नथुराम गोडसे यांचे समर्थन करणार्‍या प्राध्यापिकेच्या विरोधात देशद्रोहाचा गुन्हा नोंद !

केरळमध्ये साम्यवादी विद्यार्थी संघटनेच्या तक्रारीनंतर कारवाई !

प्रतिकात्मक छायाचित्र

कोच्ची – नथुराम गोडसे यांचे समर्थन करणार्‍या कोळीकोड येथील प्रा. शैजा अंदवन यांच्या विरोधात पोलिसांनी देशद्रोहाचा गुन्हा नोंदवला आहे. साम्यवाद्यांच्या विद्यार्थी संघटनेने त्यांच्या विरोधात तक्रार केल्यानंतर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. प्रा. अंदवन या ‘नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी (एन्.आय.टी.) कालिकत’ येथे वरिष्ठ प्राध्यापिका म्हणून कार्यरत आहेत. त्या येथील मेकॅनिकल इंजिनीअरिंग विभागात शिकवतात. ३० जानेवारी या दिवशी त्यांनी म. गांधींच्या संदर्भात पोस्ट प्रसारित केली होती. त्यात त्यांनी ‘नथुराम गोडसे हे भारतातील अनेक लोकांचे नायक आहेत. भारताला वाचवल्याबद्दल गोडसे यांचा अभिमान आहे’, असे लिहिले होते, तसेच नथुराम गोडसे यांचे समर्थन केले होते. त्यांची ही पोस्ट सामाजिक माध्यमांत मोठ्या प्रमाणात प्रसारित झाली.

प्रा. अंदवन यांच्या हकालपट्टीची मागणी !

हिंदुत्वनिष्ठ अधिवक्ता कृष्णा राज यांनी नथुराम गोडसे यांच्याविषयी पोस्ट प्रसारित केली होती. त्यावर स्वतःचे विचार व्यक्त करतांना प्रा. अंदवन यांनी पोस्ट प्रसारित केली. सामाजिक माध्यमांवरून त्यांच्यावर टीका होऊ लागल्यावर प्रा. अंदवन यांनी पोस्ट काढून टाकली होती. तरीही साम्यवाद्यांच्या विद्यार्थी संघटनेने त्यांच्या विरोधात तक्रार केल्यावर पोलिसांनी गुन्हा नोंदवला. त्यांची एन्.आय.टी.मधून हकालपट्टी करण्याची मागणी या संघटनांनी केली आहे. कोळीकोड येथील काँग्रेसचे खासदार एम्.के. राघवन् यांनी एन्.आय.टी.च्या संचालकांना पत्र लिहून त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी केली आहे.

गोडसे यांच्याविषयीची माहिती सामान्य लोकांना ठाऊक नाही ! – प्रा. अंदवन

मला गाधीजींच्या हत्येचे उदात्तीकरण करायचे नव्हते. गोडसे यांचे ‘मी गांधींची हत्या का केली ?’, हे पुस्तक वाचले आहे. या पुस्तकात अनेक खुलासे आणि माहिती आहे, जी सर्वसामान्यांना ठाऊक नाही. यासंदर्भात फेसबुकवरील एका पोस्टवर मी प्रतिक्रिया व्यक्त केली होती. जेव्हा मी पाहिले की, लोक माझ्या टिप्पणीचा चुकीचा अर्थ लावत आहेत, तेव्हा मी ती पोस्ट काढून टाकली.

‘एन्.आय.टी.’मधील द्वेषमूलक कारवाया !

२२ जानेवारी या दिवशी अयोध्येत श्री रामललाच्या प्राणप्रतिष्ठेचा कार्यक्रम झाला. त्या विरोधात साम्यवादी संघटनेच्या विद्यार्थ्यांनी ‘एन्.आय.टी.’च्या परिसरात फलक लावले होते. त्यामुळे वाद निर्माण झाला होता.

संपादकीय भूमिका

  • साम्यवाद्यांची सत्ता असलेल्या केरळमधील पोलीस याहून वेगळे काय करणार ?
  • अन्य वेळी अभिव्यक्तीस्वातंत्र्याचा ढोल बडवणारे अशा वेळी कोणत्या बिळात जाऊन लपतात ?