आय.ए.एस्., आय.पी.एस्. आणि खेळाडू होण्यापेक्षा पोलीस किंवा शिक्षक होण्याकडे कल !

 ‘असर’च्या ‘बियाँड बेसिक्स’ सर्वेक्षणातील निष्कर्ष !

पुणे – देशातील मुलांना आय.ए.एस्., आय.पी.एस्. खेळाडू होण्यापेक्षा पोलीस किंवा शिक्षक होण्यात जास्त रस आहे, तसेच २१ टक्के मुलांना काय करायचे ? याची माहिती नाही किंवा विचार केलेला नाही, तर २.१ टक्के मुलांना काम करण्यात रस नाही, असे लक्षात आहे. ‘असर’ने ‘बियाँड बेसिक्स’ हा अहवाल नुकताच घोषित केला, त्यात देशभरातील विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक स्थितीसह विद्यार्थ्यांच्या करिअरविषयीही सर्वेक्षण करण्यात आले. त्यातून विद्यार्थ्यांचा कल लक्षात आला आहे.

अहवालातील आकडेवारीनुसार देशभरातील १३ टक्के मुलांना पोलीस होण्यात रस आहे. त्यात १३.६ टक्के मुलगे, तर १२.५ टक्के मुली आहेत. शिक्षक होण्याची इच्छा असलेल्या ११.४ टक्के मुलांमध्ये १६ टक्के मुली, तर ६ टक्के मुलगे आहेत. ७.७ टक्के मुलांना लष्करात जाण्याची इच्छा आहे. त्यात १३.३ टक्के मुलगे, तर २.४ टक्के मुली आहेत. प्रशासकीय सेवांमध्ये आय.ए.एस्. आणि आय.पी.एस्. या सनदी अधिकारी पदांना विशेष महत्त्व आहे; मात्र केवळ २ टक्के मुलांना आय.ए.एस्., १.४ टक्के मुलांना आय.पी.एस्. होण्यात रस वाटत आहे. १.९ टक्का मुले स्वतःचा किंवा कौटुंबिक व्यवसाय करणार आहेत, तर शेतीसंबंधित कामे १.४ टक्के मुले करणार आहेत. एकीकडे काहीतरी होण्याची इच्छा असलेल्या विद्यार्थ्यांसमवेतच ‘काय करायचे हे ठाऊक नाही किंवा त्याविषयी विचार केलेला नाही’ अशा मुलांचे प्रमाण २१ टक्के आहे. त्यात १९.९ टक्के मुले, तर २२ टक्के मुली आहेत. तसेच ‘काहीही काम करायचे नाही’, असा प्रतिसाद २.१ टक्के मुलांनी दिला आहे.