महानाट्याची ‘आंतरराष्ट्रीय गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये नोंद !
पिंपरी (जिल्हा पुणे) – शिवराज्याभिषेकास ३५० वर्षे पूर्ण झाल्यानिमित्त २० जानेवारी या दिवशी ४०० विद्यार्थ्यांनी शिवजन्मापूर्वीचा महाराष्ट्र ते शिवराज्याभिषेकापर्यंतचा प्रवास ‘शिवबा झालं राजं’ हे महानाट्याच्या स्वरूपात सादर केले. येथील ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’द्वारा संचलित ‘हिंदुस्थान अँटिबायोटिक्स शाळे’च्या प्राथमिक आणि पूर्व प्राथमिक विभागातील शाळेच्या मुख्याध्यापिका सुरेखा जाधव यांच्या संकल्पनेतून या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या महानाट्याची नोंद ‘आंतरराष्ट्रीय गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’मध्ये झाली आहे. हा पुरस्कार देण्यासाठी ‘गिनिज बुक ऑफ रेकॉर्ड’चे ‘कोऑर्डिनेटर’ डॉ. पेड्डिक के. ईश्वर, श्री. बिंगी नरेंद्र गौड, नागेश चव्हाण स्वतः उपस्थित होते. ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’चे अध्यक्ष कोल्हापूर संस्थानचे मा. श्रीमंत छत्रपती शाहू महाराज हे कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी होते. ‘डेक्कन एज्युकेशन सोसायटी’च्या नियामक मंडळाचे अध्यक्ष श्री. प्रमोद रावत, अभिनेते मिलिंद संगवार हेही या वेळी उपस्थित होते. आजी-माजी शिक्षक, विद्यार्थी आणि ३ सहस्र पालक यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला. या महानाट्याचे लेखन, दिग्दर्शन, ‘रेकॉर्डिंग’ आणि नेपथ्य हे सर्व शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचारी यांनी केले होते.