‘श्रीरामभक्ती’ जागवा !

श्रीराम सप्ताह विशेष ! (भाग ४)

‘जय श्रीराम’ हा जयघोष करत रामभक्त चालले अयोध्येकडे

श्रीराममूर्तीचा प्राणप्रतिष्ठापना सोहळा जसा जवळ येत आहे, तसे हिंदूंमध्ये श्रीरामभक्तीचे वारे वहात आहेत. रामासाठी हिंदू काहीही करण्यास सिद्ध असतात आणि आहेत…, असे परत एकदा सिद्ध होत आहे ! कुणी एकटे चालत, कुणी गटागटाने, कुणी वाहनाने, कुणी रामभक्तांसाठी शिधा घेऊन अयोध्येकडे अपूर्व उत्साहात निघाले आहेत…! रामभक्तीचा प्रसाद वाटत…, ‘जय श्रीराम’ हा जयघोष करत… आणि इतरांकडून करवून घेत… एका अनामिक ओढीने पावले अयोध्येकडे पडत आहेत !

प्रभु श्रीराम मर्यादापुरुषोत्तम होता ! श्रीरामाने धर्माच्या सर्व मर्यादांचे पालन केले. श्रीराम एकवचनी, विनम्र, आज्ञाधारक, प्रजावत्सल, इतरांचा आदर करणारा होता ! कुटुंबीय, सहकारी, प्रजा यांच्यासमवेतचे श्रीरामाचे बोलणे, चालणे, वागणे हे सर्वाेच्च आदर्श आणि म्हणून अनुकरणीय होते. श्रीराममूर्ती प्रतिष्ठापनेच्या निमित्ताने लाखो हिंदू अयोध्येत एकत्र येत आहेत. या निमित्ताने श्रीरामाच्या गुणांचे चिंतन, मनन करण्याची संधी आहे. ‘श्रीरामाचे गुण आचरणात आणले पाहिजेत’, याची जाणीव हिंदूंच्या मनामनांत निर्माण होणे आवश्यक आहे. श्रीराम गुणांचे सागर आहेत. ‘श्रीरामाचे गुण स्वत:त आणण्यासाठी प्रयत्न करणे’, हीच खरी श्रीरामभक्ती होय ! श्रीराम देश-विदेशातील हिंदूंना एका ध्येयाने एकत्र आणत त्यांच्यात ही गुणवृद्धी आपसूकच करून घेणार कि काय, असे सध्याचे वातावरण आहे ! कारण…श्रीरामाला भेटण्यास निघालेल्यांसाठी कुणी डबा देत आहेत, कुणी पाणी देत आहेत. कुणी रामभक्तांसाठी लंगर, म्हणजेच २ वेळेच्या महाप्रसादाची व्यवस्था करण्यासाठी निघाले आहेत. कुणी मूर्ती प्रतिष्ठापनेच्या दिवशी रामभक्तांसाठी प्रसाद बनवण्याची सिद्धता करत आहेत, तर कुणी त्यासाठी अर्पण देत आहेत. कुणी श्रीरामासाठी वस्त्रे शिवून देत आहेत, कुणी त्याचे अलंकार बनवत आहेत, कुणी त्याच्या नित्य पूजेतील साहित्य सिद्ध करत आहेत. कुणी प्रसादासाठी लाडू बनवत आहेत. विशेष म्हणजे या सार्‍या गोष्टी करतांना करणारे सर्व ‘जय श्रीराम’ असा जयघोष किंवा रामनामाचा जप करत आहेत. एवढ्या मोठ्या संख्येत हिंदू श्रीरामाच्या आगमनाची सिद्धता करत असतांना यामध्ये कुठेही गडबड-गोंधळ नाही, समन्वयाचा अभाव नाही, काही अल्प-अधिक नाही. अयोध्येतील सर्व उपाहारगृहांचे आरक्षण पूर्ण झाले असले, तरी जाणार्‍यांना त्याची पर्वा नाही. त्यांची काळजी घेण्यासाठी, त्यांचे स्वागत करण्यासाठी स्थानिक रामभक्त सिद्ध आहेत. स्थानिक मंदिरांच्या स्वच्छतेसाठी हिंदू पुढाकार घेत आहेत. कुणी त्या दिवशी वाहनफेरी, दिंडी काढण्याची सिद्धता करत आहेत, तर कुणी रामभक्तांसाठी टोप्या शिवत आहेत ! शाळा-महाविद्यालयातील विद्यार्थी आता ‘येस सर’ अथवा ‘येस मॅडम’ ऐवजी ‘जय श्रीराम’ म्हणत आहेत. विमान अथवा रेल्वे प्रवासात हनुमान चालिसा म्हणणे, रामाची भजने म्हणणे, इतरांना म्हणण्यास प्रवृत्त करणे, अशा प्रकारे श्रीरामाला आळवणे चालू झाले आहे. जीवनातील प्रत्येक क्षणी असा श्रीराम जगण्यास आरंभ केला, तर जीवन आंतर्बाह्य पालटून खरोखरच आत्माराम जागृत होईल. यापूर्वी भारत असा राममय होईल, याची कुणी कधी कल्पना तरी केली होती का ? रामभक्तीचा हा अपूर्व उत्साह, जागृत झालेली धर्मचेतना टिकवून ठेवायचे दायित्व आता रामभक्तांचे, हिंदूंचे आहे ! हिंदूंपुढे अनेक आव्हाने आहेत, हिंदूंना अनेक प्रकारच्या जिहादांना तोंड द्यावे लागत आहे. मंदिरे, धर्म, गोमाता यांवरील आघात सहन करावे लागत आहेत, तर काहींना त्यासाठी बलीदानही द्यावे लागत आहे. श्रीरामाच्या निमित्ताने संघटित होणारी हिंदूंची शक्ती वर्धिष्णु केल्यास आणि ही ऊर्जा स्वत:मध्ये अन् इतरांमध्ये रामभक्ती जोपासण्यास वापरल्यास श्रीराम प्रत्येकाला त्याच्या ठायी, आसपास, घरात जाणवेल आणि पुढे त्यामुळेच रामराज्याकडे त्याचा प्रवास वेगाने होऊन राममंदिरासह रामराज्याची पहाटही तो लवकर पाहू शकेल !

– श्री. यज्ञेश सावंत, सनातन आश्रम, देवद, पनवेल.