१. प.पू. कलावतीआई यांचे सुवचन
‘जगात सर्वकाही मिळणे सुलभ आहे; पण ‘गुरुकृपारूपी भाग्य लाभणे’, हे मात्र अतीदुर्लभ आहे. गुरुकृपारूप समुद्रात विषयाशक्तीरूप नद्या विलीन होतात. गुरुकृपारूप अग्नीत पाप, ताप, दैन्य, विघ्न संकटादी दुरिते (पापे) जळून भस्म होतात. स्वार्थाने गढूळ झालेले प्रेम गुरुकृपेविना निर्मळ होत नाही. गुरुकृपारूप दिवा जवळ नसेल, तर अज्ञानांधकारातच चाचपडत रहावे लागते. गुरुकृपाशक्ती ही अखंड वहात असलेल्या प्रेमनदीला घातलेला ‘मी आणि माझेपणा’ यांचा बांध फोडून टाकते. गुरुकृपाशक्ती ही शिष्याची बहिर्मुख असलेली वृत्ती अंतर्मुख करून त्याला ‘जीवपणा’तून सोडवून ‘शिवपणा’प्रत पोचवते. गुरुकृपाशक्ती ही मनुष्याला आचार, विचार आणि उच्चार यांच्या उपद्रवापासून अन् देहबुद्धीच्या बंधनापासून सोडवून आत्मसुखाच्या स्वतंत्र वातावरणात नेऊन सोडते.’
– प.पू. कलावतीआई, बेळगाव (साभार : ‘बोधामृत’, प्रकरण : ‘गुरुपौर्णिमा’, सुवचन क्र. २७)
२. वरील सुवचनावर पू. किरण फाटक यांनी केलेले विवेचन !
२ अ. गुरुकृपायोगाचे महत्त्व
१. ‘प.पू. कलावतीआई म्हणतात, ते अगदी योग्य आहे; कारण गुरुकृपेविना आपल्याला चांगले विचार, चांगले आचार, चांगली बुद्धी आणि चांगले संस्कार मिळू शकत नाहीत.
२. ‘गुरुकृपायोग’ हा आपल्या भाग्यात असावा लागतो.
३. ‘गुरुकृपायोग’ हा माणसाच्या जन्मोजन्मीच्या पुण्याईने कुठल्या तरी एका जन्मात येतो.
४. गुरुकृपा झाली की, सर्वकाही सोपे होते. गुरुकृपेने अनुक्रमे काम, क्रोध, लोभ, मोह, मद, मत्सर आणि अहंकार शांत होत जातात अन् माणूस शांतीच्या मार्गावर मार्गक्रमण करू लागतो.
५. गुरूंची कृपा झाली की, साधक जन्म-मरणाच्या शृंखलेतून मुक्त होतो. शेवटी तो वैश्विक शक्तीमध्ये विलीन होतो.
२ आ. गुरूंचे महत्त्व
१. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात,
श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा ।
इतरांचा लेखा (पर्वा) कोण करी ।। १ ।।
राजयाची कांता काय भीक मागे ।
मनाचिया जोगे सिद्धि पावे ।। २ ।।
कल्पतरुतळवटीं जो कोणी बैसला ।
काय वाणी त्याला सांगिजोजी ।। ३ ।।
ज्ञानदेव म्हणे तरलों तरलों ।
आतां उद्धरलों गुरुकृपें ।। ४ ।।
अर्थ : संत ज्ञानेश्वर महाराज सांगतात, ‘अत्यंत श्रेष्ठ अशा श्री गुरूंचा पाठिंबा असेल, तर अन्य ऋद्धि-सिद्धि किंवा सांसारिक सुखे यांची पर्वा कोण करील ? मनाप्रमाणे सर्व ऐश्वर्य भोगण्यास मिळणार्या राजाच्या बायकोला भीक मागायची पाळी येईल काय ? किंवा कल्पतरूखाली बसलेल्या पुरुषास काय कमी आहे ? श्री गुरु निवृत्तीरायांच्या कृपेने माझा उद्धार झाला आणि मी संसाररूपी समुद्रातून पार पडलो.’
२. सद्गुरु हे कल्पतरूसारखे आहेत. त्यांच्या सहवासात जो आला, त्याच्या सगळ्या इच्छा पूर्ण होतात आणि शेवटी तो मोक्षास पावतो. कल्पतरु म्हणजे ‘जो जें वांछील तो तें लाहो । प्राणिजात ।।’ (ज्ञानेश्वरी, अध्याय १८, ओवी १७९५) (म्हणजे ‘प्राणिमात्रात जो जे इच्छील, ते त्याला प्राप्त व्हावे’), असा वृक्ष असतो.
