सच्चिदानंद परब्रह्म डॉ. आठवले यांच्याविषयी भाव असणार्‍या अकोला येथील (कै.) श्रीमती वेणूताई रामकृष्ण पाठक (वय ८३ वर्षे) !

१९.१.२०२४ च्या रात्री ११ वाजता अकोला येथील सनातनच्या साधिका सौ. मंदाकिनी भालतीलक यांच्या आई श्रीमती वेणूताई रामकृष्ण पाठक (वय ८३ वर्षे) यांचे निधन झाले. ९.२.२०२४ या दिवशी त्यांचे मासिक श्राद्ध आहे. त्या निमित्त त्यांची मुलगी सौ. मंदाकिनी भालतीलक यांना त्यांच्याविषयी जाणवलेली सूत्रे येथे दिली आहेत.

(कै.) श्रीमती वेणूताई रामकृष्ण पाठक

१. आईला व्यावहारिक गोष्टींपेक्षा देवाची ओढ असणे

‘माझ्या आईच्या माहेरची परिस्थिती पुष्कळ गरिबीची होती. घरात आई सर्वांत मोठी असल्यामुळे तिच्यावर घराचे पुष्कळ दायित्व होते. त्यामुळे आईचे शालेय शिक्षण झाले नाही. माझे आजोबा नाथ संप्रदायानुसार साधना करत असत. ते कथा वाचकही होते. त्यांचे गुण आईमध्ये आले. त्यामुळे आईला व्यावहारिक गोष्टींपेक्षा देवाची ओढ अधिक होती. तिचे प्रभु रामचंद्र आणि भगवान शिव हे आराध्य दैवत होते.

२. आई निरक्षर असूनही गुरुकृपेमुळे तिला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचता येणे आणि त्यातील परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे छायाचित्र पाहून तिने ‘हेच श्रीराम आहेत’, असे म्हणणे

पूर्वी माझ्या घरी सनातन संस्थेचा सत्संग होत असे. आई सत्संगाच्या आदल्या दिवशी माझ्या घरी रहायला यायची. तेव्हा माझ्याकडे साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ येत असे. आई निरक्षर असल्यामुळे ती तो नुसता चाळायची. त्यातील गुरुमाऊलींचे छायाचित्र पाहून ती म्हणायची, ‘‘हेच श्रीराम आहेत !’’ पुढे गुरुकृपेने तिला साप्ताहिक ‘सनातन प्रभात’ वाचता येऊ लागले.

३. काही मासांपूर्वी पू. अशोक पात्रीकर (सनातनचे ४२ वे (समष्टी) संत, वय ७३ वर्षे) आमच्या घरी येऊन गेल्यापासून आईचा नामजप अखंड होत होता.

४. निधनानंतर जाणवलेली सूत्रे

सौ. मंदाकिनी भालतीलक

४ अ. आईच्या पार्थिवाजवळ सुगंध येणे : आईचे निधन झाल्यावर मी माझ्या भावजयीला आईच्या शेजारी सनातनची उदबत्ती लावून ठेवायला सांगितली होती; पण भावजय उदबत्ती लावायला विसरली, तरीही मला तिच्या पार्थिव देहाभोवती एक प्रकारचा सुगंध येत होता. तेव्हा ‘सुगंध कसा काय येत आहे ?’, याचे मला आश्चर्य वाटले.

४ आ. मला आईचा चेहरा आनंदी दिसला आणि चेहर्‍यावर चैतन्य जाणवले.

४ इ. मला ‘आईचा नामजप चालू आहे’, असे जाणवले.

५. कृतज्ञता

आईविषयीची ही सूत्रे लिहितांना मला गुरुमाऊलींप्रती पुष्कळ कृतज्ञता वाटली आणि ‘मूकं करोति वाचालं पङ्गुं लङ्घयते गिरिम् ।’, म्हणजे ‘ज्याची कृपा मुक्यालाही बोलते करते आणि पांगळ्यालाही पर्वत ओलांडण्यास समर्थ बनवते’ या ओळी आठवल्या. ‘हे सर्व गुरुमाऊलींनी माझ्याकडून लिहून घेतले’, यासाठी त्यांच्या चरणी कोटीशः कृतज्ञता !’

– सौ. मंदाकिनी भालतीलक, अकोला (३०.१.२०२४)

येथे प्रसिद्ध करण्यात आलेल्या अनुभूती या ‘भाव तेथे देव’ या उक्तीनुसार साधकांच्या वैयक्तिक अनुभूती आहेत. त्या सरसकट सर्वांनाच येतील असे नाही. – संपादक