लालकृष्ण अडवाणी यांना ‘भारतरत्न’ घोषित ! (BHARATRATNA Lalkrishna Advani)

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडून घोषणा

लालकृष्ण अडवाणी

नवी देहली – देशाचे माजी उपपंतप्रधान आणि भाजपचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी यांना देशाचा सर्वोच्च नागरी सन्मान पुरस्कार ‘भारतरत्न’ घोषित करण्यात आला आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांच्या ‘एक्स’ खात्यावरून ही माहिती दिली. अडवाणी यांना वर्ष २०१५ मध्ये दुसरा सर्वोच्च नागरी पुरस्कार पद्मविभूषण याने सन्मानित करण्यात आले होते.

पंतप्रधान मोदी यांनी पोस्टमध्ये लिहिले की, मी अडवाणी यांच्याशी संवाद साधला असून या पुरस्काराने सन्मानित झाल्याविषयी त्यांचे अभिनंदन केले. आमच्या काळातील सर्वांत प्रतिष्ठित नेत्यांपैकी एक असलेले अडवाणी यांचे भारताच्या विकासासाठी महत्त्वपूर्ण योगदान राहिले आहे. संघटनेच्या तळापासून त्यांनी कामाला आरंभ केला आणि उपपंतप्रधान पदापर्यंत येऊन देशाची सेवा करण्याचे काम केले.

केंद्रीय गृहमंत्री आणि माहिती अन् प्रसारण मंत्री म्हणून काम करत असतांना त्यांनी स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. त्यांनी संसदेत उपस्थित केलेली सूत्रे आणि त्यांची भाषणे आमच्यासाठी दिशादर्शक अन् समृद्ध असा अनुभव देणारी ठरली आहेत.