माझे शक्तीस्थान माझा धर्म आहे ! – दक्षिण आफ्रिकी क्रिकेटपटू केशव महाराज

दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज

केपटाऊन (दक्षिण आफ्रिका) – ‘माझे शक्तीस्थान माझा धर्म आहे. धर्म आणि अध्यात्म हे कठीण प्रसंगात माझे बलस्थान आहे’, असे वक्तव्य दक्षिण आफ्रिकेचा फिरकी गोलंदाज केशव महाराज यांनी केले आहे. उजव्या हातावर ‘ओम नमः शिवाय’ लिहिलेले तांब्याचे कडे घातलेल्या केशव महाराज यांना अयोध्येत येऊन श्री रामलल्लाचे दर्शन घ्यायची इच्छा आहे.

केशव महाराज यांची हिंदु धर्मावर आस्था असल्याची काही विशेष उदाहरणे !

१. केशव मैदानात त्यांचा भगवंतावर विश्‍वास व्यक्त करण्यात कधीही मागे हटत नाहीत. याचे एक उदाहरण काही आठवड्यांपूर्वी भारतीय संघाच्या दक्षिण आफ्रिका क्रिकेट दौर्‍याच्या वेळी पहायला मिळाले. केशव फलंदाजीसाठी मैदानात उतरतांना डीजेला ‘राम सियाराम’ हे गीत लावण्यास सांगत.

२. नोव्हेंबर-डिसेंबर २०२३ मध्ये भारतात झालेल्या एकदिवसीय विश्‍वचषकाच्या वेळी नेदरलँड्सविरुद्धच्या सामन्यात केशव यांच्या बॅटवर ‘ओम’ स्टिकर लावले होते. चेन्नई येथे  पाकला पराजित केल्यानंतर त्यांनी विजयाचा आनंद व्यक्त करतांना केलेल्या पोस्टमध्ये ‘जयश्री हनुमान’ लिहिले होते.

३. एका मुलाखतीत ते म्हणाले होते की, मी अतिशय धार्मिक आणि आध्यात्मात रुची असलेल्या कुटुंबातून आलो आहे. धर्म आणि अध्यात्म माझ्यावर लादले गेले नाहीत. मला नेहमीच असे वाटते की, ते मला कठीण परिस्थितीत मार्गदर्शन अन् दृष्टीकोन देतात.

४. केशव यांचे पणजोबा उत्तरप्रदेशातील सुलतानपूर येथून वर्ष १८७४ मध्ये डर्बन येथे मजूर म्हणून काम करण्यासाठी आले. केशव म्हणतात, ‘मी सर्व सण घरीच साजरे करतो आणि प्रत्येकाला संदेश देतो की, जीवनात श्रद्धा असली पाहिजे.’

५. अयोध्येतील श्री रामलल्लाच्या प्राणप्रतिष्ठेच्या वेळी केशव इतके उत्साहित होते की, त्यांनी त्यावर एक पोस्ट प्रसारित केली. ते म्हणाले की, मी प्रभु श्रीरामाचा निस्सीम भक्त आहे आणि हा दिवस विशेष होता. एवढ्या मोठ्या प्रमाणावर असे काही घडणे हे विशेष होते. हे जगात सर्वत्र घडत नाही आणि मला आनंद आहे की, ते घडले.

संपादकीय भूमिका

  • असा धर्माभिमान किती भारतीय हिंदु क्रिकेटपटूंमध्ये आहे ?