पुणे येथे ‘निर्भय बनो’ या सभेच्या आयोजकांसह २५० जणांवर गुन्हा नोंद ! 

जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याचे प्रकरण

पुणे –  येथे ‘निर्भय बनो’ या ‘राष्ट्रीय सेवा दला’कडून आयोजित केलेल्या कार्यक्रमाला पोलिसांनी अनुमती दिली नव्हती. ‘निर्भय बनो’ सभेला जात असतांना वागळे यांच्या गाडीवर काही भाजप कार्यकर्त्यांनी आक्रमण केले होते. या प्रकरणी भाजपचे शहराध्यक्ष धीरज घाटे यांच्यासह ४३ जणांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे, तसेच ‘महाविकास आघाडी’चे नेते, कार्यकर्ते, निखिल वागळे आणि ‘निर्भय बनो’ सभेचे आयोजक यांच्यासह २०० ते २५० लोकांवर गुन्हा नोंद करण्यात आला आहे. सभेच्या ठिकाणी जमावबंदीचा आदेश देण्यात आला होता. तरीही हे सर्वजण सभेच्या ठिकाणी गोळा झाले होते. त्यामुळे जमावबंदीच्या आदेशाचे उल्लंघन केल्याप्रकरणी हा गुन्हा नोंदवण्यात आला आहे.

आंदोलनकर्ते पोलिसांच्या कह्यात

वागळे त्यांच्या खासगी गाडीतून निघाले होते. त्यांनी पोलीस संरक्षण घेतले नाही. ते कार्यक्रमस्थळी जायला निघाल्यावर रस्त्यावर कुणीतरी दगडफेक केली. त्यामुळे ‘सीसीटीव्ही फुटेज’ पाहून संबंधितांवर कारवाई केली जाईल. आंदोलनकर्त्यांना कह्यात घेण्यात आले असून विश्रामबाग पोलीस ठाणे आणि डेक्कन पोलीस यांच्याकडून या प्रकरणाचे अन्वेषण करण्यात येईल.