नागपूर – गडचिरोली जिल्ह्यात विकासकामांवर कोट्यवधी रुपयांचा निधी व्यय केला जात असतांना नक्षलवाद्यांच्या हिंसक कारवायांमध्ये आतापर्यंत ४३ वर्षांत ५१ कोटी ४६ लाख ६१ सहस्र रुपयांच्या शासकीय आणि खासगी मालमत्तांची हानी झाली आहे. जाळपोळ करून जिवे मारण्याची भीती दाखवत आणि शस्त्रांच्या बळावर शासकीय कामात अडथळे आणण्याचा प्रयत्न नक्षली नेहमीच करतात, अशी माहिती गडचिरोली परिक्षेत्राचे उपमहानिरीक्षक संदीप पाटील यांनी येथे दिली. ‘जिल्ह्यात आता मूठभर नक्षली शिल्लक आहेत. लवकरच त्यांचेही उच्चाटन केले जाईल’, असेही त्यांनी स्पष्ट केले.
१. नक्षलवाद्यांकडून सार्वजनिक मालमत्तेच्या हानीची सर्वांत पहिली घटना १२ जुलै १९८२ या दिवशी सिरोंचा तालुक्यातील बिर्हाडघाट येथे घडली. या वेळी नक्षलवाद्यांनी वनविभागाचे ८ सहस्र रुपये किमतीचे लाकूड कापले. यानंतर वनविभाग आणि खासगी संस्था यांचे साहित्य जाळले.
२. सागवानाची झाडे तोडणे, रस्त्याच्या कामावरील खासगी कंत्राटदारांचे काम बंद पाडून त्यांच्या साहित्याची जाळपोळ करणे, ग्रामपंचायतीचे साहित्य जाळणे आणि शाळांची तोडफोड करणे आदी विध्वंसक कामे नक्षलवाद्यांनी केली.
३. या व्यतिरिक्त शासनाच्या विविध विकासकामांना विरोध करून आदिवासींना मूलभूत गरजांपासून दूर ठेवण्याचे कामही नक्षलवादी सातत्याने करत आहेत.
४. वर्ष १९८० ते ऑक्टोबर २०२३ या कालावधीत नक्षल्यांवर ५५२ खुनाचे गुन्हे, ६९९ चकमकीचे, ९७ दरोडा आणि जबरी चोरी, २० अपहरण, ५७५ जाळपोळ आणि इतर ६७५ असे एकूण २ सहस्र ६१८ गुन्हे नोंद आहेत.
५. नक्षली आक्रमणांत आतापर्यंत २१२ पोलीस हुतात्मा झाले आहेत, तर ५३३ सामान्य नागरिक आणि २१ विशेष पोलीस अधिकारी मिळून ५३३ जणांचा मृत्यू झाला आहे, तर ३५३ नागरिक घायाळ झाले आहेत.
६. पोलीस आणि नक्षल चकमकीत ३१० नक्षली ठार झाले आहेत, तसेच ४२ घायाळ झाले. यांपैकी २४ नक्षल्यांचे मृतदेह मिळाले नाहीत.
संपादकीय भूमिका :जोपर्यंत शासनकर्ते आणि प्रशासन नक्षलवाद पूर्ण नष्ट करत नाहीत, तोपर्यंत नक्षलवाद्यांकडून पोलीस अन् ग्रामस्थ यांच्या हत्या, तसेच मालमत्ताहानीच्या घटना घडतच रहातील ! |