प.पू. स्वामी वरदानंद भारती यांचे धर्माविषयी अमूल्य मार्गदर्शन असणारी नवीन लेखमाला !
‘सध्याच्या काळाला वा युगाला ‘विज्ञानयुग’ म्हटले जाते, हे योग्य आहे का ?’, याचा आधी नीट विचार केला पाहिजे; कारण सध्या विज्ञानाच्या नावाखाली चंगळवाद वाढवला जात आहे आणि बहुधा या उच्छृंखल मनोवृत्तीच्या उपभोगासाठी विज्ञानाचा वापर केलेला दिसतो. तरीही ‘विज्ञानयुग’ असे म्हटले, तरीसुद्धा आजच्या काळात धर्माची आवश्यकता फार आहे.
१. धर्म हा विज्ञानाचा ‘नियंता (गव्हर्नर)’ !
विज्ञानच असे सांगते की, अनियंत्रित शक्ती ही उपयोगशून्य असते. ती कोणताही चांगला परिणाम करू शकत नाही आणि कोणत्याही प्रकारची शक्ती अनियंत्रित झाली, तर त्यातून केवळ विनाश होतो. जर आजच्या युगात विज्ञान ही शक्ती आहे, तर त्या विज्ञानाचे ‘नियंत्रण (गव्हर्न)’ कशाने करायचे ? याचा विचार करणे आवश्यक आहे. धर्म हा विज्ञानाचा ‘नियंता (गव्हर्नर)’ म्हणून उपयोगी पडतो.
२. विज्ञानाचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी करण्यासाठी धर्माचे नियंत्रण हवे !
‘आज विज्ञानाच्याच अनिर्बंध पद्धतीमुळे मानव विनाशाच्या टोकावर उभा आहे’, असे गंभीरपणे म्हटले जाते आणि ही वस्तूस्थिती नाकारता येणार नाही. याचे कारण विज्ञानाची प्रगती ही अनिर्बंध, अनीतीमान, असभ्य पद्धतीने झालेली आहे. त्यामुळे विनाशाचा धोका निर्माण झालेला आहे. याउलट जर नीती आणि सभ्यता यांच्या अनुषंगाने विज्ञानाची प्रगती झाली, तर ती प्रगती मानवाच्या कल्याणाची ठरते. धर्मामुळे विज्ञान अनैतिक आणि असभ्य पद्धतीने वाढणार नाही. प्रत्येक गोष्ट काही मर्यादेमध्ये असेल, तरच तिचा चांगला उपयोग होतो. मर्यादेच्या पलिकडील वापर हा हानीकारक असतो, धर्मशास्त्र हे मर्यादापालन करते.
उदाहरणार्थ एखादे शस्त्र (ब्लेड) उत्तम प्रकारे धारदार असणे, हे विज्ञानाच्या प्रगतीने साध्य होते. हे शस्त्र शल्यवैद्याच्या (‘सर्जन’च्या) हाताने ते समाजकल्याणासाठी उपयोगी ठरेल आणि खिसेकापूच्या हाती समाजविघातक ठरेल. त्यामुळे असे उत्तम शस्त्र वैद्याच्याच हाती राहील, चोर-खिसेकापूंच्या नाही, हे नियंत्रण असणे अपरिहार्य आहे. धर्म अशा प्रकारचे नियंत्रण ठेवतो.
तात्पर्य : विज्ञानाचा उपयोग मानवजातीच्या कल्याणासाठी करायचा असेल, तर त्याला धर्माचे नियंत्रण असलेच पाहिजे.
– प.पू. स्वामी वरदानंद भारती (साभार : ग्रंथ ‘जिज्ञासा’, श्रीवरदानंद प्रतिष्ठान, पंढरपूर. वर्ष १९९८)