्यांच्या डोक्यावर हात ठेवला, म्हणजे त्यांना आशीर्वाद दिला. प.पू. भक्तराज महाराज यांचे आशीर्वाद सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांना सतत आहेत.
गुरूंनी शिष्यावर केलेल्या कृपेचे ऋण शिष्य कधीच फेडू शकत नाही. ‘गुरूंनी शिकवलेली शिकवण स्वतः आचरणात आणणे आणि समष्टीत तिचा प्रचार करणे’, ही शिष्याची गुरूंप्रती असलेली खरी कृतज्ञता ! सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले अशा उच्च कृतज्ञताभावाने वागत असल्याने त्यांच्या देहात स्वतः प.पू. भक्तराज महाराज यांनी भजनात सांगितलेले दैवी पालट झाले आहेत.
ज्ञानोत्तर कार्य होतांना येणार्या अनुभूतीचे संकलन प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘सोनियाच्या शिंपल्यात । घावला हा चिंतामणी ।।’, या भजनात केले आहे. यांपैकी एका दैवी अनुभूतीचा उल्लेख प.पू. भक्तराज महाराज यांनी ‘अंतःकरण संपुटात हरिहर साठविला । क्रियाभाव स्थिरावला, शब्द हा बुडाला ।।’, या भजनपंक्तीच्या माध्यमातून केला आहे. ‘क्रियाभाव स्थिरावला’, म्हणजे परात्पर गुरु डॉक्टरांचे ज्ञानोत्तर कार्य चालू असल्याने ते स्वतः काही कृती करत नाहीत. ‘शब्द हा बुडाला’, म्हणजे त्यांचे कार्य शब्दातीत आहे.’
गुरु प.पू. भक्तराज महाराज यांनी सांगितलेली साधना शिष्य डॉ. आठवले पूर्ण कृतज्ञताभावाने करत असल्याने त्यांच्यात स्वतः गुरूंनी भजनांच्या माध्यमातून सांगितलेले दैवी पालट झाले आहेत. त्यामुळे ‘कोटीसूर्य प्रकाशाचा । दीप पाजळीला ।’, या भजनपंक्ती ऐकतांना माझा ‘कृतज्ञता, कृतज्ञता…’, असा नामजप चालू झाला.’
६. भजन ऐकतांना ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची स्पंदने जाणवणे अन् पूर्ण साधनेचे सार प.पू. भक्तराज महाराज यांनी भजनांत दिलेले असून त्याची अनुभूती घेणे महत्त्वाचे असल्याचे ईश्वराने सांगणे
भजनांचा पूर्ण कार्यक्रम ऐकतांना मला अधूनमधून ज्ञान, भक्ती आणि वैराग्य यांची स्पंदने जाणवत होती. ‘याचे कारण काय ?’, असे मी ईश्वराला विचारल्यावर ईश्वराने सांगितले, ‘प.पू. भक्तराज महाराज उच्च कोटीचे संत असल्याने त्यांनी लिहिलेल्या भजनांमध्ये ज्ञान, भक्ती, वैराग्य, वेदांचे सार, यांसह व्यष्टी आणि समष्टी साधनेची प्रत्यक्ष शिकवण दडलेली आहे. व्यष्टी साधनेतील शिकवणीचे आचरण करून प.पू. रामानंद महाराज गुरुस्वरूप झाले, तर व्यष्टीसह समष्टी साधनेच्या शिकवणीचे आचरण करून सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले समष्टी संत झाले. या प्रकारे दोन्ही शिष्यांनी अध्यात्मातील उच्च स्तर गाठला. अशा प्रकारे केवळ गायनासाठी म्हणून भजनांचे गायन न करता सर्व भक्तांनी भजनांतून प.पू. भक्तराज महाराज यांनी दिलेली शिकवण आचरणात आणली, तर सर्वांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र होईल.’
७. कृतज्ञता
प.पू. भक्तराज महाराज यांचे वर्णन करायचे झाल्यास ‘एकमेवाद्वितीय (ज्यांचासारखा दुसरा कुणी नाही)’ आणि ‘न भूतो न भविष्यती (भूतकाळात झाले नाहीत आणि भविष्यकाळात होणार नाही)’, असे करू शकतो. प.पू. भक्तराज महाराज हे संत शिरोमणी आहेत. त्यांच्यासारख्या त्रिकालज्ञानी आणि थोर संतांचा सहवास मिळणे दुर्मिळ आहे. प.पू. भक्तराज महाराज यांनी सर्वत्रच्या भक्तांवर केलेली कृपा म्हणजे त्यांनी रचलेली अप्रतिम भजने. या भजनांमध्ये गीता, रामायण, महाभारत आणि वेदांचे सार दडलेले आहे. ‘प.पू. भक्तराज महाराज यांनी भजनांच्या माध्यमातून सांगितलेली व्यष्टी आणि समष्टी साधना आम्हा सर्व भक्त अन् साधक यांच्याकडून होऊन आम्हा सर्वांची आध्यात्मिक उन्नती शीघ्र होऊ दे’, अशी प.पू. भक्तराज महाराज यांच्या चरणी कळकळीची प्रार्थना !’
– श्री. निषाद देशमुख (सूक्ष्मातून मिळालेले ज्ञान) (आध्यात्मिक पातळी ६३ टक्के), सनातन आश्रम, रामनाथी, गोवा. (१५.३.२०२३, दुपारी ४.४५ ते ६.३७ आणि रात्री ९.१५ ते १०.४५)
अंघोळ न करताही केवळ चेहर्यावरून हात फिरवताच लाल-गुलाबी आणि तेजस्वी दिसणारे प.पू. भक्तराज महाराज !
एकदा आम्ही प.पू. भक्तराज महाराज यांच्या समवेत उज्जैन येथे गेलो असतांना रात्री प.पू. बाबांचे (प.पू. भक्तराज महाराज यांचे) तेथील भक्त श्री. चोरे यांच्या घरी निवासाला थांबलो होतो. सकाळी उठल्यावर आम्हाला प.पू. बाबांचा चेहरा थोडा सुरकुतलेला आणि केस थोडे विस्कटलेले दिसले. कुणीतरी प.पू. बाबांना म्हणाले, ‘‘प.पू. बाबा, आता अंघोळ करायला पाहिजे.’’ तेव्हा प.पू. बाबांनी लगेच केस आणि चेहरा यांवरून त्यांचे हात फिरवले. त्यांनी त्यांचा उजवा हात डाव्या हातावरून आणि डावा हात उजव्या हातावरून फिरवला अन् म्हणाले, ‘‘आता अंघोळ केल्यासारखे वाटते ना ?’’ तेव्हा प.पू. बाबांच्या चेहर्यावर एकदम चमक येऊन तेज आले होते. त्यांचा चेहरा एकदम लाल गुलाबी झाला होता.
त्या क्षणी मला प.पू. धांडे शास्त्रींचे शब्द आठवले. ते म्हणायचे, ‘भक्तराज मला आवडतो. तो गोंडस आहे.’ तो गोंडसपणा आजही डोळ्यांसमोर येतो.
– श्री. अनिल वामन जोग, इंदूर, मध्यप्रदेश. (२९.३.२०२३)
|