पुणे येथे अंत्यविधीसाठी गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या ‘गोकाष्ठा’चा वापर !

पुणे – नवी पेठेतील ‘वैकुंठ स्मशानभूमी’मध्ये होणार्‍या अंत्यविधीमुळे परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात प्रदूषण होत आहे. त्याविषयी नागरिकांच्या तक्रारी होत्या. त्यामुळे आता पारंपरिक पद्धतीने होणार्‍या लाकडांऐवजी गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या ‘गोकाष्ठा’चा वापर केला जाणार आहे. त्यातून हवा प्रदूषण अल्प होण्यासह अनेक लाभ होत असल्याचे निष्कर्ष पुढे येत आहेत. त्यामुळे प्रायोगित तत्त्वांवर एका स्वयंसेवी संस्थेला अनुमती दिली आहे. याचा प्रारंभ ६ फेब्रुवारीपासून करण्यात येणार असल्याचे समजते.

गायीच्या शेणापासून सिद्ध केलेल्या गोकाष्ठाचा उपयोग अंत्यविधीसाठी केल्यास वृक्षतोड थांबून, प्रदूषणही अल्प होईल. शहरातील स्मशानभूमीमध्ये गोकाष्ठाचा वापर करण्यास अनुमती द्यावी, असा प्रस्ताव ‘जय जिनेंद्र’ या स्वयंसेवी संस्थेने महापालिकेला दिला होता. गोकाष्ठामध्ये कापूर, तूप आणि चंदन यांचा अंत्यविधीसाठी वापर केल्यास त्यातून ऑक्सिजन बाहेर पडतो. प्रदूषण अल्प होऊन वृक्षतोड थांबण्यास साहाय्य होते. अशा प्रकारे पर्यावरण संरक्षण होत असल्याने त्याला ‘पर्यावरणपूरक अंत्यविधी’ म्हटले जाते.