पुसद येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा पार पडली !
पुसद (यवतमाळ), २२ जानेवारी (वार्ता.) – आतंकवादाप्रमाणे शहरी नक्षलवादानेही आता शहरामध्ये पाळेमुळे रोवायला प्रारंभ केला आहे. शासकीय आकडेवारीनुसार मागील १० वर्षांत २ सहस्र १९९ निरपराध लोकांच्या, तर १ सहस्र ३४२ सैनिक आणि पोलीस यांच्या हत्या नक्षलवाद्यांनी केल्या आहेत. हे शहरी नक्षली सैनिक आणि पोलीस यांच्या विरोधात बोलतात. मानवतावादी, पर्यावरणवादी, लेखक, विचारवंत, पत्रकार, इतिहासकार, अंधश्रद्धाविरोधी या नावाने खोटे मुखवटे घेऊन वावरतात. ही उच्चशिक्षित मंडळी देशविरोधी कारवाया करत असतात, हे गंभीर आहे. हा नक्षलवाद देशाला घातक आहे, याविषयी आपण सर्वांनी जागृत असले पाहिजे, असे आवाहन हिंदु जनजागृती समितीचे श्री. सुनील घनवट यांनी केले. ते येथे पार पडलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत बोलत होते. सभेचा प्रारंभ शंखनाद, वेदमंत्रपठण आणि दीपप्रज्वलन यांनी झाला.
रणरागिणी शाखेच्या कु. प्रतीक्षा कोरगावकर यांनी ‘महिलांच्या शौर्यजागृतीची आवश्यकता’ या विषयावर मार्गदर्शन केले, तर सनातन संस्थेच्या धर्मप्रचारक सद्गुरु स्वाती खाडये यांनी ‘हिंदु धर्माचे श्रेष्ठत्व आणि धर्माचरणाचे महत्त्व’ यावर मार्गदर्शन केले.
या सभेला वारकरी संप्रदायातील कीर्तनकार ह.भ.प. बबन महाराज चातारीकर, ह.भ.प. भारत महाराज घोगरे, ह.भ.प. डॉक्टर पठाडे, ह.भ.प. गिरीश महाराज जोशी, ह.भ.प. सदाशिव डेंगाळे महाराज, ह.भ.प. मुकुंद गुरु कळसे, ह.भ.प. योगानंद महाराज, ह.भ.प. गणेश धर्माळे, पुरोहित संघाचे विवेक कंठे, राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे नितीन पांडे, पू. बाबूसिंग महाराज काकडदाती, तसेच सनातन संस्थेचे धर्मप्रचारक पू. अशोक पात्रीकर यांची वंदनीय उपस्थिती लाभली.