अधिकोषाकडे भूमी गहाण ठेवून फसवणूक करणार्‍या संचालकांसह अधिकोषाच्या अधिकार्‍यांवर पुणे येथे गुन्हा नोंद !

पुणे – भागीदारी असलेल्या फर्मच्या संचालकांनी संगनमत करून अमित बेलदरे यांची भूमी विकसनासाठी घेऊन ती अधिकोषाकडे गहाण ठेवून ६३ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज घेतले होते. संचालकांनी विकसन करारनाम्यातील अटींची पूर्तता न करता बेलदरे यांची फसवणूक केली. या प्रकरणी अमित बेलदरे यांच्या तक्रारीवरून ‘मे. अमित एंटरप्रायजेस दि इंडियन हौसिंग लि.’च्या सर्व संचालकांसह अधिकोषाच्या अधिकार्‍यांवर भारती विद्यापीठ पोलीस ठाण्यात गुन्हा नोंद करण्यात आला आहे.

अमित बेलदरे ‘अमित एंटरप्रायजेस दि इंडियन हौसिंग लि.’ फर्ममध्ये भागीदार आहेत. आरोपींनी संगनमत करून तक्रारदार बेलदरे यांच्या कुटुंबियांचा विश्वास संपादन केला. त्यांची आंबेगाव बु. येथील भूमी विकसन करारनामा करून विकसनासाठी घेतली; मात्र आरोपींनी बेलदरे यांची दिशाभूल करून या भूमीत कोणतेही काम केले नाही. तसेच विकसन करारनामा आणि कुलमुखत्यार पत्रातील अटींची पूर्तता केली नाही. तसेच याविषयी बेलदरे यांनी विचारणा केल्यावर त्यांना ‘तुम्हाला काय करायचे ते करा, तुम्हाला बघून घेतो’, अशी धमकी दिली. आरोपींनी बेलदरे यांची भूमी गहाण ठेवून ६३ कोटी ९५ लाख रुपयांचे कर्ज घेतले.