महर्षि आस्तिक

भारतातील महान ऋषि परंपरा (लेखांक १४)

‘शांत आणि सुखावह निद्रेसाठी झोपण्यापूर्वी  पुढील मंत्र म्हणण्याची पद्धत आहे-
अगस्तिर्माधवश्चैव मुचकुन्दो महाबलः ।
कपिलो मुनिरास्तीकः पञ्चैते सुखशायिनः ।। (संदर्भ : अज्ञात)

अर्थ : अगस्ति, माधव, महाबली मुचकुंद, कपिल आणि आस्तिक हे पाच ऋषी सुखनिद्रा देणारे आहेत.

या मंत्रामध्ये ज्या ५ ऋषींना वंदन केले जाते, त्यापैकी १ महर्षि आस्तिक हे होत. कुरु कुलातील राजा जनमेजय याने चालू केलेले ‘सर्पसत्र थांबवणारे महान ऋषि’ म्हणून त्यांचे नाव भारतीय संस्कृतीत अजरामर झाले आहे.

१. जनमेजयाने आरंभलेला सर्पसत्र थांबवणारे महान ऋषि

महाभारतातील अभिमन्युचा पुत्र राजा परीक्षित एकदा मृगयेसाठी वनात गेला होता. मृगाच्या मागे धावतांना तो शमिक ऋषींच्या आश्रमात शिरला. मृग कोणत्या दिशेने गेला? हे राजाच्या लक्षात येईना; म्हणून त्याने आश्रमात बसलेल्या शमिक ऋषींना त्याच्याविषयी विचारले. पुनःपुन्हा विचारूनही मौनव्रत धारण केलेले ते ऋषि काहीच बोलले नाहीत. हे पाहून संतापलेल्या राजाने एक मेलेला सर्प ऋषींच्या अंगावर फेकला आणि तो निघून गेला. शमिक ऋषींचा पुत्र शृंगी हा महातपस्वी होता. त्याला आपल्या वडिलांचा अपमान सहन झाला नाही. त्याने राजाला शाप दिला, ‘नागराज तक्षकाच्या दंशाने ७ दिवसांच्या आत तुला मृत्यू येईल.’ या शापाप्रमाणे राजा परीक्षित सर्पदंशाने यमसदनास गेला. आपल्या सत्शील पित्याच्या मृृत्यूने शोकाकुल झालेल्या जनमेजयाने पित्याच्या मृत्यूचा सूड; म्हणून सर्पजातीचा विनाश करण्यासाठी भव्य यज्ञाला आरंभ केला. यज्ञामध्ये सहभागी पुरोहित, ऋत्विज आणि ऋषि यांच्या मंत्र सामर्थ्यामुळे लाखो सर्प यज्ञकुंडात पडून भस्मसात होऊ लागले. हा सर्पसंहार पाहून नागराज तक्षक घाबरला. तो देवराज इंद्राच्या आश्रयाला गेला.