३. ज्याला सद्गुरुकृपेचा लाभ झाला, त्याला कुणाकडूनच काहीही अपेक्षा नसते; कारण सद्गुरु त्याचे संकल्प आणि विकल्प यांना पूर्णविराम देतात अन् त्याच्या मनात शांतीचे एक ब्रह्मकमळ फुलवतात; म्हणून संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ‘श्रीगुरुसारिखा असतां पाठीराखा । इतरांचा लेखा कोण करी ।।’, म्हणजे ‘स्वतः सद्गुरु आपल्या पाठीशी असतांना अन्य गोष्टींची पर्वा कोण करील ?’
२ इ. गुरुकृपेची काही उदाहरणे : सर्व संतांना गुरु मिळाले. संत ज्ञानेश्वरांना संत निवृत्तीनाथ हे गुरु मिळाले, तर ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराजांना संत तुकाई यांच्या गुरुकृपेचा लाभ झाला. वेणास्वामींना संत रामदासस्वामी शोधत आले आणि त्यांनी वेणास्वामींना सर्व बंधनांतून मुक्त केले. बाळाप्पा आणि चोळप्पा यांना अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांच्या गुरुकृपेचा लाभ झाला अन् त्यांचे जीवन पार बदलून गेले. गुरुकृपेची अशी अनेक उदाहरणे आपल्याला आढळतील.
२ ई. गुरूंची सेवा केल्यामुळे अहंकार कमी होत जातो आणि शेवटी तो नाहीसा होतो ! : या सर्व शिष्यांनी गुरूंची सेवा न कंटाळता आणि अतिशय निरपेक्षतेने पुष्कळ काळ केली. सेवेमुळे गुरु त्यांच्यावर प्रसन्न झाले आणि गुरूंनी त्यांच्यावर कृपा केली; म्हणून हृदयामध्ये ‘सेवाभाव’ असणे फार आवश्यक असते. हृदयामध्ये सेवाभाव जागृत झाला की, अहंकाराला आपोआप वेसण बसते. सेवाभावामुळे अहंकार कमी होत जातो आणि शेवटी नाहीसा होतो.
२ उ. गुरु पाठीराखे असतांना भीती कशाला ?
१. बरेच लोक इतरांसाठी जगत असतात. ‘लोक काय म्हणतील ?’, याची पुष्कळ लोकांना भीती वाटते. यात अनेक लोकांची मानसिक घुसमट होत असते; परंतु ‘ज्या जगास भिऊन हे लोक वावरत असतात, त्या जगातील फारच कमी लोक संकटात मदत करण्यासाठी धावून येतात’, हे लोक विसरून जातात.
२. निःशंक हो निर्भय हो मना रे । प्रचंड स्वामीबळ पाठीशी रे ।।
‘अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थांनी ‘भिऊ नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे’, अशी ग्वाही त्यांच्या भक्तांना दिलेली आहे, तरीही काही भक्तांच्या मनातील भीती कणानेही कमी होत नाही’, हे भक्तांचे दुर्दैवच म्हणावे लागेल’, असे मला वाटते.
३. समर्थ रामदासस्वामी म्हणतात,
भवाच्या भये काय भीतोस लंडी । धरी रे मना धीर धाकासी सांडी ।
रघुनायकासारिखा स्वामी शीरी । नुपेक्षी कदा कोपल्या दंडधारी ।। – मनोबोध, ओवी २७
अर्थ : समर्थ रामदासस्वामी मनाला म्हणतात, ‘जगाच्या भीतीने तू घाबरून का रहातोस ? तुझ्या मस्तकावर प्रत्यक्ष श्रीरामाचे कृपाछत्र आहे, तर मग भीती सोड. प्रत्यक्ष यमराज जरी क्रुद्ध होऊन आले, तरी रामराया त्यांचे निवारण करील. ‘भव’ म्हणजे घडणे. जगामध्ये स्थिर असे काहीच नाही. केवळ भगवंत स्थिर आहे आणि तो अनंत आहे. जगामध्ये सेकंदागणिक लाखो घटना घडत असतात. प्रत्येक माणसावर या घटनांचा बरा-वाईट परिणाम होतच असतो. या घडण्यालाच ‘भवसागर’, असे म्हणतात. समर्थ रामदासस्वामी म्हणतात, ‘हे मना, या घडण्या-बिघडण्याला, तू का घाबरतोस ? रघुनायकासारखा तुझा स्वामी बरोबर असल्यावर तुला रे कसली भीती ?’भक्ती आणि श्रद्धा माणसाला नवीन जीवन जगण्याची संजीवनी देत असते. जर भक्त त्याची भक्ती आणि श्रद्धा सद्गुरूंना अर्पण करत असेल, तर सद्गुरु त्याची काया-वाचा-मन यांचे रक्षण करत असतात.
