संयुक्त अरब अमिरातमधील पहिले आणि सर्वांत मोठे ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिर’ !

१४ फेब्रुवारी या दिवशी अबू धाबी येथे ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’चे उद्घाटन होत आहे. त्या निमित्ताने…

संयुक्त अरब अमिरात (‘यूएई’मध्ये) अबू धाबीच्या वाळवंटाच्या मध्यभागी एक मोठे ‘बी.ए.पी.एस्. (बोचासनवासी श्री अक्षर पुरुषोत्तम स्वामी नारायण संस्था) हिंदु मंदिर’ उभारण्यात आले आहे. हे मंदिर पश्‍चिम आशियामधील सर्वांत मोठे मंदिर आहे. ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’चे उद्घाटन आज (१४ फेब्रुवारी २०२४) होणार असून या कार्यक्रमासाठी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी अबू धाबीमध्ये पोचले आहेत. पंतप्रधान मोदी १३ फेब्रुवारीला अबू धाबीच्या शेख जायद स्टेडियममध्ये ‘अहलान मोदी (हॅलो मोदी)’ या कार्यक्रमातून भारतीय लोकांशी संवाद साधतील. त्यानंतर ते १४ फेब्रुवारीला मंदिराजवळच्या एका कार्यक्रमातही उपस्थित रहाणार आहेत. अबू धाबीमधील ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिरा’चे काम जवळपास पूर्ण झाले आहे. या मंदिराची वैशिष्ट्ये या लेखाद्वारे येथे देत आहोत.

१. मंदिराविषयीची माहिती :

अ. ‘बी.ए.पी.एस्. हिंदु मंदिर हे यूएईमधील पहिले हिंदु मंदिर आहे.

आ. अबू धाबीचे क्राऊन प्रिन्स (राजकुमार) शेख महंमद बिन झायेद अल नाहयान यांनी वर्ष २०१५ मध्ये पंतप्रधान मोदी यांच्या दौर्‍याच्या वेळी मंदिराच्या बांधकामासाठी १३.५ एकर भूमी दान केली होती. वर्ष २०१७ मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते मंदिराची पायाभरणी करण्यात आली होती. यूएई सरकारने जानेवारी २०१९ मध्ये या मंदिरासाठी आणखी १३.५ एकर भूमी दान केली. अशा प्रकारे एकूण २७ एकर भूमीवर हे भव्य मंदिर उभारण्यात आले आहे.

इ. या मंदिराच्या संकुलात अभ्यास केंद्र, प्रार्थना सभागृह, शिक्षण केंद्र यांचा समावेश आहे.

ई. या मंदिराच्या भिंतींवर रामायण, शिव पुराण आणि भगवान जगन्नाथाच्या रथयात्रेची चित्रे काढण्यात आली आहेत. याखेरीज मंदिराजवळ एक गंगा घाट बनवण्यात आला आहे. गंगा- यमुना आणि सरस्वतीचा संगमही या मंदिरामध्ये दाखवण्यात आला आहे.

उ. मंदिराच्या पायामध्ये १०० ‘सेन्सर्स’ बसवण्यात आले आहेत. हे सेन्सर भूकंपाची शक्यता आणि तापमानातील पालट पडताळण्यासाठी बसवण्यात आले आहेत. या मंदिराच्या बांधकामासाठी ७०० कोटी रुपये व्यय आला आहे.

२. कार्यक्रमाला कोण उपस्थित असणार ?

या कार्यक्रमाला इंग्लंड, जर्मनी, इस्रायल, इटली, कॅनडा, आयर्लंड, बहरीन, घाना,  आर्मेनिया, बांगलादेश, चिली, युरोपियन युनियन, फिजी, अर्जेंटिना, सायप्रस, झेक प्रजासत्ताक, डोमिनिकन रिपब्लिक, इजिप्त, गॅम्बिया येथील राजदूत उपस्थित असणार आहेत.

३. मंदिराचे वैशिष्ट्य

या मंदिराचे सगळ्यात मोठे वैशिष्ट्य, म्हणजे मंदिरासाठी लोखंड किंवा स्टील यांच्याऐवजी दगडांचा वापर करण्यात आला आहे. हे मंदिर गुलाबी राजस्थानी वाळूचा खडक आणि पांढर्‍या इटालियन संगमरवरी दगडापासून बनवलेले आहे. मंदिराच्या आतील बांधकामात ४० सहस्र घनफूट संगमरवर वापरण्यात आला आहे. हे दगड भारतात कोरलेले असून त्यानंतर मंदिराच्या बांधकामासाठी यूएईमध्ये नेण्यात आले. महत्त्वाचे म्हणजे ‘यूएई’मधील उष्ण हवामानाचा या दगडांवर कोणताही परिणाम होणार नाही.

४. मंदिराचे बांधकाम व्यवस्थापकांचा अभिप्राय

मंदिराचे बांधकाम व्यवस्थापक मधुसूदन पटेल यांनी सांगितले, ‘‘आमचा बांधकामाच्या वेळचा अनुभव नावीन्यपूर्ण होता आणि आम्ही अनेक आव्हानांवर मात केली. आम्ही उष्णता-प्रतिरोधक असलेल्या ‘नॅनो टाईल्स’ आणि काचेच्या जड पॅनल्सचा वापर केला आहे.’’

(साभार : विविध संकेतस्थळे)