जनमेजयाचे मुख्य लक्ष्य तर तक्षकच होता. राजाने पुरोहितांना इंद्रासह तक्षकास खेचून आणण्याचा आदेश दिला. हे समजताच स्वतःचे प्राण वाचवण्यासाठी इंद्राने तक्षकास सोडून दिले. आता काही क्षणात तक्षक यज्ञकुंडात येऊन पडेल आणि भस्मसात होईल, अशी स्थिती निर्माण झाली. आपले सूडसत्र आता पूर्ण होईल, या आनंदात जनमेजय होता. तेवढ्यात यज्ञमंडपाच्या प्रवेशद्वाराजवळ एक तेजस्वी ऋषि आले. आपल्या मधुर आणि सुश्राव्य गायनाने ते राजा जनमेजय अन् यज्ञमंडपातील ऋषिजनांची स्तुती करू लागले. ती स्तुती ऐकून तृप्त झालेल्या राजाने आदरपूर्वक त्या ऋषींना यज्ञमंडपात बोलावले आणि इच्छित मनोदय व्यक्त करण्यास सांगितले. सर्पसत्र थांबवण्याच्या हेतूने आलेले ते आस्तिक ऋषि राजाला म्हणाले, ‘‘सर्पसंहार करणारा हा यज्ञ थांबव.’’ हे ऐकून जनमेजयाला दुःख झाले. त्याने ऋषींना अन्य इच्छा व्यक्त करण्याची विनंती केली; पण आस्तिक ऋषि आपल्या मतावर ठाम राहिले. नाईलाजाने जनमेजयाने यज्ञ थांबवला. तक्षकाचे प्राण वाचले. सर्पजातीचा विद्ध्वंस थांबला. नाराज असलेला जनमेजय महर्षि आस्तिकांच्या भेटीमुळे मात्र प्रसन्न होता. राजाने महर्षिंचा यथायोग्य सन्मान करून पुढे होणार्‍या अश्वमेध यज्ञासाठी आमंत्रित केले.

आस्तिक ऋषींनी सर्पसत्र थांबवले, तो दिवस नंदिवर्धिनी पंचमीचा होता. पुढे तो दिवस नागपंचमी म्हणून साजरा केला जाऊ लागला. आस्तिक ऋषींनी आपल्यावर केलेल्या अनंत उपकारांची जाणीव आजही सर्पजातीला आहे. त्यामुळे सर्पाला आस्तिक ऋषींची शपथ घालण्याची रुढी आहे. ‘आस्तिक ऋषींचे आख्यान पठण करणार्‍यांना सर्पबाधा होत नाही’, असाही लोकांचा विश्वास आहे.

२. आस्तिक ऋषींच्या जन्माची पौराणिक कथा

आस्तिक हे भृगुकुलोत्पन्न ऋषि होते. प्रमती ऋषींचे पुत्र सरू आणि त्यांचे पुत्र जरत्कारू हे आस्तिकांचे पिता होय. विरक्त आणि तापसी असणार्‍या जरत्कारू यांना एकदा आपले पितर जीर्णशीर्ण अवस्थेत एका खंदकामध्ये लोंबकळत असलेले दिसले. त्यांची विचारपूस केली असता, ते म्हणाले, ‘‘तू आमचा वंशविस्तार करणार नाहीस, तोपर्यंत आम्हाला या अवस्थेतून मुक्ती मिळणार नाही.’’ पितरांना सद्गती मिळावी, या उद्देशाने जरत्कारू यांनी संसार पत्करला. वासुकी या सर्पराजाच्या बहिणीशी त्यांनी विवाह केला. तिचे नावही जरत्कारू होते. जरत्कारू गर्भवती असतांना तिने शंकराची उपासना करून शंकराला प्रसन्न करून घेतले. त्या वेळी शंकराने केलेला उपदेश गर्भातील बालकानेही ग्रहण केला. जरत्कारूच्या उदरी जन्म घेतलेला तो ज्ञानी बालक, म्हणजेच महर्षि आस्तिक होत.

देवी भागवतात, दुसर्‍या स्कंधातील बाराव्या अध्यायात आणि नवव्या स्कंधाच्या अठ्ठेचाळीसाव्या अध्यायातही आस्तिक ऋषींचे आख्यान आले आहे. ‘हे आख्यान वाचून देवीची उपासना करणार्‍याला नागापासून भय रहात नाही’, असे म्हटले जाते.

‘साप डूक धरतो’, असे म्हणतो; पण मानवाने सापाचा डूक धरल्याची ही कथा आहे. माणसाने प्राण्यांवर आणि निसर्गातील घटकांवर दोषारोपण करण्याऐवजी स्वतःतील दोष काढून टाकण्यावर अधिक भर दिला पाहिजे.’

– स्वाती आलूरकर (साभार : मासिक ‘मनशक्ती’, जुलै २००६)