२ ऊ. संतांचा देवाप्रती दृढ भाव असल्याने त्यांना देहाची आसक्ती नसते ! : माणूस जन्मल्यापासून आपल्या देहालाच स्वतःचे अस्तित्व समजत असतो आणि तो या देहासाठी जगत असतो. ‘या देहासाठी तो काय काय करत असतो ?’, हे न सांगितलेलेच बरे ! ‘सर्व सुखे ही देहामुळेच प्राप्त होतात’, असे त्याला वाटत असते; परंतु संत नामदेव महाराज म्हणतात, ‘देह जावो अथवा राहो । पांडुरंगी दृढ भावो ।।’, म्हणजे ‘आम्हाला देहाची आसक्ती नाही. आमचा पांडुरंगाप्रती दृढ भाव आहे, मग आम्हाला देहाची चिंता नाही.’
२ ए. सद्गुरुकृपेने माणसाला आत्मज्ञान होते ! : माणूस जन्मापासून मरणापर्यंतचा प्रवास या देहासाठीच करत असतो आणि ‘आपण जन्माला का आलो ? देवाने आपल्याला या पृथ्वीवर कोणते कार्य देऊन पाठवले ?’, हे तो पार विसरून जातो. जेव्हा त्या जिवाला ‘देह म्हणजे आपण नाही’, असे ज्ञान होते, तेव्हा त्या ज्ञानालाच ‘आत्मज्ञान’, असे म्हणतात; परंतु हे आत्मज्ञान होण्यासाठी सद्गुरुकृपेचा लाभ व्हावा लागतो; म्हणून प.पू. कलावतीआई म्हणतात, ‘गुरुकृपारूप अग्नीत पाप, ताप, दैन्य, विघ्न, संकटादी दुरिते (पापे) जळून भस्म होतात.’
२ ऐ. ‘आत्मनिवेदन भक्ती’ केल्याने गुरुकृपा होते ! : श्री व्यंकटेशस्तोत्रात ‘आत्मनिवेदन भक्ती’ ही फार प्रकर्षाने जाणवते. त्यात देवीदास म्हणतात,
जाणत असतां अपराधी नर । तरी कां केला अंगीकार ।
अंगीकारावरी अव्हेर । समर्थें केला न पाहिजे ।। – व्यंकटेशस्तोत्र, ओवी ३६
अर्थ : देवा, ‘मी पापी आहे’, हे जेव्हा तुला समजले, तेव्हाही तू मला स्वीकारलेस. आता मला सोडू नये.
धांव पाव रे गोविंदा । हाती घेऊनया गदा । करी माझ्या कर्मांचा चेंदा । सच्चिदानंदा श्रीहरी ।। – व्यंकटेशस्तोत्र, ओवी ३७
अर्थ : अरे गोविंदा, सच्चिदानंदा, श्रीहरि, तू गदा घेऊन धावत ये आणि माझी कर्मे नष्ट कर. नवविधा भक्तीमध्ये ‘आत्मनिवेदन भक्ती’ ही सगळ्यांत उच्च मानली जाते. जेव्हा भक्त देवाला स्वतःविषयी सर्वकाही सांगतो आणि देवाशी बोलतो अन् देवाच्या चरणांशी लीन होऊन ‘माझी पापे, दुर्गुण सर्व धुऊन टाक’, अशी विनंती करतो, तेव्हा देव किंवा सद्गुरु त्याला पावल्याविना रहात नाहीत.म्हणून प.पू. कलावतीआई सांगतात, ‘गुरुकृपाशक्ती ही मनुष्याला आचार, विचार आणि उच्चार यांच्या उपद्रवापासून अन् देहबुद्धीच्या बंधनापासून सोडवून आत्मसुखाच्या स्वतंत्र वातावरणात नेऊन सोडते.’
माणसाने कुठलेही कर्म करतांना दहा वेळा विचार केला पाहिजे !‘पुनरपि जननं पुनरपि मरणम् ।’ (चर्पटपञ्जरिकास्तोत्र, श्लोक २१) , म्हणजे ‘जन्म आणि मरण यांचे चक्र (मोक्षप्राप्ती होईपर्यंत) नेहमी चालू रहाते’, असे म्हटले आहे. माणूस आपल्या कर्मांनीच पुनःपुन्हा जन्म घेत असतो. कोणाचे तरी देणे चुकवण्यासाठी किंवा कुणाकडून काहीतरी घेण्यासाठी माणसाला जन्म मिळतो. माणसाच्या वाईट कर्मांमुळे त्याला या जन्मात अनेक वेदना, यातना, दुःख आणि चिंता सहन कराव्या लागतात; म्हणून माणसाने कुठलेही कर्म करतांना दहा वेळा विचार केला पाहिजे. ‘आपण कुणाला दुखवत तर नाही ना ? आपण आपल्या कृतीने कुणाचे नुकसान तर करत नाही ना ? आपल्या कृतीमुळे समाज आणि देश यांचे नुकसान तर होत नाही ना ?’, हे बघितले पाहिजे. – (पू.) किरण फाटक (२९.९.२०२३) |
– (पू.) किरण फाटक (शास्त्रीय गायक), डोंबिवली, जिल्हा ठाणे. (२९.९.२०२३)