Cracker Factory Fire : हरदा (मध्यप्रदेश) येथे फटाक्यांच्या अवैध कारखान्यातील स्फोटामुळे ८ जणांचा मृत्यू

६० हून अधिक जण घायाळ !

हरदा (मध्यप्रदेश) – येथे एका बेकायदेशीररित्या चालवल्या जाणार्‍या फटाक्यांच्या कारखान्यात झालेल्या स्फोटामुळे ८ जणांचा मृत्यू झाला, तर ६० हून अधिक जण घायाळ झाले. स्फोटामुळे या कारखान्यासह शेजारी घरांना आग लागली. आगीचे कारण सध्या समजू शकलेले नाही. येथे प्रशासनाकडून साहाय्यता कार्य चालू करण्यात आले असून येथील १०० हून अधिक घरे रिकामी करण्यात आली आहे. या कारखान्यास सहस्रो टन दारूगोळा असल्याने उशिरापर्यंत सौम्य स्वरूपाचे स्फोट येथे होत होते. त्यामुळे आगीवर नियंत्रण मिळवण्यास अनेक घंटे लागले. या प्रकरणी मुख्यमंत्री डॉ. मोहन यादव यांनी तातडीने साहाय्यता कार्य करण्याचे आदेश दिले.

येथील मगरधा मार्गावरील बैरागड गावात हा कारखाना आहे. ६ फेब्रुवारीला सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास कारखान्यात स्फोट झाला. याचा आवाज २० किलोमीटरपर्यंत ऐकू गेला.

संपादकीय भूमिका

राज्यात फटाक्यांचे अवैध कारखाने चालू असल्याची माहिती प्रशासन आणि पोलीस यांना ठाऊक नाही, असे कसे म्हणता येईल ? याचाच अर्थ भ्रष्टाचार होत असल्यामुळेच अशा कारखान्यांकडे दुर्लक्ष केले जात आहे, हे उघड आहे. सरकार आतातरी यावर कारवाई करील का ?