रत्नागिरीत ४ फेब्रुवारीला छत्रपती संभाजी महाराजांचा पुतळा आणि ५ फेब्रुवारीला श्री विठ्ठलमूर्ती यांचे होणार अनावरण  

रत्नागिरी – रविवार, ४ फेब्रुवारी या दिवशी शहरातील छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे, तर सोमवार, ५ फेब्रुवारी या दिवशी श्री विठ्ठलमूर्तीचे अनावरण पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते होत आहे. या सोहळ्याच्या वेळी पोवाडे आणि लोकगीते, तसेच वारकर्‍यांचे रिंगण पहाण्याचे भाग्य लाभणार आहे. सर्वांनी या सोहळ्यामध्ये सहभागी व्हावे, असे आवाहन येथील नगर परिषदेचे मुख्याधिकारी तुषार बाबर यांनी केले.

या वेळी मुख्याधिकारी तुषार बाबर म्हणाले की,

१. शहरातील थिबा पॅलेस परिसरातील जिजामाता उद्यानात राज्यातील सर्वांत उंच  ५६ फुटी उंच पुतळा उभारण्यात आला आहे. यावर अनुमाने दीड कोटी रुपये खर्च करण्यात आले आहेत. माळनाका येथील श्री विठ्ठलाची मूर्ती ३० फुटांची असून, त्यावरही १ कोटी २५ लाख रुपये खर्च केले आहेत.

२.  ४ फेब्रुवारी या दिवशी सायंकाळी ६ वाजता हा कार्यक्रम होत असून छत्रपती संभाजी महाराज यांच्या पुतळ्याचे अनावरण प्रसंगी गायक स्वप्निल बांदोडकर यांच्याकडून पोवाडे आणि लोकगीते सादर केली जाणार आहेत.

३.  ५ फेब्रुवारी या दिवशी राज्यातून सहस्रो वारकर्‍यांच्या उपस्थितीत मारुति मंदिर, जेलनाका ते माळनाका येथील उद्यानापर्यंत दिंडी काढण्यात येणार आहे. या दिंडीत रिंगण पहाता येणार आहे. रत्नागिरीच्या इतिहासात पहिल्यांदाच हे भाग्य लाभले असून रिंगणात अश्व आणि बैलगाडीचा समावेश आहे.