प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा अमृत महोत्सव !
आळंदी (जिल्हा पुणे), ९ फेब्रुवारी (वार्ता.) – जी मंदिरे सरकारच्या कह्यात नाहीत, तिथेही भ्रष्टाचार झाला आहे. धर्मादाय विश्वस्त मंडळामध्येही वादविवाद आहेत. मंदिरासाठी जेवढे वाद होत आहेत, एवढे वाद तर प्रभु श्रीराम आणि रावण यांच्यामध्येही झालेले नाहीत, अशा पद्धतीने ही विश्वस्त मंडळी एकमेकांशी भांडत आहेत. आता मी ज्या भूमीवर उभा आहे, त्या भूमीच्या संदर्भातही वाद आहेत. सरकारी मंदिर हे खासगी मंदिर नाही. यासाठीच मी अशा आध्यात्मिक वातावरणात येतो आणि या वातावरणातून जेव्हा चांगल्या आणि वाईट मनाचे द्वंद होते, तेव्हा चांगले मन जिंकायचे असेल, तर यासाठी असे आध्यात्मिक वातावरण पाहिजे. व्यक्ती किंवा त्या ठिकाणचा अधिकार पालटल्याने मंदिरांचे प्रश्न सुटणार नाहीत, त्यासाठी प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज किंवा साध्वी ऋतंभरा देवी यांसारख्या विभूती जे प्रयत्न करत आहेत, त्यामध्ये त्यांना साहाय्य करणारे लाखो हात, हृदय आपल्याला सिद्ध करावे लागतील, असे मत राज्याचे सांस्कृतिक कार्यमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी दैनिक ‘सनातन प्रभात’च्या प्रितनिधीशी बोलतांना व्यक्त केले.
प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांच्या अमृत महोत्सवाच्या सहाव्या दिवशी त्यांचे आगमन झाले. त्या वेळी ते बोलत होते.
मुनगंटीवार पुढे म्हणाले की,
१. लव्ह जिहादच्या संदर्भातील जनजागृती वेगाने चालू आहे. लव्ह जिहाद, लँड जिहाद असे सगळेच जिहाद आता संपण्याच्या दिशेने वाटचाल चालू झाली आहे.
२. ज्या लोकांनी स्वतःला आलमगीर गाझी समजून आमच्यावर आक्रमण केले, सिंहासनासाठी कधी बापाला कारागृहात टाकले, भावाचा शिरच्छेद केला, तो आसुरी विचार आता भूमीत गाडला जाईल. आज आपल्या देशामध्ये आयुष्यात एकाही युद्धात पराभूत झाला नाही, तो चंगेज खान आदर्श नाही, चांदणी चौकामध्ये ३० सहस्र हिंदूंची कत्तल केली, तो नादीर शाह आदर्श नाही, तर छत्रपती शिवाजी महाराज हे आपले आदर्श आहेत. ‘जय भवानी जय शिवाजी’, असे म्हटले की, बेशुद्ध माणूसही शुद्धीवर येतो. म्हणून या दिशेने आता प्रवास चालू झालेला आहे.
३. विशालगडावरील अतिक्रमण काढण्यासाठी १ कोटी १६ लाख रुपये अतिक्रमण काढण्याचा निधी जमा झाला आहे. उच्च न्यायालयाने या विषयाला स्थगिती दिली आहे. आपल्या देशामध्ये न्यायव्यवस्था आहे. त्यामुळे आपल्याला थांबावे लागत आहे.
‘सोनेरी पुरुषाला नमन करतांना आपलेही हात सोन्याचे होतील’, हा भाव घेऊन मी येथे आलो आहे ! – सुधीर मुनगंटीवार
गीता भक्ती अमृत महोत्सवाच्या या पवित्र परिसरात येतांना आणि आध्यात्मिक विचार ऐकतांना मला मनापासून आनंद झाला. देशातील आध्यात्मिक विचारांची गंगोत्री ज्यांच्या मुखातून प्रसवते त्या सर्वांचे दर्शन घेतांना आनंद तर झालाच; पण प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराजांना भेटून अत्युच्च आनंद झाला. प्रभु श्रीरामाचे मंदिर बनवण्यामागे प.पू. स्वामी गोविंददेव गिरि महाराज यांचा वाटा आहे. त्या श्रीरामजन्मभूमी न्यासाचे ते कोषाध्यक्ष आहेत. गर्भगृहातील महाद्वारापासून मंदिरासाठी लागणार्या छोट्या छोट्या गोष्टींसाठी लागणारे लाकूड माझ्या मतदारसंघातून पाठवले आहे, तेव्हाही महाराज आशीर्वाद देण्यासाठी आले. आज त्यांचे दर्शन घ्यावे, त्यांना अभिवादन करावे, त्यांचे आशीर्वाद घ्यावे, त्यांच्या मुखातून निघणारे अमृत कण वेचण्यासाठी, तसेच ‘या हाताने त्यांना अभिवादन करतांना, या सोनेरी पुरुषाला नमन करतांना आपलेही हात सोन्याचे होतील’, हा भाव घेऊन मी आलो आहे.