हे प्रभु श्रीराम,
येत्या २२ जानेवारीस अयोध्या येथे तुझ्याच जन्मभूमीत भव्य-दिव्य मंदिरात तुझ्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठापना होत आहे, हे ऐकून अतीव आनंद होत आहे. हा क्षण नक्कीच आम्हा सर्व सनातन हिंदु बांधवांसाठी भाग्याचा आहे, यात तीळमात्रही शंका नाही.
खरे म्हणजे हे प्रभु, तू कणाकणात व्यापलेला आहेस. तुझ्या निस्सिम आणि सदाचारी भक्तांसाठी त्यांचे हृदय हेच तुझे मंदिर ! या वसुंधरेवरील प्रत्येक प्राणिमात्राच्या चांगल्या नि वाईट कर्मांचा तू निश्चितच साक्षीदार आहेस. या धरणीमातेवरील नराधम, दुराचारी नि अनैतिक कर्मे करणारी; पैशाचा माज आणि वाईट व्यसनांची कैफ चढलेली; पदोपदी भ्रष्टाचारात गुंतलेली माणसे कदाचित् सबळ पुराव्याअभावी निर्दोष आणि सभ्य म्हणून समाजात मिरवतही असतील; मात्र मला पूर्ण विश्वास आहे की, हे प्रभु श्रीराम, तुझ्या नजरेतून एकही पापी सुटणार नाही.
आज या अवनीवरील जवळजवळ प्रत्येक क्षेत्रातील राजकारण्याने त्याची मर्यादा ओलांडलेली आहे. निसर्गावरील अतिक्रमण वाढलेले आहे. मानवाला विज्ञानाची अवाजवी धुंदी चढलेली आहे. परमेश्वरी शक्तीपेक्षाही आणि निसर्गापेक्षाही त्याला विज्ञान अधिक सामर्थ्यशाली वाटत आहे. हा त्यांचा निव्वळ भ्रम आहे, हे त्यांना दाखवून दे.
काही मतलबी नि काही स्वार्थी राजकारणी तुझ्या नामाचा वापर आपल्या लाभासाठी करण्याची शक्यता नाकारता येत नाही. तू त्यांनाही चांगल्यापैकी ओळखतोस ! अशांना त्यांची जागा वेळीच दाखवून दे.
माझ्या या प्रियतम भारत देशातील तुझी सर्व लेकरे आणि माताभगिनी सुखी रहावीत, निर्भय मनाने जीवन जगावीत, गुण्यागोविंदाने नांदावीत, बंधूभावाने रहावीत, यासाठी हे प्रभु ‘रामराज्य’ यावे’, हीच तुझ्या चरणी प्रार्थना !
तुझा भक्त,
– श्री. विजयसिंह आजगांवकर, कैलासनगर, अस्नोडा, गोवा.