Karnataka Boy Paraded Naked : एका विद्यार्थ्याला अन्य विद्यार्थ्यांनी नग्न करून मारहाण करत काढली धिंड !

कलबुर्गी (कर्नाटक) येथे डॉ. आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करतांना त्यात सहभागी न झाल्याचे प्रकरण !

कलबुर्गी (कर्नाटक) – येथे डॉ. भीमराव आंबेडकर यांच्या प्रतिमेची पूजा करण्यात येत होती. त्यात सहभागी न झाल्यामुळे एका विद्यार्थ्याला नग्न करून मारहाण करण्यात आली. या विद्यार्थ्याच्या हातात डॉ. आंबेडकर यांचे छायाचित्र देऊन त्याला शहरात फिरवण्यात आले. या घटनेचा व्हिडिओ सामाजिक माध्यमांतून प्रसारित झाला.

कलबुर्गी येथील एका महाविद्यालयात शिकणार्‍या काही विद्यार्थ्यांनी २५ जानेवारी या दिवशी वसतीगृहात डॉ. आंबेडकर यांच्या पूजेचे आयोजन केले होते. पीडित विद्यार्थीही याच वसतीगृहात रहातो. त्याला पूजेसाठी उपस्थित रहाण्यास सांगण्यात आले होते; मात्र विद्यार्थ्याने वैयक्तिक कारणामुळे सहभागी होण्यास नकार दिला. त्यामुळे त्याला नग्न करून मारहाण करण्यात आली आणि रस्त्यावरून फिरवण्यात आले. पोलीस तेथे पोचल्यावर मारहाण करणारे विद्यार्थी पळून गेले. या प्रकरणी गुन्हा नोंदवण्यात आला असून पोलीस आरोपी विद्यार्थ्यांचा शोध घेत आहेत.

संपादकीय भूमिका

  • शाळा आणि महाविद्यालय येथे विद्यार्थी शिकण्यासाठी आणि योग्य संस्कार होण्यासाठी जात असतात; मात्र याच्या अगदी उलट कृती ते तेथे करत असतील, तर याला शाळा आणि महाविद्यालय उत्तरदायी आहेत !
  • राज्यघटना आपल्याला विचारस्वातंत्र्य देते, तसेच लोकशाही पद्धतीने विरोध करण्यास शिकवते. त्यामुळे विद्यार्थी अशी निंदनीय कृती करून राज्यघटनेचा अशा प्रकारे अवमान करत असतील, तर डॉ. बाबासाहेब आंबडेकर यांना ते आवडले असते का ?