आजच्या तरुणांसमोर कुठलेही ‘रोल मॉडेल’ (आदर्श) नाही, म्हणजे ‘ज्याच्याकडे पाहून आपले जीवन जगावे, असे त्याला वाटेल’, असे आसपास कुणी मिळतच नाही. आजच्या तरुणांच्या समोर स्वार्थी, स्वतःच्या कामासाठी खोटे बोलणारे, प्रसंगी फसवणारे आणि आत्ममग्न अशा लोकांचे जत्थे भरलेले आहेत. कुणासाठी निःस्वार्थपणे काम करणारी मंडळी स्वतःच्या आसपास नसल्यामुळे दुसर्याला आनंद देण्यात जगणे, म्हणजे खरे जीवन हा विचारच तरुणांसमोर येत नाही. एक तर कामाचा ताण इतका प्रचंड आहे की, प्रतिदिनच्या दिवसाचे टार्गेट (लक्ष्य) कंप्लीट (पूर्ण) करण्यासाठी प्रचंड ओढाताण होते. दिवसातील १४ ते १६ घंटे काम केल्यानंतर सर्जनात्मक काही करावे, असा भावच होत नाही. मग जो ‘विकेंड’ (शनिवार-रविवार) मिळतो, त्यामध्ये केवळ शरीरसुख ओरबाडायचे, एवढेच आजच्या तरुणाला सुचते. ‘विकेंड’च्या काळात महानगरांच्या आसपास होणारी वाहतूक कोंडी आणि अपघातांच्या बातम्या आकडेवारीसह आपण नेहमी वाचतो. ‘महादेवाच्या पिंडीवर दूध वहाण्यापेक्षा गरिबांना वाटा’, असे म्हणणारे लोक मौजमजेसाठी लाखो लिटर दारू आणि पैसे अक्षरशः वाया घालतात, हा मोठा विरोधाभास ! कुठलीही सुट्टी लागली की, लोक घरातून अक्षरशः बाहेर सुखाच्या शोधात धावत असतात. सुखाचा शोध बाहेर चालू आहे. याला ‘व्हाईट मॅन्स बर्डन’ असे म्हणतात. गोर्या कातडीचे आणि पाश्चात्त्य विचारांचे गारुड आपल्या तरुणांवर आजतागायत तसेच आहे !
(साभार : त्रैमासिक ‘सद्धर्म’, जुलै २०२३)